बेलवाडीच्या ईशप्रभूंच्या पत्नी मल्लव्वा उर्फ सावित्रीबाई देसाई आणि छत्रपती शिवराय
माहिती आणि फोटो संभार :प्रवीण भोसले
शिवरायांची दक्षिण भारतात स्वराज्याचा विस्तार करणारी 'दक्षिण दिग्विजय' मोहीम ही शिवरायांच्या आयुष्यातील सर्वात मोठी,सर्वाधिक काळ चाललेली आणि अत्यंत यशस्वी ठरलेली महत्वाची मोहीम आहे. डिसेंबर १६७६ ते मे १६७८ अशी दीड वर्षे ही मोहीम चालू होती.मोहिमेवरुन परत येताना गदग लक्ष्मेश्वरच्या देसायांकडून नजराणा (खंडणी)वसूल करून शिवराय तोरगळला आले. सैन्याची एक तुकडी धारवाड भागातून निघाली होती. या भागातील बेलवाडीच्या ईशप्रभू देसायांना निमूटपणे खंडणी देण्याची सूचना देण्यात आली.पण हे धुडकावून ईशप्रभूंनी मराठा सैन्यातील दाणा- वैरण गोळा करणाऱ्या टोळीवर हल्ला करून त्यांतील बैल पळवून बेलवाडीच्या गढीत नेले. मागोमाग मराठ्यांच्या सैन्यतुकडीने बेलवाडीवर धाव घेतली व गढीला वेढा घातला.(मार्च १६७८).
मराठ्यांचे हे सैन्य काही फार मोठे नव्हते.यांच्यासोबत तोफखाना नव्हता.मुख्य सैन्य शिवरायांबरोबर तोरगळ येथे होते.तरीही मराठ्यांनी गढीवर हल्ले चालू केले.अशाच एका हल्ल्यात ईशप्रभू मारले गेले.मराठ्यांना आता गढी आपल्या हातात आली असे वाटत असतानाच ईशप्रभूंच्या पत्नी मल्लव्वा उर्फ सावित्रीबाई या स्वतः गढी लढवू लागल्या.बेलवाडीतील इतर स्त्रियादेखील सैनिकांच्या बरोबरीने लढू लागल्या.सावित्रीबाईंनी विलक्षण शौर्याने एक महिनाभर गढी जिद्दीने लढविली.या लढाईची हकीकत त्याकाळी या भागात मोठ्या वेगाने पसरली.एक स्त्री मराठ्यांना हार जात नाही ही बातमी इंग्रजांपर्यंतदेखील पोहोचली.
हा सर्व प्रकार कळताच शिवराय स्वतः तोरगळहून बेलवाडीला आले.आता मात्र सावित्रीबाईंची हार निश्चित झाली होती.तरीही शरण न येता त्यांनी युध्दाचाच मार्ग पत्करला. मराठ्यांच्या सैन्यासमोर अखेर बेलवाडीच्या सैन्याचा पराभव झाला आणि सावित्रीबाईंना कैद करण्यात आले. सावित्रीबाईंना यावेळी एक अल्पवयी पुत्रही होता.
सावित्रीबाईंना शिवरायांसमोर आणण्यात आले.त्याचवेळी सावित्रीबाई कैदेत असताना त्यांच्यावर सेखोजी नावाच्या सरदाराने बदनजर ठेवल्याचे कळताच संतापलेल्या शिवरायांनी सेखोजीचे डोळे काढण्याची शिक्षा फर्मावली.
मराठ्यांना निमूटपणे शरण न येता कडवी लढत देणाऱ्या सावित्रीबाईंना शिवराय आता काय शिक्षा करतात हे पाहण्यास उत्सुक असलेल्यांना शिवरायांनी अनपेक्षित आश्चर्याचा धक्का दिला.त्यांनी सावित्रीबाईंना माफ करुन त्यांचा प्रदेश व गढी पुन्हा त्यांनाच बक्षीस दिली.स्त्री असूनही मराठ्यांना शरण न जाता अखेरपर्यंत, अगदी स्वतः कैद होईपर्यंत, जिद्दीने स्वतः शस्त्र घेऊन युध्द करणाऱ्या एका लढवय्या स्त्रीचा मान ठेवण्याने शिवरायांतील मोठेपणाचे, शौर्याची कदर करण्याचे, स्त्रीदाक्षिण्याचे गुणदर्शन सर्वांना घडले.सावित्रीबाईंना बहीण मानून शिवरायांनी त्यांना व त्याच्या लहान मुलाला ही अविस्मरणीय भेट दिली.
ह्या अनपेक्षित उपकाराने भारावलेल्या सावित्रीबाईंना या घटनेचे चिरकाल स्मरण रहावे म्हणून त्यांच्या जहागिरीतील बेलवाडीजवळच्या यादवाड गावी शिवरायांचे छोटे मंदिर (घुमटी)बांधून त्यात शिवरायांची अत्यंत सुबक अशी अश्वारूढ मूर्ती दगडात कोरून घेऊन स्थापन केली व नित्यपूजा चालू केली.
या मूर्तीमधे वरच्या भागात घोड्यावर बसलेले,हाती तलवार धारण केलेले शिवराय असून ते स्वतंत्र, सार्वभौम छत्रपती झालेले असल्याने त्यांच्या डोक्यावर छत्रदेखील कोरलेले आहे.एक सेवक सूर्यपान (आफताबगिरी उर्फ अब्दागिरी) घेऊन उभा आहे. विशेष म्हणजे एक कुत्रेदेखील या शिल्पात आहे.या कुत्र्याबद्दल स्पष्टीकरण देणे अवघड आहे पण शिवरायांच्या या शिल्पात सोबत हे कुत्रे कोरले जाणे यामागे निश्चित काहीतरी ठाम कारण असावे.खालच्या भागात शिवराय सावित्रीबाईंच्या लहान मुलाला मांडीवर घेऊन वाटीने दूध पाजत असल्याचा प्रसंग कोरलेला आहे.शेजारी सावित्रीबाई हात जोडून उभ्या आहेत. कडेला हा प्रसंग पाहणाऱ्या आणखी दोन व्यक्ती आहेत. जणूकाही या मुलाच्या दूधभातासाठीच शिवरायांनी बेलवाडी जहागीर परत सावित्रीबाईंना दिली असा उदात्त हेतू यातून व्यक्त होतो
अत्यंत उत्तम रीतीनें शिल्पांकित केलेही ही मूर्ती शिवरायांच्या स्त्री दाक्षिण्याचे, लढवय्या स्त्रीच्या कौतुकाचे आणि सावित्रीबाईंच्या कृतज्ञतेचे स्मृतीशिल्पचिन्ह आहे.
बेलवाडीच्या मुख्य चौकातील सावित्रीबाईंचा अश्वारुढ पुतळा पाहून थेट गढीच्या जागेवर पोहोचलो.सपाट मैदानात एक शाळा दिसत होती.शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली.त्यांनी दोन वर्षापूर्वीच गढी जीर्ण झाल्याने भुईसपाट झाल्याचे सांगितले. मी कशासाठी आलो आहे हे समजताच त्यांनी तत्काळ देसाई घराण्याचे वंशज श्री.श्रीशैलआप्पा देसाई यांना शाळेत बोलावून घेतले.आता मला खात्रीशीर माहिती मिळू लागली.
या देसायांनी शिवरायांची मूर्ती १६७८ ला खुद्द सावित्रीबाईंनी स्थापल्याची व नित्यपूजा चालू केल्याची माहिती दिली. स्थापनेपासून आजतागायत नित्यपूजा अखंड चालू असून आजही या पूजेसाठी पुजाऱ्याला ठराविक नेमणूक देसाई घराण्याकडून मिळते ही महत्त्वाची माहिती देसायांनी दिली.यादवाड गावी ही मूर्ती असण्याचे कारण 'शिवरायांचा मुक्काम त्याप्रसंगी यादवाडमधे होता आणि शिवराय व सावित्रीबाईंची भेट यादवाडमधे झाली.'असेही देसायांनी सांगितले. ते अर्थात पटण्यासारखे आहे.
शिवरायांनी तिथून निघताना आपली काही माणसे बेलवाडीत नेमली आणि या मराठ्यांचे वंशज आजही बेलवाडीत आहेत ही जादा माहितीदेखील मला मिळाली.
देसाई घराण्याने गढीची जागा शाळेसाठी दान देऊन शिवाय इमारतीसाठीही मदत केली तसेच आज जिथे शाळा आहे तिथेच पूर्वी सावित्रीबाईंचा गढीतील वाडा होता हे मुख्याध्यापकांनी सांगितले. शिवाय संस्थेतर्फे काढण्यात आलेली बेलवाडीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी 'वीरराणी मल्लव्वा चरित्र' ही स्मरणिका त्यांनी मला भेट दिली.ही स्मरणिका १९८९ सालची असून तिच्यात शिवरायांच्या यादवाडमधील मूर्तीची माहिती व फोटो छापलेला आहे.
या सर्व माहितीचा सारांश असा की छत्रपती शिवरायांचे ते हयात असतानाच बांधले गेलेले पहिले मंदिर म्हणजे हे यादवाडमधील मंदिर. छोटे का होईना कळसासह मंदिर बांधून,दरवाजा बसवून त्यात मूर्ती स्थापन करून तिची नित्यपूजा यथायोग्य पध्दतीने चालू असेल तर ते मंदिरच म्हटले पाहिजे.म्हणजेच शिवरायांचे हे पहिले मंदिर ठरते.
पाचसहा वर्षांपूर्वी २०१४-१५ साली मारुती मंदिर जीर्णोद्धारासाठी उतरविण्यात आले व तसेच शिवरायांचे शिल्पही काढून ठेवण्यात आल्याची माहिती मला समजली
No comments:
Post a Comment