छत्रपती शिवरायांच्या युद्ध, लढाया आणि गडकिल्ल्यांचा इतिहास आपण इयत्ता चौथीपासुन शिकत आलो आहोत. परंतु आजही अनेक शिवप्रेमींना महाराजांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती नाही. त्या सर्वांसाठी महाराजांच्या कौटुंबिक जीवनाची थोडक्यात माहिती देण्याचा इथे प्रयत्न केला आहे.
स्वराज्यनिर्मिती कार्यात महाराष्ट्रातील वजनदार सरदारांची आपल्याला गरज भासणार आहे हे शहाजीराजे आणि आऊसाहेब जिजाऊ यांनी ओळखलं होतं. त्या मातब्बर सरदारांशी नाते जोडुनच त्यांना एकत्र आणता येईल या उद्देशाने त्यांनी शिवरायांचे आठ वेगवेगळ्या सरदारांच्या मुलींसोबत विवाह लावुन दिले. शहाजीराजे-जिजाऊंचा उद्देश सफल झाला आणि हे सरदार स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात सहभागी झाले. शिवरायांच्या या आठ पत्नी कोणत्या, त्यांच्यापासुन शिवरायांना झालेल्या मुले-मुली कोण हे जाणुन घेऊया…
छत्रपती शिवराय व महाराणी सईबाई
शिवरायांच्या पत्नी
१) सईबाई – सईबाई या शिवरायांच्या प्रथम पत्नी असुन त्या सातारा जवळच्या फलटण येथील निंबाळकर घराण्यातील होत्या. मुधोजीराजे निंबाळकर हे त्यांचे वडील तर बजाजी निंबाळकर हे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४० मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना चार अपत्ये झाली.त्यांचा मृत्यु ५ सप्टेंबर १६५७ रोजी राजगडावर झाला.
२) सगुणाबाई – सगुणाबाई या शिवरायांच्या द्वितीय पत्नी असुन त्या कोकणातील शृंगारपुर येथील शिर्के घराण्यातील होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४१ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक अपत्य झाले.
३) सोयराबाई – सोयराबाई या शिवरायांच्या तृतीय पत्नी असुन त्या तळबीडच्या मोहिते घराण्यातील होत्या. संभाजी मोहिते हे त्यांचे वडील तर स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे त्यांचे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६५० पुर्वी झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना दोन अपत्ये झाली. त्यांचा मृत्यु १६८१ च्या उत्तरार्धात रायगडावर झाला.
४) पुतळाबाई – पुतळाबाई या शिवरायांच्या चौथ्या पत्नी असुन त्या पालकर घराण्यातील होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६५३ मध्ये झाला. त्या निपुत्रीक असुन जुन १६८० मध्ये शिवरायांच्या निधनाने खचुन जाऊन रायगडावर त्यांचा मृत्यु झाला.
५) लक्ष्मीबाई – लक्ष्मीबाई या शिवरायांच्या पाचव्या पत्नी असुन त्या विचारे घराण्यातील होत्या. जावळीच्या गुप्त मोहिमेवर असताना १६५६ पुर्वी महाराजांशी त्यांचा विवाह झाल्याचे सांगितले जाते. त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु १६७० मध्ये झाला.
६) सकवारबाई – सकवारबाई या शिवरायांच्या सहाव्या पत्नी असुन त्या गायकवाड घराण्यातील होत्या. शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड हे त्यांचे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६५७ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक अपत्य झाले. त्यांचा मृत्यु १७०७ मध्ये झाला.
७) काशीबाई – काशीबाई या शिवरायांच्या सातव्या पत्नी असुन त्या सिंदखेडच्या जाधवराव घराण्यातील होत्या. जिजाऊंचे बंधु अचलोजी जाधवराव हे त्यांचे आजोबा तर संताजी जाधवराव हे त्यांचे वडील होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला. त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु १६७४ मध्ये झाला.
८) गुणवंताबाई – गुणवंताबाई या शिवरायांच्या आठव्या पत्नी असुन त्या विदर्भातील चिखलीच्या इंगळे घराण्यातील होत्या. सरदार शिवाजीराव इंगळे हे त्यांचे वडील होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला. त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु १६७० मध्ये झाला.
|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||
No comments:
Post a Comment