पुण्यश्लोक 'राजा राम'
**
छत्रपती शिवाजी महाराजांना दोन मुले होती. थोरले संभाजी महाराज आणि धाकटे राजाराम महाराज.
२४ फेब्रुवारी १६७० रोजी सोयराबाई साहेबांच्या पोटी छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म राजगड किल्यावर झाला.
छत्रपती संभाजी महाराजांच्यामध्ये आणि धाकटे भाऊ छत्रपती राजाराम यांच्यात १३ वर्षांचे अंतर होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी 'रात्रंदिनी आम्हास युद्धाचा प्रसंग..' करीत स्वराज्यावर चालून आलेल्या मुघलांना आणी इतर शत्रुंना पराभूत केले; पण दुर्दैवाने अवघडप्रसंगी छत्रपती संभाजी महाराजांस कैद करून औरंगजेबाने त्यांची हत्या केली.
वयाच्या ३१ व्या वर्षी संभाजी महाराजांची हत्या झाली.
अत्यंत महत्वाचे. शब्द शद्ब वाचावा.
मराठ्यांचे स्वराज्याच आता घोर संकटात सापडले होते.
संभाजी महाराजांची हत्या करून रायगडाभोवती आता औरंगजेबरूपी अजगराचा विळखा पडला होता. दिवसेंदिवस हा विळखा अधिकच घट्ट होत होता. अश्या कठीण प्रसंगी ह्या वेळी रायगडावर सर्व राजपरिवाराने एकत्र राहणे हे स्वराज्यासाठी धोक्याचे होते.
इथून पुढील समास मोठ्याने वाचावा हि विनंती.
अश्या बिकट प्रसंगी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी राजमाता येसूबाई साहेब बोलल्या कि, " मुलाचे वय लहान. (म्हणजे संभाजी महाराजांचा मुलगा दुसरे शिवाजी उर्फ शाहू) राज्य तरी गेलेच.
त्या अर्थी तुम्ही सर्वही पराक्रमी मनसबदार यांनी राजारामसाहेब यांस घेऊन रायगडाबाहेर पडावे. मुलास बाहेर जाऊन राहणे यास जवळ जागा रायगडाहून बाकी ऐशी दुसरी नाहीच. त्याअर्थी मुलास व आम्हास येथिल बंदोबस्त करून येथे ठेवावे.
तुम्ही सर्वांनी राजाराम साहेबांसह वर्तमान बाहेर पडून फौज जमा करून, प्रांताचा बंदोबस्त राखीला असता; सर्व मसलत, ओढ तिकडे आधी पडेल. येथे काही गिल्ला पडणार नाही.
तथापि थोडी बहुत मसलत पडली असताही हा किल्ला बेलाग, मजबूत, वर्ष सहामहीने टिकाव धरेल.
तो तुमचा सर्वांचा जमाव एखादे ठायी पोक्त झाला म्हणजे आम्हास रायगडाहून काढून न्यावे. किंवा शत्रूचे प्राबल्य विशेष, त्या अर्थी चंदी चंदावर प्रांती ( म्हणजे तंजावर येथे) दम खाऊन पुन्हा मसलत बळावून राज्य साधनही करणे पडले तरी करावे.
परंतु ये समई सर्व कुटुंब निघोन एकदाच सर्वांनी शत्रूस हस्तगत व्हावे ऐसे होईल. यास्तव राजारामसाहेब व त्यांचा कबिला ऐसे काढोन निघून जावे. सर्वांनी एके ठायी मोहास पडून राहिल्यास सारी मसलत येथेच पडून सर्वांनी सापडावे ऐसे घडेल.."
**
अश्या बिकट प्रसंगी येसूबाई साहेबांनी सांगितलेली हि मसलत सर्वांना मान्य झाली.
आता अत्यंत महत्वाचे:
निघण्यापूर्वी येसूबाई व संभाजीराजे पुत्र शिवाजी यांच्या समक्ष छत्रपती राजाराम महाराज यांनी मुत्सद्दी आणि सरदार यांच्याकडून निष्ठेची शपथ घेवविली व त्यांस सांगितले कि, " राज्याचे अधिकारी शिवाजीराजे पूर्वीचे 'तेच हे' ऐसे लक्ष ठेऊन आम्ही कारभारी, आमचे आज्ञेत राहून पूर्वीहून विशेष ज्याची जशी शक्ती त्याहून अधिक पराक्रम करून औरंगजेब शत्रू यास जिंकून राज्य रक्षावे."
येसूबाई साहेबांच्या चरणांवर मस्तक ठेऊन राजाराम महाराजांनी त्यांचा निरोप घेतला.
येसूबाईंनी राजाराम महाराजांच्या मस्तकी हात ठेऊन आशीर्वाद दिला कि, "यशस्वी व्हावे. गेले राज्य मिळवावे, श्रमी ( म्हणजे दुःखी ) होऊ नये."
राजाराम महाराजांनी आपले पाणवलेले डोळे पुसले व छोट्या शिवाजीला पोटाशी धरून म्हणाले, " पुन्हा भेट होईल तो सुदिन.."
**
पुढे दैव प्रारब्धाने रायगड मुगलांच्या हाती पडला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा दुसरे शिवाजी उर्फ छत्रपती शाहू आणि छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई साहेबांस आणी इतर काही मंडळींस कैद करून आपल्या बरोबर नेले.
**
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर वयाच्या १९ व्या वर्षी स्वराज्याचा राज्यकारभार छत्रपती राजाराम महाराजांच्याकडे आला.
त्यानंतर दक्षिणेत जाऊन आता छत्रपती राजाराम महाराज मुघलांशी आणी इतर शत्रूंशी मुकाबला करून राज्य करू लागले.
छत्रपती राजाराम महाराजांनी 12 वर्ष राज्य केले.
**
रामायणातील भरताचे वर्णन करताना राम सीतेला सांगतो, " ... पित्याने अयोध्येचे राज्य मला अर्पण केलेले होते. परंतु माझ्या भाग्यात आत्ता राज्य नाही.
माझ्या पश्चात बंधू भरत यास राज्य आणि राजलक्ष्मी हस्तगत झालेली असताना 'राज्याचा खरा राजा हा राम आहे' हे पाहून बंधू भरत हा राज्याच्या उपभोगापासून अलिप्त राहिला.
असा प्रिय बंधू होणे नाही.
सीते तो हाच माझा भाऊ भरत होय."
**
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
छत्रपती राजाराम महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करून घेतला नाही. त्यांनी राजचिन्हेही धारण केली नाही. त्यांनी राज्यलक्ष्मीचा उपभोगही घेतला नाही.
औरंगजेबाच्या कैदेत असलेल्या बाळ छत्रपती शाहू महाराजांचा केवळ प्रतिनिधी समजून राजाराम महाराजांनी एक तप मराठ्यांचे राज्य सांभाळले.
ह्यावेळी छत्रपती संभाजी राजांचा औरंगजेबाने शिरच्छेद केला होता. छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई साहेब आणि एकुलता एक पुत्र शाहू कि जो ह्या राज्याचा प्रमुख दावेदार होता तोच औरंगजेबाने पकडून नेला होता.
नियतीने मराठ्यांचे राज्य आता छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरात घातले होते. परंतु अश्या स्थितीत छत्रपती राजाराम महाराजांनी रामायणातील रामचंद्राप्रमाणे मिळत असलेले राज्य; वारसाला चिकटून असलेल्या कुसळाप्रमाणे झटकून टाकले.
"राज्य येन पटांतलग्नतृणवत्यक्त गुरोराज्ञाया" म्हणजे राजा म्हणून नव्हे तर दूर असलेल्या राजाचा प्रतिनिधी म्हणून राजाराम महाराजांनी राज्याचा सांभाळ केला.
छत्रपती राजाराम महाराजांचे उदात्त चरित्र पाहिले म्हणजे चौदा वर्ष नंदीग्रामी राहून रामचंद्रांच्या पादुकांची पूजा करीत त्यांचे राज्य निक्षेप म्हणून सांभाळणाऱ्या वैराग्यमूर्ती असलेल्या 'भरत' याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
दादाजी नरस प्रभूचे वतन परत करावे असे शंकराजी नारायणाला सांगताना छत्रपती राजाराम महाराज लिहितात, ".. कारण चिरंजीव राजश्री ( म्हणजे संभाजीराजे पुत्र शिवाजी उर्फ शाहू ) काले करून तरी श्री देशी आणील... ते (शाहू) मुख्य सर्व राज्यास अधिकारी.
आम्ही करितो तरी ते त्यांच्यासाठीच आहे. प्रसंगास सर्व लोकांस तिकडेच पाहणे येईल व वागतील हे करणे ईश्वरीच नेमिले आहे."
वरील वाक्यांतील राजाराम महाराजांचा निस्वार्थ भाव पहा. किती हि आपल्या पुतण्याच्या म्हणजे शाहू राजांच्या ठायी असलेले नितांत प्रेम आणि माया.
कसे वर्णावे हे प्रेम आणी निष्ठा?
वाघाच्या जाळीत ठेवावा त्याप्रमाणे औरंगजेबाच्या जाळीत असलेला आपला पुतण्या सुटून येण्याची आणि त्याच्या स्वाधीन राज्य करण्याची वाट पाहणारे राजाराम छत्रपती कुठे;
आणि तीन सक्खे भाऊ ठार मारून आणि बापाला विष देऊन त्याची वासलात लावून राज्य बुडाखाली घालून त्यावर बसणारा निर्लज्ज औरंगजेब कोणीकडे!
**
खरोखरच जगाच्या इतिहासात राजाराम महाराजांच्या चरित्रास आणि निस्वार्थ त्यागास तोड असलेली उदाहरणे शोधून सापडणार नाहीत.
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
हिंदू संस्कृतीला संजीवनी देऊन पुनर्जीवित करण्यात शिवाजी महाराजांची आपली उभी ह्यात खर्च झाली.
ह्याच शिवाजी महाराजांनी पुनर्जीवित केलेल्या हिंदू संस्कृतीला आलेले 'अमृत फळ' म्हणजे राजाराम महाराज होय.
छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती राजाराम दोघेही भाऊ शरीराने वेगवेगळे असले तरीही दोघांचेही अंतःकरण हे 'एकजीव एकठाईच' होते.
छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याच्या ठाई असलेल्या महा-पराक्रमी सरदारांना बळ आणि प्रोत्साहन देऊन त्यांच्याकरवी स्वराज्याचा राज्यकारभार यथार्थ चालविला.
एकाहून एक पराक्रमी सरदारांची मने छत्रपती राजाराम महाराजांनी जिंकली हा त्यांचा मोठाच पराक्रम होता.
छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या मार्दवाने आणि माधुर्याने संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण, रामचंद अमात्य अशी हजारो माणसे जवळ केली आणि त्यांच्या पराक्रमणाला 'नवे क्षितिज' उपलब्ध करून दिले.
ह्या शूर मराठा वीरांनी औरंगजेबाला सळो कि पळो करून सोडले आणि "ये मरहट्टे आदमी नहीं; शैतान है शैतान..." असे शब्द त्याच्या तोंडून वदविले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाने कुंठित होऊन छत्रपती संभाजी राजास पकडल्याशिवाय किंवा ठार मारल्याशिवाय पगडी डोक्यावर घालणार नाही अशी संतापाने औरंगजेबाने प्रतिज्ञा केली होती आणि आपली पगडी जमिनीवर आपटली होती.
छत्रपती राजाराम महाराजांनी महा-पराक्रम गाजवून महाराष्ट्रावर आलेले औरंगजेबाचे परचक्र निवारण करण्याच्या बाबतीत दाखविलेले कर्तृत्व हे संभाजी महाराजांच्याच तोडीचे होते.
छत्रपती राजाराम महाराज आपल्या पाठीशी आहेत ह्या नुसत्या भावनेनेच मराठ्यांच्या अंगात हजार हत्तींचे बळ आलेले होते.
जर छत्रपती राजाराम महाराज नसते तर मराठ्यांनी एव्हढ्या प्रतिकूल परिस्थितीत विजयश्री खेचून आणली असती काय हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
पराक्रम तलवार करत नाही कि हात करत नाहीत.
पराक्रम 'खंबीर मन' करीत असते.
मराठ्यांचे हे मन छत्रपती राजाराम महाराजांनी सतेज आणि असेच खंबीर ठेवले हे त्यांचे महा-कर्तृत्व होय.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य सूर्यास ग्रहण लागले होते. स्वराज्यावरील हे ग्रहण दूर करण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी औरंगजेबाशी 'रात्रन्दिनी' युद्ध केले.
छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीच्या शेवटी हे ग्रहण जवळ जवळ सुटले होते आणि स्वराज्याचा मोक्षकाळ आता दृष्टीपथात आला होता.
छत्रपती राजाराम महाराज पालथे जन्मले होते तेंव्हा शिवाजी महाराज म्हणाले होते कि, " हा राम दिल्लीची पातशाही पालथी घालील.."
राजाराम महाराजांनी आपल्या थोर पित्याची भविष्यवाणी अक्षरशः खरी करून दाखविली. औरंगजेबाला ह्याच मातीत मातीमोल करून दिल्लीची पातशाही खरोखरच पालथी घातली.
असे वाटते कि शिवछञपतींच्या मुखाने राजाराम महाराजांच्या जन्मकाळी जणू 'आकाशवाणीच' बोलली होती.
"स्वये श्वसनेची सुकुमार ! मुख मोहाचे माहेर ! माधुर्य जाहले अंकुर ! दर्शन जैसे !! असे राजाराम महाराजांचे माधुर्य आणि मार्दव असले तरी मराठ्यांच्या राज्याच्या अभिमानाच्या बाबतीत त्यांचे मन खरोखरच " कठीण वज्रासी भेदू" असे होते.
**
छत्रपती संभाजी महाराजांची आणि छत्रपती राजाराम महाराजांची 'स्वातंत्र्य लक्ष्मी' हि उपास्य देवता एकच होती आणि तिच्या ठाई अनन्य निष्ठा भक्तीही एकच होती.
राजाराम छत्रपतींच्या पायी इमान ठेऊन मराठे एकामागून एक सुरुंग औरंगजेबाच्या स्वप्नांना लावत होते.
औरंगजेबाच्या दुःखाला औरंगजेबच जबाबदार होता. दुसरे कोणीही नाही.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज हि मराठ्यांची हृदयस्थानी चिरंतर प्रज्वलीत झालेली प्रेरणा होती. त्यांच्या रूपाने अवघे मराठे औरंगजेबाशी लढत होते.
ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र मातीत पापी औरंग्यास मराठ्यांचे राज्य न जिंकताच रिकाम्या हाती 'मरावे लागले' ह्या सारखे दुसरे दुःख औरंगजेबाच्या आत्म्यास झाले नसावे.
**
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
कार्यधुरंधर व्यक्तीचा मृत्यू झाला तरी राष्ट्र मरत नसते.
विस्तवावर फुंकर घातली म्हणून अग्नी विझत नसतो.
आरसा फुटला म्हणून तेजस्वी प्रतिबिंब नष्ट होत नसते.
नदीच्या पात्रात जलबिंदू उठतात आणि विरतात. पण अमरत्वाचे प्रतीक असलेली ती 'सरिता' म्हणजे नदी अखंड वाहतच असते.
राष्ट्र हे धगधगनारा अग्नी आहे.
राष्ट्र हे तेजस्वी प्रतिबिंब आहे.
राष्ट्र ही अखंड वाहणारी 'सरिता' आहे.
कुटील बुद्धीच्या औरंगजेबाला शेवटपर्यंत हे समजलेच नाही कि मराठा ही जमात नव्हती, ती झुंड नव्हती, ती लुटारूंची टोळी नव्हती,
..ते मराठ्यांचे 'महा राष्ट्र' होते.
तो मराठ्यांचा 'महाराष्ट्र धर्म' होता..
(दर बुधवारी संध्याकाळी ७ वाजता प्रसिद्ध होणारा लेख आज महाराजांच्या जयंतीनिमित्ताने सकाळी प्रसिद्ध करत आहे.)
लेख समाप्त.
लेख आवडल्यास जरूर प्रतिक्रिया द्या आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना आमंत्रित करा.
समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर
WhatsApp: 00968 98813812
No comments:
Post a Comment