विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 3 May 2021

गिर कर उठना सिखाते है आझाद !'

 


गिर कर उठना सिखाते है आझाद !'
आझाद म्हणजे आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही इतिहासात बर्यापैकी गुमनाम राहिलेलं हे व्यक्तीमत्व.
आझादांनी आपल्या आयुष्यात कायम राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठीच आपलं तम मन कार्यरत ठेवलं.
आझादांच्या बर्याच गोष्टी अशाही असतील ज्या आजपर्यंत इतिहासकारांना माहितही नसतील.
पण आझादांच्या आयुष्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे आझाद कधी थांबले नाहीत.
याची उदाहरणं म्हणजे जेव्हा काकोरी ट्रेन लुटली गेली तेव्हा अटकसत्रात संघटन जवळपास कोलमडलं होतं आणि हाच प्रकार भगतसिंह-सुखदेव-राजगुरु यांच्या अटकेच्या काळात झाला पण दोनही वेळेस आझादांनी परिस्थिती सावरुन घेतली.
काकोरी प्रकरणावेळी चंद्रशेखर आझाद बर्यापैकी तरुण म्हणजे जवळपास किशोरवयीन होते.
हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे प्रमुख रामप्रसाद बिस्मिल यांना तर वाटायचं की जर काही अटकसत्र झालं तर आधी हा किशोरवयीन आझाद पकडला जाईल पण नेमकं उलटं झालं.
काकोरी ट्रेन लुटीनंतर HRA चे तब्बल 40 पेक्षा जास्त क्रांतिकारक ठिकठीकाणी पकडले गेले पण क्विक सिल्वर म्हणजेच चंद्रशेखर आझाद काही ब्रिटीशांच्या तावडीत सापडले नाहीत.
याला बरीच कारणंही होती.
कधी कुठला सोबती निश्चित ठिकाणी यायला उशीर लावत असेल तर लगेच तो रहाता मुक्काम बदलायचे,कुणी सोबतचा अटक झाला असेल तर लगेच संबंधीत गावांमधली संघटनेची ठिकाणं साफ करुन ते निसटायचे.
याच प्रकारांमुळे ते कधी फितुरीमुळं सापडले नाहीत किंवा कधी कुठल्या पोलिस छाप्यात पकडले गेले नाहीत.
कमालीची चलाख वृत्ती,भेदक-शोधक नजर अशा गोष्टींमुळं आझाद अजिंक्य होते.
काकोरीमधे सारे मातब्बर,महत्वाचे आणि अनुभवी साथिदार अटक झाल्याने आझाद तसे बर्यापैकी एकटे पडले होते पण आझाद थांबले नाहीत.
त्यांनी पार्टीची नवी मोट बांधायला सुरुवात केली आणि भारतीय स्वातंत्र्याची ही क्रांतिकारी चळवळ कुठल्याही परिस्थितीमधे सुरुच ठेवली.
भगतसिंह,सुखदेव,राजगुरु,शिव वर्मा,गयाप्रसाद,किशोरीलाल आणि अशा अनेक तरुणांची फळी उभी केली
मन्मथनाथ गुप्त,भगवानदास माहौर,विश्वनाथ वैशंपायन अशा अनुभवी लोकांशी त्यांची साखळी बांधली आणि कार्य युद्धपातळीवर सुरु ठेवलं.
असाच दुसरा प्रसंग भगतसिंह,राजगुरु,सुखदेव यांच्या अटकसत्रावेळी प्रसंगावेळी झाला.
असेंबलीत बाॅम्ब टाकल्यानंतर भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त तुरुंगात गेले,त्यानंतर काहीच दिवसांमधे दिल्लीतुन सुखदेव आणि साथिदारांना अटक करण्यात आली.
इकडे पुण्याला राजगुरुंकडं हत्यारं नेण्यासाठी निघालेल्या वैशंपायन आणि माहोरांना भुसावळ रेल्वे स्थानकावर अटक झाली.
माफिच्या साक्षिदारांनी पार्टीची ठिकाणं पोलिसांना सांगितली त्यामुळं बरीच ठिकाणं पोलिसांना कळाली अटकसत्रे झाली.
पुण्यातुन राजगुरुंना अटक करण्यात आली.
रावीच्या तटावर बाॅम्बचं परिक्षण करताना भगवतीचरण व्होरा हातात बाॅम्ब फुटुन मरण पावले.
या अशा एकापाठोपाठ एक बसणार्या हादर्यांमुळं आझाद संघटनेच्या दृष्टीने परत एकदा नाजुक परिस्थितीतुन जात होते पण अशीच आणीबाणी त्यांनी काकोरीवेळी अनुभवली होती.
आझादांनी त्याही परिस्थितीत कार्य सुरुच ठेवलं होतं.
या दोनही मोठमोठ्या घटनासत्रांवेळी आझाद हे स्थितप्रज्ञ होते.
दोन्ही वेळी त्यांनी परिस्थिती सावरुन धरली.
एका कसलेल्या सेनानायकाच्या मातब्बरीनं प्रत्येक वेळी आझादांनी संघटन,क्रांतिकार्य सुरुच ठेवलं.
दोन्ही वेळी संघटन नव्याने सुरु करण्याची वेळ आझादांवर आली होती.
एकेक साथीदार गवतातुन सुई शोधल्यासारखा शोधावा लागत होता,जोडावा लागत होता..
तरीही आझाद सातत्यानं दोन्ही वेळेस कार्यरत राहिले.
कशाही परिस्थितीत..
सर्व उभा केलेला खेळ शुन्यावर आला तरीही थांबायचं नाही हेच तर शिकवतात आझाद आपल्याला..
कितीही पट उधळले तरी नव्याने सारिपाट मांडायला,नव्याने सोंगट्या रचायला आणि नव्याने डाव टाकायला शिकवतात आझाद..
सतत लढत रहायला शिकवतात आझाद..
'गिर कर उठना सिखाते है आझाद !'
- विशाल गवळी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...