विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 May 2021

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे हिंदूनृपती पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज.

 


छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे हिंदूनृपती पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज.

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्माविषयी नोंदी :
१) वैशाख वैद्य ७ दुदूंभी नाम संवत्सरे शके १६०४ गुरुवारी संभाजीराजे यांसी पुत्र जाला सिवाजीराजे नाव ठेविले
२) राजश्री संभाजीराजे यांस गंगोलीस पुत्र जाला शके १६०४ दुदूंभी नाम संवत्सरी वद्य सप्तमी जन्म झाला, नाव शिवाजीराजे ठेविले.
- संदर्भ : जेधे शकावली, करीना, खरे जंत्री
शाहूराजांविषयी चे बालपणातील अधिक विस्तृतपणे संदर्भ आढळून येत नाही, इ.स. १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगड शत्रूच्या ताब्यात गेला, स्वराज्यावर अतिशय बाका प्रसंग ओढवला होता अशाही परिस्थितीत महाराणी येसूबाईसाहेब यांनी प्रसंगावधान राखत अतिशय धीरोदात्तपणे त्यांनी या प्रसंगाला तोंड दिलं. राजाराम महाराज यांचे मंचकरोहन करून त्यांना जिंजीस जाऊन राज्यकारभार करण्याची आज्ञा केली व स्वतः मुलगा बाल शिवाजीराजे (शाहूराजे) यांच्यासमवेत मुघलांच्या कैदेत गेल्या.
औरंगजेबाची कैद :
औरंगजेब हा किती क्रूर, धर्मांध आणि कपटी होता हे आपण विविध साधनांतून वाचलेलच असेल, स्वतःच्या बापाची, भावाची आणि एका मुलाची हत्या करताना त्याला काहीच वाटलं नाही इथंतर शाहूराजे म्हणजे त्याच्यासाठी शत्रूच.
औरंगेजबाची कैद म्हणजे शाहूराजांसाठी सोन्याचा पिंजरा होता, सोयीसुविधा होत्या पण सक्त पहारा त्यांच्यावर असे, औरंगजेबाचा तंबू गुलालबारीच्या भागातच शाहूराजांचा तंबू होता. सुरुवातीला सोयीसुविधा भरपूर होत्या म्हणजे औरंगजेब देखील शाहूराजांना रत्नजडित कट्यारी, तलवारी, हत्ती, घोडे भेट द्यायचा पण त्यामागे स्नेहपूर्ण भाव नसून त्याचं वेगळंच राजकारण होतं, म्हणजे शाहूराजांचा सांभाळ करून नंतर त्यांचा उपयोग मराठ्यांमध्ये दुही माजवण्यासाठी करायचा.
पातशाही कैदेत असताना शाहूंचे लग्न रुस्तुमराव जाधव यांची कन्या अंबिकाबाई आणि कण्हेरखेडकर शिंदेंची कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला. लग्नतारखेबद्दल एकमत नाही ( १७०३- १७०४ )
नंतरुन औरंगजेबाची छावणी जिकडे जायची त्याबरोबर या मायलेकांना जावं लागे त्यामुळे त्यांची फार दैन्यावस्था झाली, महाराणी येसूबाईंचे चिंचवडच्या मोरया गोसावी देवस्थानाला लिहलेलं पत्र वाचताना अंतःकरण भरून येते.
औरंगजेबाने शाहूंराजांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला होता पण येसूबाईसाहेबांनी त्याला विरोध केला.
कैदेतून सुटका :
१७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आजमशाहा याने दिल्लीकडे प्रयाण करताना शाहूराजांना देखील सोबत घेतले पुढे नर्मदेपार गेल्यावर झुल्फिकारखान, झीनतउन्निसा वगैरेंच्या सल्ल्याने आजमशहाने शाहूराजांची मुक्तता केली. (अंदाजे १ मे)
साम्राज्याकडे वाटचाल :
दक्षिणेत परत येताना शाहूराजांनी सातपुडा डोंगररांगातून खान्देशचा मार्ग निवडला, निघताना शाहू महाराजांसोबत शे पन्नासहून अधिक फौज नव्हती असं रियासतकार नमूद करतात पण मुघली साधनांत ५०० स्वार तरी होते असं नमूद आहे.
वाटेत त्यांना सृजनसिंह रावळ, परसोजी राजे भोसले, रुस्तुमराव जाधवराव त्याचबरोबर अनेक सरदार येऊन मिळाले.
सरदारांना उपदेश :
तुमच्या हातात पैसा नाही, आमच्याही नाही. मुलुख सगळा तुमचा आहे. फौजा जमवा, सोईस येईल तिकडे संचार करीत जा, ठाणी बसवा, वाडे बांधा, वसाहती करा, उद्योगधंदे व्यापार करा. अनाचार व द्वेष कुणाचा करू नका, म्हणजे राष्ट्राचे भाग्य उदयास येईल.
यातील शेवटचं वाक्य शाहूराजे किती मृदू स्वभावाचे होते हे ध्यानात येईल.
पारद गावची घटना आणि फत्तेसिंहराजे:
१७०७ साली छत्रपती शाहूराजे कैदेतून सुटल्यानंतर भोपाळच्या वायव्येहून दक्षिणेत येत असताना शिवणेर परगण्यातील पारद गावी ते आले, तिथे शहाजी लोखंडे पाटलाने शाहू राजांच्या सैन्यावर हल्ला केला, कारण पाटलांनी शाहूराजांसोबत येण्यास नकार देऊन त्यांच्या विरोधात उभे राहिले तेव्हा त्यांनी पाटलास ठार केले त्यांनंतर पाटलाच्या पत्नीने तिचं मुल शाहूंच्या पायावर घालून अभय मागितले, ती म्हणाली "यास वाचवावे, अन्यायी होते ते मारले गेले, हे मुल आपणांस वाहिले आहे." ठाणे फत्ते झाले ते समयी महाराजांनी त्या मुलाला आपलं नाव देऊन त्या मुलाचे नाव 'फत्तेसिंहराजे भोसले' असं ठेवलं. त्याचे आईस आश्वासन देऊन लूटमार बंद करवून, कौल देऊन वसाहत करणेस सांगून मुक्कामास आले.
इथं आठवण आली ती थोरल्या छत्रपती महाराजांची बेलवडीच्या गढीच्या सावित्रीबाईंची सुद्धा महाराजांनी आदर करून त्यांना व्यवस्था लावून दिली होती.
फत्तेसिंहबाबाची व्यवस्था ही राजपुत्राप्रमाणे लावून सांभाळ केला, शाहूंनी फत्तेसिंहराजे यांना पहिली मोहीम दिली ती १७२५ ला चित्रदुर्ग, कर्नाटक त्यांच्या मदतीसाठी पिलाजी जाधवराव, बाजीरावसाहेब पेशवे, त्रिंबकराव दाभाडे, प्रतिनिधी घोरपडे यांनी फत्तेसिंहाच्या मोहिमेत चित्रदुर्गपासून ते बिदनूर पर्यंतच्या खंडण्या वसूल केल्या.
सहा सुभ्यापैकी कर्नाटकचा सुभा महत्वाचा असल्याने ही मोहीम व सुभा फत्तेसिंहांना दिला.
तंजावरचे आपल्या बंधूंपैकी सरफोजीराजे भोसले तंजावर ला संस्थान चालवत होते, त्यांना शाहूंनी खास भेट घेण्यासाठी फत्तेसिंगांना सांगितले, आणि त्यांची आदरपूर्वक भेट घेऊन त्यांना त्रास देत असलेला अर्काटच्या नवाबाचा बंदोबस्त करून सरफोजींना दिलासा दिला.
केवळ १८ वर्षांचे असताना ही मोहीम फत्तेसिंगांनी अतिशय चोखपणे बजावली, थोरल्या स्वामींनी तंजावर, कडाप्पा, तिरुपती, येलूर, अर्काट, जिंजी असे दक्षिणेत निर्माण केलेले स्वराज्य पुन्हा फत्तेसिंहांनी सुरक्षित करून सरफोजींना फार मोठा आधार दिला.
शाहू महाराजांच्या उपस्त्री म्हणजेच विरुबाई या शाहूराजांच्या अत्यंत प्रिय होत्या, फत्तेसिंहबाबांवर त्या पुत्रवत प्रेम करत, शाहूराजांनी विरुबाईंचे अक्कलकोटचे इनाम त्यांच्या पश्चात फत्तेसिंहबाबा यांना दिले.
राज्याभिषेक आणि अष्टप्रधान
कैदेतून सुटून आल्यावर सुद्धा त्यांना महाराणी ताराराणीसाहेब यांच्याशी संघर्ष करावा लागला. पुढे १२ जानेवारी १७०८ ला छत्रपती शाहू महाराजांनी सातारा येथे विधिवत राज्याभिषेक करून घेतला
छत्रपती शाहू महाराजांचं सुरुवातीचं अष्टप्रधान
१.बहिरो रामेश्वर पिंगळे - प्रधान
२. धनाजीराव जाधवराव - सरसेनापती
३. नारो शंकर - सचिव
४. रामचंद्र पांडे - मंत्री
५. महादजी गदाधर - सुमंत
६. अंबुराव हणमंते - अमात्य
७. होनाजी अनंत - न्यायाधीश
८. मुद्गलभट - पंडितराव
★ नारोशंकर गांडेकर हे शंकराजी नायरायण यांचे पुत्र (भोर संस्थान)
त्यानंतर पिलाजीराव जाधवराव, बाळाजी विश्वनाथ पेशवे, थोरले बाजीरावसाहेब त्याचबरोबर किती नावं घ्यावी कारण शाहुपर्वातील मुख्य सरदारांची यादीच शेकड्यात आहे. सबंध शाहुपर्व एका लेखातच काय चित्रफीतीत सुद्धा मांडणं म्हणजे निव्वळ अशक्यप्राय गोष्ट, आपण या लेखात प्रत्येक सरदारांना न्याय नाही देऊ शकणार पण आगामी काळात यांविषयी नक्कीच लिहीन.
राजमुद्रा :
श्री वर्धिष्णूर्वीक्रमे विष्णो: | सा मूर्तीरिव वामनी |
शंभुसूतो रिव | मुद्रा शिवराजस्य राजते ||
अर्थ : जी वामनावतारातील विष्णुप्रमाणे विक्रम, पराक्रमात वाढ करणारी ही शंभुपुत्र शिवराजाची मुद्रा शोभून दिसते.
शाहूराजांची धर्मनिष्ठा :
छत्रपती शाहू महाराज हे आपल्या आजोबा आणि पित्याप्रमाणेच किती धर्मनिष्ठ आणि धर्माभिमानी होते याची प्रचिती पुढील प्रसंगांवरून येईलच,
कैदेत असताना शाहूराजांनी कैद्यांना देण्यात येणारं अन्न सेवन करण्यास मनाई केली होती कारण हिंदू धर्म शास्त्रानुसार कैद्यांकरिता शिजवण्यात येणारं अन्न वर्ज्य असतं त्यामुळे त्यांनी ते अन्न टाळून फक्त सुकामेवा मिठाईचे सेवनच सुरू ठेवले, त्यामुळे प्रकृती थोडी ढासळली ही बातमी औरंजेबापर्यंत गेली आणि मग त्याने शाहूराजांना घराप्रमाणे अन्न शिजवून खाऊ शकता याची परवानगी दिली.
या उदाहरणातून शाहूराजांची धर्मनिष्ठा किती ज्वलंत होती हे दिसून येतं.
दुसरा एक प्रसंग असा की, गोव्यातील पोर्तुगीजांनी त्या भूमीतील हिंदूंवर अनन्वित अत्याचार छळ चालू केला होता, तिथेच केलोशी गावात शांतादुर्गा देवीचे देऊळ पोर्तुगीजांनी उध्वस्त केलं, स्थानिकांनी ती मूर्ती गुपचूप केवळे गावी स्थापन केली, पुढे शाहूंच्या काळात गोवा त्यांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी शांतादुर्गा देवीचे मंदिर बांधायला घेतले. १७३० - १७३९ असे तब्बल ९ वर्ष बांधकाम चालून ते मंदिर पूर्णत्वास आलं. गोव्यात बांधण्यात आलेले ते सर्वात मोठे मंदिर होते. देवीच्या खर्चासाठी वेगळं गाव ईनाम देण्यात आलं, आपले आजोबा शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्यात सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार केला हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत फक्त शांतादुर्गाच नव्हे तर जवळच असणारे नागेशी आणि मंगेशी मंदिरांचाही जीर्णोद्धार करवून घेतला.
व्यापारविषयक धोरण :
साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा, साहूकाराकरिता राज्य अबदान होते, न मिळे वस्तुजात राज्यात येते. राज्य श्रीमंत होते. पडिले संकट परिहार होते. साहूकारांच्या संरक्षणामध्ये बहुत फायदा आहे. - आज्ञापत्र
शिवरायांचा हाच सावकार आणि व्यापारविषयक दृष्टिकोन समोर ठेवून शाहूराजांनी सुद्धा पाऊल उचललेले दिसतात. सावकारांना पाठबळ देऊन त्यांनी आपल्या राजधानीतच येऊन व्यवहार करावा म्हणून त्यांना प्रोत्साहनपर पत्र लिहलं आहे,
" मनोहरदास सावकार वसती सुरत यांस दिले अभयपत्र ऐसें जे तुम्ही सातारियास येऊन सावकारी करावी ऐसी उमेद धरून भवानीशंकर व मेहेरमंद यांची हुजूर येवून विदित केले. ऐशास तुम्हास सावकार लोकांचा संग्रह करावा हे स्वामींस अगत्य आहे. तरी कोणी विशी शंका न धरितां येथे सावकारी व्यवसाय करून सुखरूप राहणे, कोणे बाबे आजार लागणार नाही." ( १९ मे १७२५ )
पुढे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी सुद्धा व्यापारविषयक धोरणं यशस्वीपणे साताऱ्यात राबवलेली दिसून येतात.
प्रजेची काळजी :
आपल्या पूर्वजांप्रमाणेच स्वतः शाहूराजांना देखील रयतेची किती काळजी होती याची खूप सारी पत्रे आहेत, नमुन्यादाखल एकच देतो,
" गाव जाळून गुरे ढोरे नेली. बायका आणि बंद नेला म्हणून विदित झाले. ऐशास गांवाचा सत्यानाश करावा, बंद धरून नेऊन नानाप्रकारचा उत्पात करावा हे गोष्ट काही बरे नव्हें. भावबंदाचा कजिया असेल तर त्यांसीच समजोन द्यावा. मुलखाशी तालुखा काय आहे ? हल्ली हे पत्र सादर केले असे. मुलखात धामधूम न करणे. येथील मालमत्तेशी गुरे ढोरे नेला असेल तो फिरोन देणे."
पूर्वर्जांचे स्मरण :
◆ आपले पणजोबा महाबली शहाजीराजे महाराजसाहेब यांच्या समाधी वृंदावनाच्या व्यवस्थित देखभालीसाठी शाहूंनी ताकीद दिलेलं १७३२- १७३३ सालचं पत्र उपलब्ध आहे, आपल्या पिता, आजोबाप्रमाणेच पणजोबांबद्दलही आस्था, प्रेम असलेले शाहूराजे.
◆ शाहूराजांनी वढू- बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी वृंदावन सन १७१५ पूर्वीच बांधून घेतले होते. त्यासंदर्भात २ कागदपत्रे आहेत. त्यात नैवेद्य, धूप व बाग करण्यासाठी तसेच अन्नछत्रसाठी केलेल्या सोयीची नोंद आहे त्याचबरोबर १७३३ साली एका कागदात वृंदावनाच्या झाडलोटची सोय केल्याची नोंद आहे.
◆ रायगड म्हणजे अखंड हिंदुस्थानवासीयांच्या मनातील मानबिंदू, छत्रपती घराण्याचं तर ते निवासस्थानच. थोरल्या महाराजांची समाधी त्या गडावर, तो गड अद्याप शत्रूच्या ताब्यात होता ही सल शाहूंराजांच्या मनात होती. त्यांनी रायगड स्वतंत्र करण्याचं ठरवलं, झालं मोहीम ठरली. अनेक मातब्बर सरदारांना मोहिमेसाठी रवाना केल्या गेलं. मोहिमेचे नेतृत्व होते फत्तेसिंहराजे आणि थोरले बाजीरावसाहेब यांच्याकडे. या मोहिमेत एवढे मराठी सरदार एकवटले होते की यानंतर पुढे एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त पानिपतवरच सारे सरदार एकवटल्याचे दिसून येतात. एवढे सरदार एकत्र येण्याचं कारणही तसंच होतं, रायगड हा छत्रपतींसाठी आणि अवघ्या हिंदुवासीयांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा होता. अखेर रायगडाने स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला. रायगडाचा सुवर्णकाळ पुन्हा चालू झाला. रायगड घेणं गरजेचं होतं हे शाहूराजे जाणून होते, १६८९ ची घटना ते विसरले नव्हते. काहीही झालं तरी तो तख्ताचा गड होता.
छत्रपती शाहू महाराजांची साधी राहणीमान :
- थोरले शाहू महाराज हे साधू प्रवृत्तीचे राज्यकर्ते होते, हे आपल्याला त्यांच्या अनेक समकालीन चित्रांमधून दिसून येईल. त्यांची जी काही चित्रे उपलब्ध आहेत त्यामध्ये कुठेही उंची दागिने, भरजरी वस्त्रे दिसून येत नाही. सर्वच चित्रांमध्ये ते पायात एक विजार आणि अंगावर एक शेला घालत असल्याचे दिसून येते. आणि चित्रात पशु पक्षी सुद्धा दिसून येतात. शाहूराजे हे प्राणिप्रेमी देखील होते हे दिसून येते.
त्यांचा लाडका खंड्या नावाचा एक श्वान होता. खंड्या हा साधासुधा कुत्रा नसून त्याला पाच हजारी ईनाम आणि पालखीचा मान होता.
दरबारातील एक किस्सा आहे, कुठल्याही सरदाराने नगरात येताना नगरापासून दूर काही अंतरावरच नौबती बंद ठेवाव्यात असा हुकूम असताना एक सरदार मात्र मोठ्या तोरात किलोभर दागिने घालून ऐटीत दरबारात येत होता त्यासमयी शाहूराजांच्या सेवकाने शाहूराजांना सांगितले की सरदार भेटीस येत आहेत जलदी पागोटे घालून सदरेवर यावे, शाहूराजांना राग आला ते म्हणाले सरदार आमच्या भेटीस येत आहेत की पागोट्यांच्या ?
त्यांनी त्या सरदाराला अद्दल घडवण्याचं ठरवलं. त्यांनी खंड्या कुत्र्याला नखशिखांत अलंकृत करून आपल्या शेजारी बसवलं आणि स्वतः एक विजार आणि शेला पांघरून बसले. सरदार दरबारात आल्यावर समोरील दृश्य बघून तो खजील झाला. बाह्य दिखावा, डामडौल यावर पुरुषार्थ ठरत नसून खरा पुरूषार्थ हा पराक्रमात आहे कर्तृत्वात आहे हे न बोलताही दाखवून देणारे शाहूराजे.
अखंड हिंदुस्तानचा स्वामी असणाऱ्यांना कुठल्या गोष्टीची आस असेल.
अमर्यादा केलियाने राजकारणाचा दोर तुटतो.
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या सरदारांना उपदेश केला होता की दिल्लीचे तख्त ताब्यात घेऊ नये. म्हणजेच किंग होऊन गादीवर बसण्यापेक्षा किंगमेकर होऊन दरबाराचे निर्णय आपण घेतले पाहिजे अशी भूमिका त्यामागे होती.
याची प्रचिती एका घटनेवरून लक्षात येईल.
दिल्लीवर मराठ्यांनी अनेकदा धडक मारली पण तख्त काबीज केलं नाही, एकदा श्रीमंत थोरल्या बाजीरावसाहेबांनी दिल्लीवर धडक मारून जेव्हा जत्रेत धुडगूस घातला होता त्यावेळेस दिल्लीचा बादशहा प्रचंड घाबरून पळून जाण्याच्या तयारीत होता, तेव्हा दिल्ली जवळपास हस्तगत झालीच होती पण राऊंनी तख्त काबीज केलं नाही, त्यावेळचं राऊंचं पत्र फार सुंदर आहे त्यात ते म्हणतात, "दिल्ली तो महास्थळ, अमर्यादा केलियाने राजकारणाचा दोर तुटतो" असे म्हणत दिल्ली काबीज केली नाही.
शाहूराजांचं राऊंवर खूप प्रेम होतं आणि राऊंनीदेखील शाहूंनी टाकलेल्या प्रत्येक जबाबदारी लीलया पेलून त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवला.
शत्रुलाही ज्यांचं कौतुक करावं वाटलं असे शाहूराजे:
म्हणो लागले मोंगलाईत बंदगानअली होते. मऱ्हाट राज्यात शाहू राजे होते. यैसे माणूस पुढे होणार नाहीत. सर्व राज्य स्वामीस सोपवून गेले. छत्रपतीसारखा राजा होणे नाही. राज्ये बरे नांदविले, अजातशत्रू होते.
- निजाम उल्मुलकचा नातू मुजफ्फरजंग
"सर्व शुरांत श्रेष्ठ, सर्व उमरावांत थोर" - बहादुरशहा
"सुश्रेष्ठ, फरमावरदारी के इरादो मे पक्के राजा शाहू"
- नसरतजंग
" १७४९ साली जेव्हा शाहुजींचा मृत्यू झाला, तेव्हा मराठ्यांचे साम्राज्य पश्चिमी समुद्रापासून ते ओडिशापर्यंत, आग्रा पासून कर्नाटकापर्यंत आणि जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थानावर पसरले होते. ते प्रत्येक युद्ध आणि राजकीय निर्णयामध्ये अग्रेसर प्रभावी असल्याचे दिसून येत होते.
- Memoir of Hindustan या तत्कालीन युरोपियन मासिकातले शाहूराजांचं वर्णन
खरंतर अखंड शाहूचरित्र या एका लेखामध्ये मांडणं अवघड. कारण शाहूपर्वाचा कालखंड खूप प्रदीर्घ आहे. आगामी काळात त्यांच्या सरदारांविषयी सविस्तर लिहीनच, तूर्तास इतकंच.
आज भरतवर्षसम्राट पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू महाराज यांची जयंती, त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनातील काही अल्पशा घटनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.
लेखन : रोहित पेरे पाटील
संदर्भ :
जेधे शकावली, करिना
थोरले शाहू महाराज चरित्र - चिटणीस
आज्ञापत्र
मराठी रियासत खंड ३ मध्य विभाग
इतिहास उद्गारांचा - निनाद बेडेकर
मुघल दरबाराची बातमीपत्रे
छत्रपती शाहू महाराज चरित्र - आसाराम सैंदाणे
Memoir Of Hindustan - European Magzine

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...