लेखन माहिती :डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर ,पुणे
भोसले राजघराण्यातील पहिल्या छत्रपतींना विधिपूर्वक राज्याभिषेक व्हावा ही जिजाऊंची सर्वोच्च महत्वकांक्षा होती .शिवरायांचा राज्याभिषेक करण्यामागे हिंदवी स्वराज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा हाच हेतू होता .वतनदार जहागीरदार स्वतःला राजे म्हणून घेत पण शिवाजी महाराजांना स्वतंत्र राजा म्हणण्यास ते तयार नव्हते .यामध्ये आप्तस्वकीय यांचाही समावेश होता. सहाजिकच त्यांना अनभिषिक्त राजे म्हणून प्रतिष्ठा नसल्याने राज्य करताना राजांना अनेक अडचणी येत होत्या .प्रसंगी निर्णय घेणे सोयीचे नसल्याने राज्यकारभार करणे कठीण जात होते .राज्याभिषेक झाल्याशिवाय जगाची मान्यता मिळत नाही एकवेळ जगाची मान्यता नसेल तरी चालेल पण स्वतःच्या प्रजेची मान्यता मिळायला हवी. त्याशिवाय सार्वभौमत्वाचा साक्षात्कार होत नाही व राज्याची शाश्वतताही पटत नाही. राज्याभिषेक म्हणजे साडेतीनशे वर्ष सतत आतुरतेने वाट पाहणाऱ्या स्वराज्याच्या भूमीला येणारे आनंदाचे उधाण होते .शिवाजीराजांचा राज्याभिषेक म्हणजे जिजाऊंच्या आयुष्याच्या व्रताचे उद्यापणच होय. जिजाऊंच्या अपेक्षा ,साधू-संतांचे आशीर्वाद महाराष्ट्र भूमीचा आनंदोत्सव ,आनंदाश्रू या दिवशी साकार झाले होते ".गागाभट्ट म्हणाले राजे आम्ही काशीचे, तुमच्या किर्तीचा परिमल तिथवर येऊन पोहोचला त्या सुगंधाने आम्ही तृप्त झालो .या भारतवर्षात चंद्रगुप्त मौर्य सम्राट होऊन गेले त्यानंतर कितितरी हिंदू राज्य उभी ठाकली ,विजयनगरचे साम्राज्य ,देवगिरीचे राज्य ही दोन्ही राज्ये कीर्तीच्या शिखरावर असतानाच परकियांच्या साध्या धक्क्याने पार कोलमडून गेली, नामशेष झाली हिंदूंचा कैवार घेणारे राज्य भारत वर्षात दिसेनासे झाले या निराशेच्या अंधारात चाचपडत असता आम्हाला दक्षिणेकडे असा दीप प्रज्वलित होताना दिसू लागला .तुमच्या वाढत्या पराक्रमाने राजे आमच्या आशा पल्लवित होत होत्या .आग्र्याच्या कालदाढेतून तुम्ही सुटलात ,याचा परम हर्ष आम्हाला झाला .यश कीर्तीच्या शिखरावर स्थिर झालेली हिंदू राज्य आम्ही कोसळलेली पाहिली. त्यांचे पुनरुत्थान झाले नाही. पण पुरंदरच्या तहाने जमीनदोस्त झालेले राज्य पुन्हा तुम्ही उभे केलेत! पूर्वीपेक्षाही अधिक बळकट, सामर्थ्यवान ! तुमच्या या यशाने आमचे मन धुंदावले आणि आमच्या यशाचा, ज्ञानाचा ,.अहंकाराचा विसर पडून आम्ही येथे आलो आहोत राजे लोक आम्हाला ,वेदो नारायण ,म्हणतात आम्ही कधी खोटी स्तुती करत नाही व मिथ्या भाषणही करत नाही . शिवबा आता तुम्ही राजे आहात सत्ताधीश आहात तुमचा राज्यविस्तार व लौकिक विशाल आहे तुंगभद्रा पासून ते नर्मदेपर्यंत तुमचे राज्य विस्तारले आहे त्यावर शिक्कामोर्तब व्हायला हवे .तुम्ही मुर्धाभिषिक्त राजे बनायला हवे .तुमच्या मस्तकी छत्रचामरे ढळायला हवीत .यादवांच्या पराजया बरोबरच हिंदू धर्म लयाला गेला ,हा समाज नाहीसा व्हायला हवा. हिंदूचा धार्मिक छळ यापुढे कोणालाही करता यायचा नाही .त्यांचा त्राता रक्षक असा एक छत्रपती आहे हे आश्वासन आमच्या भयग्रस्त हिंदूला मिळायला हवे .राजे हे तुमच्या एका राज्याभिषेकाने साध्य होईल याचक म्हणून मी एवढीच विनंती करायला आलो आहे क्षत्रियाखेरीज राज्याभिषेकाचा अधिकार कोणालाही नाही."
हिंदवी स्वराज्याचा तो सुवर्णाचा, सौभाग्याचा ,आनंदाचा क्षण उगवला. मुहूर्ताची घटका बुडाली .महाराज सिंहासनावर स्थानापन्न झाले चौघडे ताशा नौबती झडू लागल्या .बंदुका- तोफा दाही दिशांनी उडू लागल्या. सोन्या रुप्याच्या फुलांची उधळण होऊ लागली .हजारो-लाखो मुखातून शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय गर्जना होऊ लागली राज्यातील सर्व किल्ल्यावर तोफांची सरबत्ती होऊ लागली सर्व स्वराज्य आनंदाने वेडेपिसे झाले होते. गागाभट्टाने उच्च स्वरात घोषणा केली की आज शिवाजी राजे छत्रपती झाले राजा शिवछत्रपती क्षत्रियकुलावंतस महाराज शिवछत्रपती की जय! जय!जय! चार पातशाह्या उरावर उभ्या असताना सुद्धा त्यांना पराजित करून मराठा राजा शिवछत्रपती झाला. शालिवाहन शके 15 96 ,ज्येष्ठ शुद्ध 13, दिनांक 6 जून 16 74 ला राजे सिंहासनाधीश्वर झाले .जिजाऊ साहेबांची इच्छा पूर्ण झाली. त्यांचा शिवबा राजा शिवछत्रपती झाला .जिजाऊंना हा सोहळा पाहून आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले. त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले.हा अनुपम सोहळा पाहून आऊसाहेब धन्य धन्य झाल्या..याचसाठी केला होता अट्टाहास. शककर्ते राजे या देशाला मिळाले
"जय जिजाऊ जय शिवराय"
No comments:
Post a Comment