विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 April 2021

बादशाही राजमार्गाचे सुवर्णमार्ग असे नामकरण करणारे मराठे..!!




 बादशाही राजमार्गाचे सुवर्णमार्ग असे नामकरण करणारे मराठे..!!

१६८१-१६८२ सुमारास औरंगजेब स्वतः लाखोंचे सैन्य घेऊन दक्षिणेत उतरला आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धास प्रारंभ झाला. औरंगजेबाने १६८६-१६८७ या दोन वर्षात विजापूर आणि गोवळकोंडा हि राज्ये जिंकून खालसा केली पण त्याला आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत मराठा स्वराज्य काही जिंकता आले नाही. १६८९ साली औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर औरंगजेबास वाटत होते, मराठ्यांचे राज्य बुडाले पण छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन उलट मराठे हे मोगलांविरुद्ध अधीक त्वेषाने लढत होते.
छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाईसाहेब सरकार यांच्या कार्यकाळात तर मराठा-मोगल हा लढा महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि मध्यप्रदेश असा पसरला होता. आपल्या युद्धशैलीने, पराक्रमाने तसेच धावपळीची लढाई लढून मराठ्यांनी मोगलांना ठिकठिकाणी भंडावून सोडले. एक एक किल्ला घेण्यासाठी पन्नास पन्नास हजार मोगल सैन्य महिने महिने वेढा घालून बसत होते, मोगल सैन्य एखादा किल्ला जिंकून पुढे गेले की मराठा सैन्य तो किल्ला काही दिवसात पुन्हा जिंकून घेत असत. अशा परिस्थितीत त्याचवेळी मराठ्यांची २०-२५ हजार सैन्याची अनेक पथके दक्षिणेत सर्वत्र चौथाई गोळा करणे, आक्रमण करणे, मोगल अधिकाऱ्याकडून खंडणी वसूल करणे, दहशत निर्माण करत होते. मराठ्यांनी मोगलांची किती दयनीय परिस्थिती करून ठेवली होती हे आपल्याला मोगलांच्याच इतिहास साधनात नोंदवलेल्या मोगल छावणीच्या आणि प्रवासातील झालेल्या हालअपेष्टा यांच्या दुर्देवी वर्णनांंवरून समजून येऊ शकते. मोगलांची या सगळ्यात प्रचंड मनुष्यहानी तर होतच होती पण त्याचबरोबर युद्धासाठी लागणारा खर्च म्हणून बादशाही खजिना देखील रिकामा होत होता. युद्धाच्या आणि दैनंदिन खर्चासाठी लागणारा खर्च तसेच इतर साधनसामग्री ही उत्तरेकडून येत असे..
मोगलांना सर्वात मोठी काळजी होती ती म्हणजे हा खजिना बादशाही छावणीत कसा नेऊन पोहचवावा, कारण बुऱ्हाणपूर ते अजंठा तसेच इतर भागात मराठे सारखे गर्दी करून असत आणि मराठे अचानक छापा टाकून मोगलांचा खजिना रिकामा करत आणि साधनसामग्री घेऊन निघून जात. मोगलांचा इतिहासकार भीमसेन सक्सेना याने अशा अनेक घटनांविषयी नोंदवून ठेवले आहे,
भीमसेन सक्सेना लिहतो " औरंगबादहुन बादशहाच्या छावणीसाठी खजिना, घोडे, उंट इत्यादी प्रचंड सामग्री येत होती. अहमदनगरपासून बारा कोसावर मराठयांनी त्याच्यावर हल्ला करून संपत्ती पूर्णपणे लुटली. घोडे, उंट, खजिना अशी सर्व मालमत्ता मराठ्यांच्या हाती पडली. शाहराह म्हणजे राजमार्ग. मराठ्यांनी ते नाव बदलून राहजर म्हणजे सुवर्णाचा मार्ग असे ठेवले "
मार्गाची, रस्त्याची नावे ते ही राजमार्गाचे नाव बदलण्याचा पराक्रम देखील मराठ्यांच्याच नावाने आहे असे म्हटल्यास कदाचित वावगे ठरणार नाही ..
- राज जाधव

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...