छत्रपती शिवाजी महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे
पोस्तसंभार :
Satish Raut : A Poet
जगविख्यात इतिहासकार जदूनाथ सरकार म्हणतात की, शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व आणि पराक्रमाचे मुल्यमापन करावयाचे झाल्यास आधी औरंगजेब समजला पाहिजे. दिल्लीचा मुघल सम्राट आलमगीर औरंगजेबाचे सामर्थ्य, युद्धकौशल्य आणि कर्तबगारीचा अंदाज आला की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य औरंगजेबाच्या डोळ्यांदेखत साकार करून किती अद्वितीय कामगिरी केली याची प्रचिती येते.ज्या पादशाहाच्या क्रौर्याच्या कथा ऐकून लोक हतवीर्य होत त्या औरंगजेबाला शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात भेटले तेव्हा पादशाहाने जवळ पाच-सहा प्रकारची वेगळी आयुधे ठेवली होती आणि आजूबाजूला नंग्या तलवारी घेतलेले पठाण उभे केले होते. यावरून शिवाजी महाराजांच्या दराऱ्याची कल्पना येते.
याउलट थोरल्या बाजीरावांचा समकालीन मुघल सम्राट मुहम्मद शाह जनानखान्यात आणि नाचगाण्यात अधिक मग्न होता, तो युद्धमैदानात मर्दुमकी गाजवणे विसरला होता. इतिहासात मुहम्मद रंगीला नावानेच तो ओळखला जातो. थोरल्या बाजीरावांच्या काळात दिल्लीचा पादशाह शत्रू किती लंपट आणि नेभळट होता याची कल्पना येते. कुठे जिंदा पीर आलमगीर औरंगजेब आणि कुठे मुहम्मद रंगीला ! या परस्परांची कुणी तुलना करावयास घेतली तर त्याचे हसे होईल. थोडक्यात प्रत्येक राजा अथवा सेनानीच्या पराक्रमांची परस्पर तुलना करताना तत्कालिन राजकीय परिस्थिती , शत्रूचे बलाबल, संसाधने, वेळ-काळ हे मापदंड मुल्यमापनासाठी विचारात घ्यावेत अन्यथा निष्कारण एखादा सेनानी गौण अथवा महान संबोधला जाऊ शकतो.
औरंगजेब दख्खनचा सुभेदार असताना आदिलशाह विरूद्ध मोहिमेत महाबली सरदार अफझलखानाने त्याची कोंडी केली होती. यावरून अफझलखानाच्या पराक्रमाची कल्पना येते. शिवाजी महाराजांनी ह्याच क्रूरकर्म्या अफझलखानाला मोठ्या चतुराईने जावळीच्या खोऱ्यात घटपर्णीसारखा ओढून गतप्राण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वपराक्रमाच्या कथा ऐकून ते जीवंतपणी दंतकथा झाले होते. अफझलखानाचा बिमोड , पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिताफीने केलेली सूटका, शाईस्ताखानावर केलेला चित्तथरारक सर्जिकल स्ट्राईक आणि औरंगजेबाच्या मगरमिठीतून केलेली आग्र्याहून सुटका हे पराक्रम आजही अंगावर शहारे आणतात.
पराक्रम म्हणजे विद्युतवेगाने तलवारबाजी करून शे-पन्नास मुडदे पाडणे नव्हे. विना तलवार केवळ मुत्सद्देगीरीच्या जोरावर आणि मानशास्त्रीय युद्ध ( मंत्र युद्धाने) करून देखील विजय साधता येतो. सन त्झू हा जगप्रसिद्ध युद्धतज्ञ म्हणतो की, विना रक्तपात किंवा किमान रक्तपाताने युद्ध जिंकणे ही खरी कला आहे. शिवाजी महाराजांनी ती अप्रतिमरित्या साधली. सन त्झूच्या मते हुशार लढवय्या ‘जो जिंकतो’ त्याला नाही तर ‘जो सहज -विनासायास जिंकतो’ त्याला म्हणतात. शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजयाची मोहिम अशीच होती. ‘मी आलो, मी पाहिले आणि मी जिंकलो’ ह्या ज्युलिअस सिझरच्या उक्तीप्रमाणे शिवाजी महाराजांनी दक्षिण महाद्वीपाच्या जिंजी किल्ल्यापर्यंत विजय प्राप्त केला. उंबरखिंडीचे युद्ध , शाईस्ताखानाच्या सत्तर हजार फौजेला त्याच्यासह पळवून लावणे हे विजय देखील अत्यल्प रक्तपाताचे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी अफाट होती. त्यांना ठाऊक होते की एक दिवस दस्तूरखुद्द औरंग्या पाच लाखाची मोगली फौज घेऊन दख्खनेत दाखल होईल. एकट्या सह्याद्रीच्या साथीने मराठे औरंगजेबाच्या अजस्त्र सैन्याचा आणि तोफखान्याचा सामना करणार नाहीत. त्यामुळे त्याला दक्षिणेत खोलवर खेचण्यासाठी त्यांनी दक्षिण दिग्विजय मोहिम आखली. महाराजांनी दक्षिण मोहिमेत केवळ चौथाई आणि खंडणी यामार्गे केवळ द्रव्य गोळा केले नाही तर तिथे मराठा राज्यव्यवस्था आणली. ही व्यवस्था जातीतीत होती. दक्षिण कर्नाटकातील बहुतांशी ब्राम्हण वर्ग साक्षर असल्याने महाराजांनी सुमारे २० हजार ब्राम्हण समाजातील गरजूंना मुलकी सेवेत घेतले आणि ह्या मोहिमेचे सुत्रधार रघूनाथपंत हनमंते यांना दक्षिण सुभ्याचे प्रधान नेमले. थोरल्या बाजीरावांच्या काळात उत्तरेतील पादशाही खिळखिळी झाली होती. त्यामुळे उत्तर भारतावर प्रशासकीय अंमल आणण्याची नामी संधी पेशव्यांकडे सुत्रे आल्यावर होती.परंतू छत्रपती शिवाजी महाराजांइतकी दूरदृष्टी आणि प्रशासकीय कौशल्य छत्रपती शाहू आणि पेशव्यांमध्ये नव्हते.
दिल्लीच्या पादशाहीला दक्षिणेतील राज्ये कधीही सहन झाली नाहीत. मग ती मुस्लीम राज्यकर्त्यांची असली तरी देखील. शाहजहानने अहमदनगरची निजामशाही बुडवली.औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही वर्षांतच विजापूरची आदिलशाही आणि हैद्राबादची कुतूबशाही नष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र शुन्यातून स्वराज्य निर्माण केले आणि त्यांच्या प्रेरणेने आणि मराठ्यांच्या कर्तबगारीने ते टिकले. थोरल्या बाजीरावांच्या काळात मात्र शेजारीच एक नवे राज्य निर्माण झाले ते कपटी -लबाड निजाम-उल्-मुल्कचे !
१७२० मध्ये दिल्लीच्या बादशाहाने दख्खनची सुभेदारी मुबारिझखानास देऊन त्याला निजामाविरुद्ध रवाना केले. परंतू धुर्त निजामाने माळवा प्रांतात धारजवळ नालछा येथे १८ मे १७२४ रोजी बाजीराव पेशव्यांची भेट घेतली. त्याने हरप्रकारची वचने बाजीरावांना दिली. छत्रपती शाहूंचे धोरण दिल्लीची पादशाही राखून मराठ्यांचा विस्तार करावयाचे होते. त्याचा छत्रपती शाहू आणि थोरल्या बाजीरावांना बहूदा विसर पडला. बाजीराव पेशव्यांनी निजामाची बाजू घेतली आणि १ ऑक्टोबर,१७२४ रोजी साखरखर्ड्याच्या लढाईत मुबाऱिझखानाला कोंडीत पकडून मराठ्यांनी त्याचा धुव्वा उडवला. निजामाने बाजीराव पेशव्यांना सात हजारांची मनसब दिली. ह्या ऐतिहासिक घोडचूकीमुळे निजामाला स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा राजमार्ग तयार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी निजाम-उल्-मुल्क ह्या सापाला वेळीच ठेचले असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामाचे नवे राज्य निर्माण होऊ दिले नसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुलतान कुतूबशाहाने हैद्राबादेत ( तत्कालिन भागानगर ) जंगी स्वागत केले होते त्याच हैद्राबादचा निजाम थोरल्या बाजीरावांना सतत उपद्रव करत राहिला.
सन त्झू म्हणतो की, जर तुम्ही शत्रूला ओळखाल आणि स्वत:ला ओळखत असाल तर तुम्हाला शंभर लढायांच्या परिणामांची पर्वा करण्याची जरूर नाही. परंतू जर तुम्ही फक्त स्वत:ला ओळखता पण शत्रूला ओळखले नाही तर प्रत्येक विजय प्राप्तीबरोबर तुम्हावर पराभव सुद्धा ओढवू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज शत्रूला नेमके ओळखत. उंबरखिंडीच्या लढाईत मोगल कारतालब खानाला त्यांनी जीवदान दिले परंतू उमराणीच्या लढाईत बहलूलखानासारख्या घातकी शत्रूला सोडल्यावर ते प्रतापराव गुजरांवर संतापले. थोरल्या बाजीरावांनी निजामाला प्रारंभी ओळखले नाही आणि घोडचूक झाली.
१७२४ रोजी निजामी राज्य निर्माण झाले आणि उत्तरोत्तर महाराष्ट्राची- देशाची १९४८ पर्यंत डोकेदुखी ठरले. निजामाच्या कारस्थानांनी मराठा साम्राज्यविस्तारात कायम अडथळे निर्माण झाले. निजामाने अतिशय चाणाक्षपणाने राज्य टिकवून धरले. तर दूसऱ्या बाजीरावाच्या काळात पेशवाई १८१८ साली बुडाली आणि इंग्रजांनी सातारचे तैनाती राज्य १८४८साली खालसा केले. निजामशाही मात्र १९४८ पर्यंत तग धरून राहिली.
काही असो ! थोरल्या बाजीरावांचा पराक्रम वादातीत आहे. त्यांच्या पराक्रमाचा घोडा नर्मदेपार चौखूर उधळला. माळवा, गुजरात, बुंदेलखंड प्रांत पादांक्रांत करत तो दिल्लीत जाऊन धडकला. पालखेडच्या जगप्रसिद्ध लढाईत थोरल्या बाजीरावाने अतुलनीय शौर्य,वेग, चापल्य आणि चातुर्य दाखवून निजामाचा पराभव केला. थोरल्या बाजीरावांचे जलदगती घोडदळ निजामाच्या तोफखान्याला भारी पडले. तोफा आग ओकू लागेपर्यंत निजाम चोहीकडून घेरला गेला. उपासमारीची पाळी येऊन त्याला तह करावा लागला. पालखेडची लढाई जागतिक युद्धाभ्यासाचा एक विषय ठरली. थोरल्या बाजीरावांचा दूसरा मोठा पराक्रम म्हणजे भोपाळची लढाई (१७३८) होय. ह्या लढाईत त्यांनी मुघल आणि निजामाच्या संयुक्त फौजेचा पाडाव करून मराठा राज्य साम्राज्याचे दिशेने नेले. एकही लढाई न हरलेला सेनानी अशी त्यांची ख्याती आहे.
थोर इतिहासकार जदूनाथ सरकार म्हणतात की, बाजीराव पेशव्याची भूमिका विजेत्याची होती, प्रशासकाची नव्हती. तो अश्वदलाचा अप्रतिम नेता होता पण व्यवहार कुशल मुत्सद्दी वा दूरदर्शी राजकारणी धुरंधर नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहात केवळ मुत्सद्देगिरीने महत्वाचे किल्ले स्वत:कडे राखले. महाराजांनी पराभवाचे कटू क्षण अनुभवले. पण खचले नाहीत तर पुन्हा मुसंडी मारली. १६७०-८० च्या दशकात स्वराज्यातील किल्ल्यांची संख्या १२ वरून २६० वर नेली. औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी दक्ष राहिले. शिवाजी महाराजांमधील ही स्थितप्रज्ञता त्यांच्या ठायी नव्हती. मस्तानी प्रकरणाने थोरल्या बाजीरावांतील महानता यत्किंचितही कमी होत नाही परंतू गृहकलहाने ते निराश झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला कलहाने कधी खीळ बसली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचे द्रष्टेपण पेशव्यांकडे नव्हते. त्यांनी नव्या बदलाची चाहूल घेऊन तोफखाना दल सुसज्ज करावयास हवे होते. परकीयांची ताकद वाढू लागली होती. त्यांना शह देण्यासाठी एत्तदेशीयांची एकजूट करणे त्यांना शक्य होते. इराणचा नादिरशाह दिल्लीत येऊन मुघल सल्तनत ओरबाडून-लूटून, प्रचंड नरसंहार करून गेला. दिल्लीच्या तख्ताला त्यावेळी संरक्षण देणे मराठ्यांना शक्य झाले नाही. अर्थात ती एकट्या थोरल्या बाजीरावाची जबाबदारी नव्हती. थोरल्या बाजीरावांच्या पराक्रमामुळे नर्मदातीरापासून अटकेपार दरारा निर्माण झाला हे नाकारून चालणार नाही. मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार, तुकोजी पवार, पिलाजी जाधव वगैरे शूर सरदारांच्या साथीने त्यांनी उत्तरेत जी धामधुमी केली त्याला तोड नाही.
मराठ्यांच्या इतिहासात त्यांच्या कर्तृत्वाची नोंद छत्रपती शिवाजी महाराज-संभाजी महाराज यांच्या नंतर जरूर घ्यावी लागेल. हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि स्वराज्य विस्तारक दोन्हींची दखल इतिहास घेईल. अनैतिहासिक स्त्रोतांचा विचार करू नये. मराठा साम्राज्य केवळ मराठा जातीचे नव्हते. ते अठरापगड जातींचे- रयतेचे होते याचा विसर तुम्हा-आम्हास पडल्यामुळे असे होत आहे.
No comments:
Post a Comment