विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 April 2021

शिलाहार राजा झंज आणि शिवमंदिरे भाग १

 







शिलाहार राजा झंज आणि शिवमंदिरे
भाग १
सह्याद्रीत भटकंती करताना नाशिक ते जुन्नर या भागात उगम पावणाऱ्या नद्यांच्या उगमस्थानाजवळ शिवभक्त शिलाहार राजा झंज याने बारा शंकराची मंदिरे बांधली ही आख्यायिका ऐकायला मिळते. पण खरोखर ही मंदिरे झंज राजाने बांधली आहेत का? शिलाहार राजांच्या आजपर्यंत उपलब्ध असलेल्या विविध शिलालेख आणि ताम्रपट यांच्याद्वारे झंज आणि त्याने बांधलेल्या (?) शिवमंदिराचा आढावा ह्या लेखाद्वारे घेऊया.
राष्ट्रकुट राजा गोविंद तिसरा (शके ७१५-७३६) याच्या काळात राष्ट्रकुट घराण्याचे मांडलिक म्हणून शिलाहारांचा उदय झाला. उत्तर कोकणातील शिलाहार राजघराण्यातील राजा वप्पूवन्न याचा मुलगा झंज. राजा वप्पूवन्न यांच्यानंतर झंज सत्तेवर आला.
झंजाच्या आधी व छित्तराजापर्यंत होऊन गेलेले शिलाहार राजे
झंज राजाचा राज्यकाल किती होता सांगणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही आहे. आजपर्यंत झंज राजाचा कोणताही शिलालेख किंवा ताम्रपट अभ्यासासाठी उपलब्ध झालेला नाही आहे. झंज राजाचा कोणताही पुराभिलेखीय पुरावा (शिलालेख/ताम्रपट) नसल्यामुळे त्याच्या काळातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी किंवा त्याच्या राज्यकाळात त्याने बांधलेल्या मंदिरांची माहिती मिळू शकत नाही.
शिलाहार राजघराण्यातील कपर्दी पहिला, वप्पूवन्न, झंज, गोग्गी, वज्जड पहिला आणि वज्जड दुसरा या राजांचा कोणताही पुराभिलेखीय पुरावा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे त्यांच्या राज्यकाळाबद्दल निश्चित सांगता येत नाही. असे असले तरी अ. स. आळतेकर यांनी शके ८३२-८५२ हा झंज राजाचा कार्यकाळ निश्चित केला आहे. वि. वा. मिराशी यांनी शिलाहार राजांवर लिहिलेल्या पुस्तकात अ. स. आळतेकर यांनी झंज राज्याचा सांगितलेलाच कार्यकाळ नमूद केला आहे.
अरब इतिहासकार आणि भूगोलतज्ञ अल मसुदी याने आपल्या प्रवासवर्णनात सन ९१६ मध्ये शिलाहारांसंदर्भात पुढीलप्रमाणे नोंद करून ठेवली आहे. “सामूर (चौल) येथे राज्य करणाऱ्या राजाचे नाव झंज (Djandja) असे आहे.”
झंज राजाच्या काळात त्याचे राज्य कुठून कुठपर्यंत पसरले होते ह्याची निश्चित माहिती उपलब्ध नाही आहे. पुरी येथील राष्ट्रकुट राजघराण्याचे “महामंडलेश्वर” अशी उपाधी लावून शिलाहारांनी उत्तर कोकणावर श्रीस्थानक (आताचे ठाणे) ह्या आपल्या राजधानीतून राज्य केले.
झंज राजाच्या मंदिराबद्दल इतिहासकारांनी शिलाहार राजा छित्तराजा याच्या नंतर सत्तेवर आलेल्या राजांच्या निवडक शिलालेख आणि ताम्रपटांचा विचार केलेला दिसून येतो. सन १८८० मध्ये के. टी. तेलंग यांनी खारेपाटण येथील राजा अनंतदेव याचा प्रकाशित केलेला ताम्रपट अ. स. आळतेकर यांनी संदर्भ म्हणून वापरला आहे. तर वि. वा. मिराशी यांनी शिलाहार राजघराण्याच्या शिलालेखांवर आधारित पुस्तकात “त्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी स्वतःच्या नावाने शिवाची १२ मंदिरे बांधली. पण ती आता नष्ट झाली असावीत.” असे विधान केले आहे. पण ह्या विधानाला मिराशी यांनी कोणताही पुरावा दिला नाही आहे.
मंदिर प्रकरणाची सुरुवात
झंज राजाने बांधली म्हणून ज्या मंदिरांचा उल्लेख केला जातो, ती मंदिरे पुढीलप्रमाणे.
०१. गोदावरी नदी, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक (अहिल्यातीर्थानजीक असलेले भग्न शिवालय)
०२. वाकी नदी, त्रिंगलवाडी, जिल्हा नाशिक
०३. बाम नदी, बेलगांव, जिल्हा नाशिक
०४. धारणा नदी, तऱ्हेळे, जिल्हा नाशिक
०५. कडवा नदी, टाकेद, जिल्हा नाशिक
०६. प्रवरा नदी, रतनवाडी, अमृतेश्वर मंदिर, जिल्हा अहमदनगर
०७. मुळा नदी, हरिश्चंद्रगड, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, जिल्हा अहमदनगर
०८. पुष्पावती नदी, खिरेश्वर, नागेश्वर मंदिर, जिल्हा पुणे
०९. कुकडी नदी, पूर, कुकडेश्वर मंदिर, जिल्हा पुणे
१०. मीना नदी, पारुंडे, ब्रम्ह्नाथ मंदिर, जिल्हा पुणे
११. घोड नदी, वचपे, सिध्देश्वर मंदिर, जिल्हा पुणे
१२. भीमा नदी, भोरगिरी येथील शिवमंदिर, भोरगिरी, जिल्हा पुणे
वरील मंदिरांची यादी बघितल्यास यातील एकही मंदिर उत्तर कोकणात नाही आहे. ही सगळी मंदिरे घाटमाथ्यावर आहेत.
झंज राजाच्या मंदिरासाठी शिलाहार राजा अपरादित्य याचा पन्हाळे (ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी) ताम्रपटात असलेल्या श्लोकाचा संदर्भ दिला जातो. पण पन्हाळे ताम्रपट अपरादित्य राजाने दिलेलाच नाही आणि संदर्भासाठी दिलेला श्लोक पण अर्धवट आहे. “घ्य श्रीझंजराजो दिवसकर इव (ध्व)स्तनिशेषदोष| शंभोर्योद्वादशापिव्यरचयदचिरात्कीर्तना निस्वनाम्नासोपानानी” ह्याचा अर्थ आहे “झंजाने स्वतःच्या नावाने शंकराची बारा मंदिरे उभारली. हि मंदिरे म्हणजे धार्मिक वृत्तीच्या माणसांसाठी स्वर्गात जाणारी पहिली पायरी असेल.” ह्या संपूर्ण श्लोकात फक्त मंदिरांचा उल्लेख आहे. मंदिरे कोणती हे सांगितलेले नाही.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...