विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 April 2021

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 11

 

व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 11
भिमगडच्या तहाची कलमे –
१) संभाजीने जे पोर्तुगीजांचे प्रदेश व किल्ले हस्तगत केले असतील ते तेथील तोफा व हत्यारे यांसह परत करावे.
२) युद्ध सुरु झाल्यापासून व त्यापूर्वी जी जहाजे एकामेकांनी घेतली असतील ती त्यातील सामानासह परत करावी.
३) एकमेकांनी पकडलेले कैदी सोडून द्यावेत.
४) वसईच्या मुलखातील गावखंडी व दमण प्रांतातील चौथाई ज्याप्रमाणे चौथ राजास देत असत त्याप्रमाणे संभाजी राजास पोर्तुगीजांनी द्यावी आणि संभाजीने ह्याबद्दल त्या प्रदेशाचे रक्षण करावे.
५) एकमेकांच्या मुलखात पूर्वीप्रमाणे व्यापारास मोकळीक असावी, आरमारास कोणतीही अडचण असू नये.
६) पोर्तुगीजांच्या किल्ल्यातील तोफखानाच्या संरक्षणाखाली धान्य सामग्री घेऊन मुघलांच्या फौजेकडे जाणा-या जहाजांना पोर्तुगीजांनी परवानगी देऊन नये, पण ज्या प्रदेशात पोर्तुगिजांचा तोफखाना नसेल तिथे हे कलम लागू होणार नाही.
७) कोकणातील देसाई संभाजी विरुद्ध बंड करून गोव्यात राहिले होते त्यांना माफी द्यावी.
८) पोर्तुगीजांच्या मुलखाच्या सीमा शेजारी संभाजीने किल्ला बांधू नये.
ही सर्व तहाची कलमे निळोपंत पेशवे यास अजिबात मंजूर नव्हती. कशी असणार ? तहाचे एक-एक कलम जर निट वाचले तर लक्षात येते की या तहानुसार फायदा होणार होता तो फक्त पोर्तुगीजांना ! मराठ्यांच्या वाट्यास काहीच येणार नव्हते. कलशाच्या प्रेरणेमुळे झालेला हा तह पाळला जाऊ नये हे निळोपंत पेशवे यास वाटत होते अशी नोंद पोर्तुगीज कागदपत्रात मिळते (पो.म.सं-११५) शत्रूच्या मुलखामधे आक्रमण करून त्यास जेरीस आणून जो तह केला जातो तो जेत्याच्या फायद्याचा असतो. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह हे उदाहरण घ्यावे लागेल. मिर्झा राजा जयसिंगने पूर्णपणे शिवाजी महाराजांना जेरीस आणून तहाच्या कलमानुसार स्वत:चा जय करून घेतला. पण गोवे मोहिमेत प्रस्तुत असणारा तह हा पराजेत्याच्या फायद्याचाच जास्त होता. स्वराज्याचे सुदैव म्हणून हा तह अमलात आला नाही.
गोवे मोहिमेत संभाजी महाराजांनी केलेला पराक्रम हा विलक्षण होता. प्रसंगी स्वताच्या जिवाची पर्वा देखील त्यांनी केली नाही. त्यांच्या या पराक्रमची आणी शौर्याची पोर्तुगीजांना चांगलीच दहशत बसली. पोर्तुगीजांसोबत तह करण्याची संभाजी महाराजांची इच्छा नव्हतीच पण प्रसंग पाहून त्यांनी हा निर्णय घेतला होता. शहा आलम आला नसता तर शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण झाले असते ! फिरांगण प्रदेश मराठ्यांच्या अंमलाखाली आला असता. हे स्वप्न पुरे व्हायला पुढे अनेक वर्ष लागली. उत्तर फिरंगाणातून १७३९ साली चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांचे उच्चाटन झाले. गोव्यातून पोर्तुगीजांची हकालपट्टी व्हायला तर तब्बल ४५१ वर्ष उलटावी लागली. इ.स.१५१० मध्ये तिमय्याच्या मदतीने विजापुरी सल्तनतीला हादरा देत पोर्तुगीझांनी गोव्यात प्रवेश केला. पुढे १९६१ साली स्वतंत्र भारताचे स्वामित्व झुगारून जेव्हा पोर्तुगाल गोव्यावर अधिकार सांगू लागले तेव्हा Major General कुन्हीरमण कॅन्डेथ आणि Air Vice Marshall एलरिक पिंटो यांनी ऑपरेशन विजय आखले आणि गोमंतकाला भरत भूमीत सामील केले. छत्रपती संभाजी महाराजांना नशिबाची थोडी साथ मिळाली असती तर ह्या पोर्तुगीजांचे संभाजी महाराजांनी भारतामधून समूळ उच्चाटन १६८३ सालीच केले असते. असो. इतिहासाला जर-तर मान्य नसते. गोमंतकाचे मराठीपण टिकण्यासाठी आहुती गेलेल्या ज्ञात अज्ञात समरवीरांना सादर समर्पित.
|| लेखन सीमा ||
विशाल खुळे – padmadurg@gmail.com
संदर्भ
पोर्तुगीज-मराठे संबंध
असे होते मोगल
फुतुहते आलमगिरी
तारीखे दिलकुशा
जेधे शकावली
संभाजी कालीन पात्रसार संग्रह
शिव चरित्र साहित्य खंड २
ज्वलज्वलनतेजस संभाजी
मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर
मल्हार रामराव चिटणीस बखर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...