साम्राज्यकर्ते हिंदुपती छत्रपती शाहू महाराज ...
छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली शिवराई पुढे संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि मग शाहू महाराजांनी आपल्या स्वतः च्या नावासह सुरू ठेवली. छत्रपती शाहू महाराजांची शिवराई कोणती असा प्रश्न वारंवार विचारला जातो, त्यावर शक्यता वर्तवल्या जातात. यात confusion असण्याचे कारण म्हणजे घराण्यात एकाच नावाने गादीवर आलेले अनेक छत्रपती! पण यात काही गोष्टी आहेत ज्याचे निरीक्षण करून आपण आपले मत मांडू शकतो.
त्यातील पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली शिवराई ही एकदांडी प्रकारातील होती (नंतरच्या काळात दुदांडी शिवराई आल्याने हिला एकदांडी म्हणून संबोधत आहे). श्री. न. वि. जोशी हे त्यांच्या पुणे वर्णन (पहिली आवृत्ती- 1868) पुस्तकात लिहितात की 'सन 1786 म्हणजे शालिवाहन शके 1708 मध्ये पराभव नाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा या वर्षी दुल्लभ शेठ सावकार यांनी दुदांडी पैसे पेशवे यांच्या हुकुमाने बाजारात चालू केले, हे पैसे त्यांनी नवे पाडले त्याकरिता पुणे येथे टांकसाळ घातली होती'. हा उल्लेख दुदांडी शिवराई बद्दल असावा. (ही दुदांडी शिवराई देखील 'छत्रपतींच्या नावानेच टांकसाळीत होत होती'. इतर कोणत्याही नावाने या शिवराईना न संबोधता शिवउत्तरकालीन शिवराई किंवा शाहूकालीन शिवराई म्हणावे.) इथे 'नवे पैसे' याचा अर्थ की सुरुवातीची नाणी एकदांडी होती आणि ही नाणी त्याहून वेगळी दुदांडी होती. याचा अर्थ इ स 1786 पूर्वी छत्रपतींची एकदांडी असलेली नाणी चलनात होती. थोरल्या शाहूंचे निधन इ स 1749 ला झाले. याहून निष्कर्ष निघतो की 'शाहूंच्या नावे असलेली दुदांडी प्रकारातील शिवराई थोरल्या छत्रपती शाहुंची नाही तर त्यानंतरच्या शाहुंची आहे'.
एकदांडी प्रकारातील शिवराई चा अभ्यास करताना काही वेगवेगळी नाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यात थोरल्या शाहू छत्रपतींची असावी अशी नाणी काही सांगता येतात. काही नाणी 'शाव' असलेली आहेत तर काही 'साव' असलेली.
जेम्स ग्रँड डफ ने 'मराठ्यांचा इतिहास' ही बखर लिहिली. त्या बखरीतील 12 व्या भागात सुरुवातीलाच तो लिहितो की 'पूर्वी मोगलांनी रायगड घेतला ते समय तेथे संभाजीचा पुत्र व स्त्री सापडली, ती त्यांनी बादशहाकडे नेली ती उभयता औरंगजेबाने आपल्या कुटुंबाच्या माणसात ठेविली. त्यावर बादशहा ची कन्या बेगम साहेब अत्यंत प्रीति करू लागली आणि त्या पुत्राला सारा वेळ आपणाजवळ बाळगीत असे. तेथे औरंगजेब तेव्हा त्या मुलास पाहून बहुत संतुष्ट होत असे. त्याच्या बापाचा चोरटेपणा मनात आणून त्याला 'सावा' च्या नावे 'शाहू' म्हणुन थट्टेने हाक मारी. मग तो मोठा झाला तरी त्याने आपले तेच नाव चालविले'
या लिखाणातून काही गोष्टी स्पष्ट होतात. शाहू महाराजांना 'साव/ सावा' असे देखील म्हटले जात असे असे दिसते. आता नाण्यांकडे वळल्यास आपल्याला काही नाणी सापडतात ज्यावर 'श्री/ राजा/ साव, छत्र/पती', ''श्री/ राजा/ सावा, छत्र/पती'' असे लिहिलेले आहे. वरील लिखाण आणि प्रत्यक्ष नाण्यांचा आधार घेऊन 'एकदांडी प्रकारातील 'श्री/ राजा/ साव, छत्र/पती' लिहिलेले नाणे थोरल्या छत्रपती शाहू महाराजांची आहेत' असे म्हणू शकतो. तसेच 'श्री/ राजा/ शाव, छत्र/पती' अंकित नाणीदेखील शाहुंचीच असावी.
दुदांडी नाणी उत्तरकाळात सुरू झाली त्यामुळे आता त्यात confusion नको. फोटोत दाखवलेली नाणी एकदांडी आहेत.
थोरल्या छत्रपती शाहू महाराजांच्या नाण्यांबाबत आणखी एक नोट करण्यासारखी गोष्ट म्हणजे या नाण्यांवर अंकुश, शिवपिंड तसेच चंद्रकोर असे चिन्ह येतात (कमेंट मध्ये ही नाणी देखील पोस्ट करतो). ही नाणी तांबे धातूत आणि 9- 11 ग्राम वजनात येतात. शिवाजी महाराजांच्या शिवराईप्रमाणे यावरदेखील बिंदूमय वर्तुळ असते. ही नाणी नेमकी कोणत्या काळात आणि कोणत्या ठिकाणी टांकसाळीत केलेली असतील हे सांगणे कठीण आहे.
याबाबत काही प्रश्न असतील किंवा अधिक माहिती आपल्याकडे असेल तर कमेंट मध्ये कळवा. काही अधिक संदर्भ आपल्याकडे असतील तर ते ही सांगा.
अशी आहेत थोरल्या शाहू छत्रपतींची नाणी!!
आपल्याला ही माहिती आवडली असेल अशी आशा.
इस्तंबूल जिंकण्याची आशा बाळगणाऱ्या हिंदुपती छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा !!! 





- आशुतोष सुनील पाटील.
No comments:
Post a Comment