विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 1 May 2021

खड्र्याचा किल्ला आणि सुलतानजी निंबाळकर

 खड्र्याचा किल्ला आणि सुलतानजी निंबाळकर

इतिहासलेखन ::सतीश कदम

 संपर्क : ९४२२६५००४४


 

मूळच्या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील हणमंतरावांच्या कारकीर्दीतच त्यांचा मुलगा हैबतराव निंबाळकर हे स्वराज्यासाठी सरलष्कर म्हणून काम करत होते. चांद्याच्या मोहिमेवर असताना १७१४ मध्ये हैबतराव निंबाळकर कामी आले.

हैबतरावांच्या निधनानंतर छत्रपती शाहंूनी त्यांचे सरलष्करपद त्यांचा मुलगा सुलतानजी निंबाळकरांना देऊन गोदावरीकाठी चौथाई व सरदेशमुखीच्या वसुलीचे अधिकार दिले. निजामांबरोबर झालेल्या साखरखेडला व श्रीरंगपट्टणमच्या लढाईत सुलतानजी निंबाळकरांनी फार मोठी कामगिरी बजावली होती. याचवेळी मराठ्यांच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत होत्या. त्यानुसार मराठ्यांच्या दोन गाद्या तयार झाल्या. एक सातारची गादी छत्रपती संभाजीपुत्र शाहंूची तर दुसरी गादी कोल्हापूरची, छत्रपती राजारामांच्या पत्नी ताराबाईंचे सावत्र पुत्र दुसऱ्या संभाजी यांची झाली. या दोन्ही सत्तेत मोठा संघर्ष वाढून शेवटी कोल्हापूरचे छत्रपती संभाजी हे हैदराबादच्या निजामाला जाऊन मिळाले.

याचवेळी शाहूंच्या दरबारात बाळाजी पेशवे आणि त्यानंतर पहिले बाजीराव यांना मराठा सरदारापेक्षा अधिक महत्त्व आले. त्यामुळे छत्रपती शाहंूना सोडून धनाजींचा मुलगा चंद्रसेन जाधव, नेमाजी शिंदे, रावरंभा निंबाळकर, उदाजी चव्हाण यांनीही हैदराबादच्या निजामाकडे जाणे पसंत केले. तरीसुद्धा सुलतानजी शाहूंच्या नेतृत्वाखाली स्वराज्यासाठी झटत होते. त्यावेळी चंद्रसेन जाधव शाहंूना अडचणीत आणण्याची कुठलीही संधी सोडत नव्हते. या चंद्रसेनचाही सुलतानजीने पराभव केला. तरी परंतु बाजीरावांचे दरबारातील महत्त्व वाढून शाहूंच्या मनात संशय निर्माण करण्यात आला आणि त्यामुळे १७२५-२६ ला दुसऱ्यावेळी श्रीरंगपट्टणमची मोहीम काढण्यात आली. त्यावेळी सुलतानजीला स्वारीवर जाण्यापासून अचानकपणे रोखण्यात आले. एवढेच नाही तर त्यांची जहागीर जप्त करण्यात आली.

लागलीच सुलतानजी हैदराबादच्या निजामाला जाऊन मिळाले. शाहूंना आणखी एक धक्का बसला. सुलतानजीचे सरलष्करपद त्यांनी लगेच सुलतानजीचा भाऊ सिंधोजीला दिले. दुसऱ्या बाजूला निजामाने सुलतानजीला ७००० ची मनसबदारी बीड, अंबड, धारूर आणि पाथरीची जहागिरी दिली. यावेळी सुलतानजी निंबाळकरांनी आपला मुक्काम बीड या ठिकाणी ठेवला होता. तेथे त्यांनी जे निवासस्थान बांधले त्याला 'बारादरी' म्हटले जायचे. बारादरी एवढी भव्य होती की, अगदी काही वर्षांपर्यंत बीडचे जिल्हा न्यायालय याच बारादरीत होते. त्यांनी बांधलेली वेसही पाहण्यासारखी आहे.

निंबाळकरांचे बीडमधील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम म्हणजे गावच्या पूर्वेला असणारे खंडोबा मंदिर. हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर अतिशय भव्य असून, मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी व्हरांडा काढलेला आहे. आतल्या बाजूला खंडोबाची भव्य मूर्ती आहे. या मंदिरासमोर अष्टकोणी आकारातील गगनचुंबी दोन दीपमाळा असून, त्यांची उंची २१.३३ मीटर म्हणजे ७० फूट इतकी आहे. दुरून सहज नजर टाकली की, या दीपमाळा लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या मानाने एवढ्या उंच दीपमाळा का उभारल्या असतील, हे समजत नाही.

याच सुलतानजींनी खर्डा या ठिकाणी भव्य स्वरूपातील किल्लेवजा गढी बांधली. याच्या प्रवेशद्वारावर शिलालेख याप्रमाणे आहे. 'उत्तम व गुणवान अमिर व साहेब मरतब राजा सुलतानजी निंबाळकर देशमुख देशपांडे मोकदम महाजन सेटे वगैरे कसबे सिवपट्टणम परगणे जामखेड सरकार अहमदनगर खुजिस्ता बुनियाद औरंगाबाद याचे कारकीर्दीत किल्ला सुलतान दुर्ग कसबे मजकूरची हद्द तारीख २५ माहे शाबान सन ११४६ फसली बरहुकूम माहे हिजरी ११५६ सन मध्ये तयार झाला.' त्यानुसार ३ ऑक्टोबर १७४३ रोजी खड्र्याचा किल्ला बांधून पूर्ण झाला. आपल्या नावावरून त्याला सुलतानदुर्ग हे नाव दिले. याच ठिकाणी १७९५ मध्ये मराठे आणि निजाम यांच्यात इतिहास प्रसिद्ध अशी लढाई झाली. कुठल्याही लढाईला गावावरून नाव पडते. त्यानुसार या लढाईला खड्र्याची लढाई म्हटले जाते. दोन्ही बाजूंचे मिळून २ लाखांची फौज या परिसरात लढली. मराठ्यांच्या भीतीने निजामाने याच किल्ल्यात आश्रय घेतल्यामुळे तो वाचला. पुढे १९४७-४८ च्या स्वातंत्र्य संग्रामात याच किल्ल्याच्या आश्रयाने आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी रझाकारांना सळो की पळो करून सोडले होते. आजही किल्ल्याची तटभिंत अगदी सुस्थितीत आहे. याच सुलतानजींनी खर्डा गावात महादेवाचे मंदिर आणि त्यासमोर बांधलेला बारव पाहण्यासारखा आहे. तर तेथून जवळच असणाऱ्या ईट गावातही त्यांनी बेलेश्वराचे अतिशय देखणे मंदिर बांधलेले आहे.

खड्र्याचा किल्ला बांधून सुलतानजी निंबाळकरांनी निजामाची सोय केली; परंतु ते फार काळ जगले नाहीत. १७४८ मध्ये त्यांचे निधन झाले. सुलतानजी जरी निजामाला जाऊन मिळाले तरी त्यांचे मराठ्यांशी चांगले संबंध होते. त्यानुसार त्यांची मुलगी दुर्गाबाईचा विवाह दौलतराव घाडगे यांच्याशी होणार होता. त्यासाठी त्यांनी मराठा सरदारांना व पेशव्यांना लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत. याशिवाय १७४३ मध्ये रायरीच्या परिसरात राहणारे भिकाजी आणि लक्ष्मणराव राजेशिर्के यांच्यात वाटणीसाठी मतभेद झाले, तेव्हा शाहू महाराजांनी सुलतानजी निंबाळकरांना बोलावून शिर्केंचा न्यायनिवाडा केला होता. तसेच महादजी शिंदे यांच्या पहिल्या पत्नी अन्नपूर्णाबाई या याच सुलतानजीच्या घराण्यातील असाव्यात. त्यांची समाधी बीडजवळील घाटनांदूर या ठिकाणी आहे. खर्डा गावात एक अतिशय कोरीव अशी समाधी आहे ती कदाचित त्यांचीच असावी.

सुलतानजीनंतर त्यांचा मुलगा हणमंतराव गादीवर आले. निजामाने त्यांना मूळची सुलतानजी ही पदवी दिल्याने इतिहासात बराच गोंधळ उडतो. कारण त्यांचाही उल्लेख सुलतानजी नावाने येत असल्याने हे परत कसे आले? असा प्रश्न पडतो. या हणमंतराव ऊर्फ सुलतानजींची कारकीर्दही चांगली असल्याने निजामाने त्यांना धिराज असा किताब देऊन गौरविले. हणमंतरावांचे १७६२ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा धनपतराय गादीवर आला; परंतु ८ एक वर्षांतच त्यांची जहागीर जप्त करण्यात येऊन निजामशाहीतून हे घराणे हद्दपार झाले. खड्र्यामुळे या घराण्याला खर्डेकर निंबाळकर म्हटले जाते. जहागीर गेली तरी पुढेही या घराण्याने आपले वास्तव्य खड्र्यातच ठेवले. अप्पासाहेब निंबाळकर पुढे नावारूपास आले. त्यांचा गावातील वाडा फारच वेगळा आहे. आज सुलतानजी निंबाळकरांचे एकही वारसदार गावात राहत नाहीत. तरी परंतु बीड असेल की खर्डा, रस्त्यावरून जाताना त्यांच्या वास्तू पहिल्या की सुलतानजी निंबाळकरांचा पराक्रम डोळ्यासमोर दिसतो.


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...