विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 April 2021

धनाजी जाधव यांचे पूर्वज आणि वारस भाग २

 


धनाजी जाधव यांचे पूर्वज आणि वारस
भाग २
चंद्रसेन जाधव:- हा धनाजीचा मुलगा. धनाजी आजारी असतांना बाळाजी विश्वनाथ हे त्यांंचा कुल कारभार पाहूं लागले, तेव्हां त्याच्या मनांत बाळाजींंविषयीं मत्सर उत्पन्न झाला. वास्तविक चंद्रसेनाचा ओढा ताराबाईंंकडे होता व तो आंतून तिला (शाहूराजांच्या विरुद्ध) फितूरहि झाला होता. धनाजींंच्या मरणानंतर चंद्रसेनाकडे सेनापतित्व आलें. इ. स. १७१३ मध्यें मोगलाईंतून चौथ, सरदेशमुखी व घांसदाणा हे हक्क वसूल करण्याकरितां चंद्रसेनाची योजना झाली होती. या प्रसंगीं वरील हक्कांपैकीं सरदेशमुखी गोळा करण्याकरितां चंद्रसेनाबरोबर बाळाजी विश्वनाथांंची नेमणूक झाली असल्यामुळें बाळाजींंविषयीं चंद्रसेनाचा द्वेषाग्नि अधिकच भडकला. त्यानें क्षुल्लक कारणावरून (हरणाचा तंटा) कुरापत काढून बाळाजींंचा पाठलाग केला व (शाहूराजांंच्या आज्ञेवरून) त्यास पांडवगडामघ्घें आश्रय मिळाला असतां चंद्रसेनानें त्या किल्ल्यास वेढा दिला, व बाळाजींंस आपल्या हवालीं करण्याविषयीं शाहूराजां जवळ उर्मटपणानें मागणी केली. शाहूराजांनें हैबतराव निंबाळकरास जाधवाचें पारिपत्य करण्यास पाठविलें. निंबाळकरानें जेऊरजवळ चंद्रसेनाचा पराभव केला; तेव्हां तो उघडपणें कोल्हापूरकर संभाजीराजांकडे गेला; परंतु पुढें लवकरच दक्षिणेंत निजामउल्मुल्क आल्यावर त्यानें निजामाच्या पदरीं चाकरी धरली व शाहूराजांचा पाडाव करण्याची खटपट चालविली. बेदरच्या पूर्वेस २५ मैलांवर भालकी येथें बरीच मोठी जहागीर निजामानें जाधवास देऊन त्यास आपल्या पदरीं ठेविलें. मराठेशाहीस निजाम यापुढें त्रास देई तो याच्याच बळावर. चंद्रसेनास शाहूनें वळवून घेतलें असतें तर निजामाच्या कायमचा त्रास मिटला असता. इ. स. १७१६ मध्यें सय्यदबंधु हुसेन अल्लीखान याचा दिवाण महकबसिंह, खंडेराव दाभाडे यांच्या दरम्यान अहमदनगराजवळ जी लढाई झाली तींत चंद्रसेन मोंगलांकडून लढत होता.

इ. स. १७२० मध्यें निजामउल्मुल्क हा मोंगल बादशहापासून स्वतंत्र होण्याच्या उद्देशानें दक्षिणेंत आला तेव्हां चंद्रसेन जाधव त्याच्या सैन्यास जाऊन मिळाला. बाळापुरच्या लढाईंतहि चंद्रसेन निजामाकडून लढला. स. १७२५ त तर चंद्रसेनानेंच निजामास शाहूविरुद्ध उठविलें होतें.

इ. स. १७२७-२८ मध्यें निजाम व बाजीराव यांच्यामध्यें जें युद्ध झालें, त्यांत चंद्रसेन लढत होता. त्यानेंच संभाजीस शाहूराजांकडे राज्याचा हिस्सा मागण्यास चिथविलें होतें. त्यानें १७३९ सालीं संभाजीचा पक्ष घेऊन बीडकडे धुमाकूळ घातला. हा १७५१ सालीं मरण पावला

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...