विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 March 2021

मराठे....आणि मराठ्यांचा गनिमी कावा....॥

 


मराठे....आणि मराठ्यांचा गनिमी कावा....॥
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे श्रींच्या मनी फार आहे...॥
औरंगजेब बादशहाला जवळपास पाव शतक मराठयांनी
झुंजवले.महाराष्ट्रातील मराठयांचे स्वराज्य नष्ट करण्याचा त्याचा मनसुबा जागच्या जागी राहिला.इतकंच नव्हे,तर
तो स्वतःच महाराष्ट्राच्या मातीत मिसळून गेला.राजधानी
सोडून इतका दीर्घकाळ अन्य कोणी सत्ताधारी मोहिमेवर
राहिला नव्हता.जगातील हे एकमेव उदाहरण आहे. हा
एक आगळा वेगळा विक्रम औरंग्याच्या नावावर लागला.
एवढ मात्र नक्की.की मराठे औरंगजेबाला पुरून उरले
एवढ्या बलाढ्य बादशहाला आव्हान देणारे म्हणून मराठयांचा दबदबा व दराराही हिंदुस्थानभर प्रस्थापित झाला.
संयुक्त संस्थांनांची सत्ता संपूर्ण अमेरिका खंडात पसरणार
या १९ व्या शतकातील समर्थनीय श्रद्धेचा उल्लेख अमेरिकन इतिहासकार " manifest destiny " असा करतात.तशीच समजूत मराठयांच्या बाबतीत आता भारत-भर पसरू लागणे स्वाभाविक होते.मराठयांनी मोगलांशी दिलेल्या या दीर्घ लढ्याला महाराष्ट्राचे स्वातंत्र्ययुद्ध असे गौरवले जाते ते यथार्थच आहे.या रोमहर्षक कालखंडात मराठयांमधील स्वभावगुण पूर्ण
परिपोष पावले.
म्हणून रियासतकार म्हटल्याप्रमाणे :-
" मोगल-मराठयांचे पंचवीस वर्षांचे हे युद्ध मराठयांच्या
इतिहासात सोनेरी अक्षारांनी लिहून ठेवण्यास योग्य आहे.
स्वाभिमान , स्वराष्ट्रप्रीती व स्वातंत्र्यप्रेम इत्यादी उच्चतर
गुणांनी या युद्धाचा भाग बराच भरलेला आहे ; तसेच काव्यनाटकांदिकांस योग्य असे पुष्कळ प्रसंग या युद्धात भरलेले आहेत.छत्रपती संभाजी महाराजांची कैद व वध
संताजी व धनाजीचे मोगलांवरचे जबरदस्त हल्ले,जिंजी-
चा वेढा,सातारचा वेढा, महाराणी ताराबाईंचं कर्तृत्व व शेवटी प्रत्यक्ष औरंगजेबाचा खेदजनक शेवट या शेकडो प्रसंगांनी सरस व हृदयद्रावक कथानक व कहाण्या आहेत.
" छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी मराठयांचे स्वतंत्र राज्य स्थापिले,तरी त्या राज्याचा विस्तार व शक्ती वाढवण्यास वरील युद्धच पुष्कळ अंशी कारण झाले.
सर्वांवर सारखा प्रसंग गुदरल्यामुळे राष्ट्रीयतत्वाची बंधने
थोडी बहुत दृढ झाली आणि ज्याला इंग्रजीत टीमवर्क
म्हणतात,अशी जुटीने काम करण्याची सवय लोकांस
लागली.मनात आणल्यास आपण महत्कृत्ये करू शकू
अशी धमक व दिल-भरवसा त्यांच्यामध्ये उत्पन्न झाला."
आपल्या हातून अशी अचाट कृत्ये घडून येण्यासाठी आपले सामथ्ये आणि मर्यादा यांच्यासह आपणाला
आपली ओळख होणे आवश्यक असते." आपल्या ठिकाणी असा आत्मप्रत्यय असल्यावाचून पौरुषत्वाची
कामे हातून होत नाहीत हे मराठयांच्या लक्षात आल्यामुळे या शक्तीच्या जोरावर मराठयांनी पुढे शंभर वर्षांपर्यंत
हिंदुस्थानच्या चारही टोकांस मराठयांनी आपला भगवा
विजयध्वज फडकवीत नेला.
मराठयांच्या ठिकाणी हा आत्मप्रत्यय छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवला यात शंका नाही,म्हणून तर उत्तर-
कालीन लोकसुद्धा महाराष्ट्र राज्याचा उल्लेख " शिवराज्य"
असा करतात.अगदी महाराणी ताराबाईंच्या काळाविषय
लिहीणारा कवींद्र परमानंद यांचा पुत्र कवी देवदत्तसुद्धा
"जगी शिवराज्य नांदे " असे लिहितो.विशेष म्हणजे या
शिवराज्यात वर्ण-जातिभेदाला थारा नव्हता आणि त्यामुळेच हे राज्य आपले असण्याची भावना सर्वांमध्ये
वसत होती.
मराठयांमधील या सामूहिक आत्मभानामुळे औरंगजेबाचे
अंदाज साफ चुकले.यामुळेच मराठयांनी औरंग्याच्या स्वप्नाचा चुराडा उडवला.त्यावेळी स्वराज्यातील जवळपास प्रत्येक घर तेव्हा किल्ला झाले होते व प्रत्येक माणूस लढवय्या,असं म्हटलं तरी फारशी अतिशयोक्ती होऊ नये.औरंगजेब महाराष्ट्रावर कोसळा,तेव्हा सुरवातीला मराठयांचे धोरण व पवित्रा हा थोडासा बचावात्मक होता.मात्र वाढत्या आत्मप्रत्ययानुसार मराठयांची भीड चेपली व ते आक्रमक बनले.राजाराम महाराज आणि नंतर महाराणी ताराबाईंच्या काळासुद्धा
मराठ्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात फौज-फाटा जमवला
होता.म्हणजे लाखभर घोडदळ आणि पन्नासएक हजार
पाउल लोक होते.
पुढे याच माणूसबळावर मराठयांनी मोठा पराक्रम गाजवला.खाली दक्षिणेकडे सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या सरदारांनी जिंजी आणि परिसरातील मुलखावर आपली दहशत निर्माण केली.
औरंगजेब मोठ्या सैन्यानिशी दक्षिणेत उतरल्यामुळे उत्तरेत मोठी लष्करी पोकळी निर्माण झाली होती.याचा
फायदा मराठयांनी घेतला.कृष्णाजी सावंत व नेमाजी शिंदे या सरदारांनी नर्मदा ओलांडून उत्तरेत आपली घोडी नाचवली.माळव्या सारख्या सुपीक प्रदेशावर हात मारला
शाहू महाराजांच्या काळात उत्तराभिमुख होणाऱ्या मराठी
राजकारणाचा पाया हा अशाप्रकारे राजाराम महाराज व
महाराणी ताराबाईंच्या काळात घातला गेला होता.
स्वराज्याथ किल्ल्यांना वेढा घालून बसलेल्या मोगली सैन्यावर विजेच्या जोषाने तुटून पडून जमेल तेवढी लुट
करून वाऱ्याच्या वेगाने निघून जाणाऱ्या मराठी
घोडदळानी आपली पक्की दहशत मोगली सैन्या बसवली होती.औरंग्य आपणास जिंकू शकत नाही,हे एकदा लक्षात आल्यानंतर मराठयांनी आपली युद्ध- नीतीचे बदलली.
औरंगजेबाचा पूर्ण पराभव करून त्याला उत्तरेत हाकलून
लावण्यापेक्षा तो येथे असण्यातच आपला फायदा असल्याने त्यांनी हेरले.त्याच्या हटवादीपणाचा,धर्मवेडा- चा पुरता फायदा मराठयांनी उठवला.स्वराज्य वगळता जवळपास सर्व हिंदुस्थानावर मोगलांचा अंमल असल्यामुळे सर्व दिशांनी मोगली सैन्यासाठी रसद व खजिना येत असे.तो आयताच मराठयांच्या हातात पडे
एकट्या स्वराज्यातुन एवढे उत्पन्न मिळणे शक्यच नव्हते
औरंगजेब लाखाची फौज घेऊन स्वराज्यात ठाण मांडून बसला होता.म्हणून मराठयांना आता लुटीसाठी बाहेर जायची गरज उरली नाही.उलट लुट चालून स्वराज्यात येत होती.तरीही मराठे गुजरात,माळवा,मध्यप्रांतावर स्वाऱ्या करत राहिले.याचे कारण म्हणजे तेथे मिळणाऱ्या
लुटीप्रमाणे ; औरंगजेबावर येणाऱ्या दडपणात व मराठयांच्या बसणाऱ्या दहशतीतही त्यांना स्वारस्य होते.
गनिमी कावा ही मराठयांची परंपरागत युद्धपद्धती.म्हणजे मराठयांचा हुकमी डाव. राजाराम महाराजांच्या काळात या युद्धापद्धतीचा वापर मराठयांनी कसा केला याचं फार उत्तम वर्णन आपल्याला चिटणिस बखरीत सापडते
" मोगली फौज मोठी,एक ठिकाणी उभी राहून लढाई करणार,मराठे यांनी आज ये ठायी,तर उद्या वीस-पंचवीस कोसावर जावे;पुन्हा एकाकी येऊन छापा घालावा,काही लढाई देऊन लुटून पळवावे,काही रसद मारावी,पातशहा- ची ठाणी असतील ती उठवावी.खुद्द पातशाहाचा मुक्काम
असेल तेथे छापा घालावा मुलुख मारावा,हत्ती,घोडे,उंट
पळवावे,अशी धांदल करीत चालावे.गंगातीर प्रांती भागानगरपर्यंत खंडण्या घ्याव्या,एखादे ठाणे बळकावून
झाडीचे आश्रयाने छावणीस राहावे.चंदीकडे मोगल फौज
रवाना होतील,त्यांस अडवावे,लढाई करावी,प्रसंग पडल्यास लुटावे.झुल्फिकारखानाकडून पातशहाकडे
अर्जी येत की मराठयांन पुढे आमचा उपाय राहिला.हे
पातशहांनी ऐकून त्यांचा विचार पडला,की यांशी कसे लढावे सारांश मराठयांनी प्राण तृणप्राय समजून राज्याविशी झटावे,कामे केल्यानंतर सरदारांनी त्यांची
नवाजीस करावी,बक्षीस द्यावे,किताबत सरंजामाच्या सनदा आणून ध्याव्या.पातशहासारखा शत्रू,लाखो फौजा
खजिना बेमुबलग,छकड्यास छकडे द्रव्याचे भरोन कोटीश:चालले आहेत.आपले सैन्य थोडे,जमा होऊ न
देता मसलकीने हिंडोन फिरोन त्यांनी लांडगेतोड करावी
आपल्या फौजेत मणी धारण,त्यांच्या लष्करात शेराची
अशा रीतीने त्यांस चैन पडो देऊ नये. "
मराठयांच्या युद्धतंत्राचे यथार्थ आकलन ग्रँड डफनेही
केले आहे :-
" मराठ्यांचे सामान म्हटले म्हणजे,थोडीशी कांदाभाकरि
व एक घोंगडी एवढेच काय ते असे.रात्री कोठे उतरून,तर घोड्याचे लगाम हातात धरूनच घोंगडी पसरून त्यावर काही खाण्याकरीता किंवा ऊन टाळण्याकरीत ते उतरले
म्हणजे पाचपाच सहा-सहा जण एखादे झाड असेल,तर त्याच्या छायेखाली उतरत;परंतु उघडे मैदानच असेल तर
ते जमिनीत भाले रोवू,त्यांस आपले घोडे बांधून,भाल्यांचे
टोकावरून एखादी घोंगडी आडवी पसरून देत व तिच्या लहानशा छायेत फक्त डोकी ठेऊन बाकी सर्व अंगास दुपारचे जबर ऊन लागत असतानाही जमिनीवर घोरत पडलेले आढळत.आपल्या तलवारी मात्र ते कुशीशी ठेवत
त्यांच्याजवळ उंट,बैल वगैरे काही नसून,फक्त लहान,खुजे
चपळ कंटक असे तट्टे असत.मिळालेली लुट त्यांवर लादून
त्यांना फार जलदीने लांबवीत.येणेप्रमाणे मराठयांची फौज अगदी सुटसुटीत असल्यामुळे मिजासी व काही अंशी बेकैद अशा बादशहाच्या फौजेस तिचा पाठलाग करणे कठीणच पडे.त्यातूनही टी कधी गाठली जाऊन तिचा प्रभाव झालाच,तरी तिचे नुकसान ते काय होणार व तिचे सामानसुमान मोगलांचे हाती काय लागणार ? उलट
मोगल फौजेचा पराभव झाला म्हणजे लुटीने मराठयांची
चंगळ उडून मोगलांचे हाल होतं. "
युद्धामध्ये लढण्यासाठी आणि विशेष म्हणजे शत्रूवर विजय मिळवण्यासाठी शौर्य नावाचा गुण अंगी असलाच
पाहिजे,याबाबत दुमत होण्याचे कारण नाही.परंतु केवळ शौर्य त्यासाठी पुरेसे नाही भगवद् गीतेमध्ये शौर्याबरोबर
तेज,घृती,दक्षता या गुणांचा उल्लेख क्षत्रियाच्या स्वभावाचा भाग म्हणून येतो.क्षात्रधर्मासाठी आवश्यक असणाऱ्या या सर्व गुणांनी मराठयांच्या अंगी परिपोष झाला होता.यात शंका नाही. " युद्धे अपलायनम् " म्हणजे
रणांगणातुन मागे फिरायचे नाही,हा आणखी एक गुण गीता सांगते; परंतु प्रसंगानुरूप यशस्वी माघार हाही सद्गुण ठरतो,हे मराठयांनी गनिमी युद्धातून दाखवून दिले
हिंदुस्थानच्या इतिहासात अठरावे शतक हे मराठयांचे
शतक आहे हे नक्कीच....
।। जय शिवराय ।।
।। जय रौद्र शंभू ।।

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...