कोल्हापुरातला श्रीकृष्ण आणि अठराशे सत्तावनचे बंड .....
मंगळवार पेठेतून जयप्रभा स्टुडिओ कडे जाताना मुख्य चौकातच उजव्या हाताला एका जुन्या मंदिराचे उंच देखणे शिखर लांबुनही दिसते. हे शिखर राधाकृष्ण मंदिराचे. या मंदिरातल्या राधाकृष्णाबद्दल लोकांच्या खूप धार्मिक भावना आहेत. श्रद्धा आहे. पण या मंदिरातील श्रीकृष्णाचे कोल्हापूरच्या इतिहासाच्या दृष्टीने खूप वेगळेपण आहे. आणि ते नव्या पिढीतील कोल्हापूरकरांना माहित असणे गरजेचे आहे.
अठराशे सत्तावन साली ब्रिटिशांच्या विरोधात देशभरात उठाव झाला होता. कोल्हापूरही त्याला अपवाद नव्हते .27 जुलै अठराशे सत्तावन रोजी कोल्हापुरातील सत्ताविसाव्या पलटणीतील सैनिकांनी उठाव केला .ब्रिटिश अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. मात्र हा उठाव पूर्ण क्षमतेने यशस्वी झाला नाही. उठाव मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी बळाचा वापर केला त्यावेळी उठावात सहभागी झालेले काही सैनिक आश्रयासाठी या राधा-कृष्णाच्या मंदिरात येऊन लपले. अर्थात हेराफेरी मुळे ही माहिती ब्रिटीशांना कळाली व कर्नल रे या अधिकाऱ्याने या मंदिराच्या परिसरावर सशस्त्र हल्ला करून उठावातील सैनिकांना जेरबंद केले. उठावातील सैनिकांनी त्यांच्या परीने प्रतिकार केला. पण तो कमी पडला. ब्रिटिश अधिकारी व कोल्हापूरचे सैनिक यांच्यातील ही सशस्त्र चकमक या मंदिराच्या परिसरात घडली. या चकमकीचा साक्षीदार हा श्रीकृष्ण ठरला. असे सांगतात की, त्यावेळी झालेल्या गोंधळात या श्रीकृष्णाच्या हनुवटीचा तुकडा पडला.गेल्या काही वर्षापर्यंत मूर्ती त्या अवस्थेतच होती. मात्र काही वर्षांपूर्वी पुन्हा विधिपूर्वक हनुवटीचा भाग व्यवस्थित करण्यात आला.
या मंदिराला जरूर धार्मिक अधिष्ठान आहे. लोकांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. पण हे मंदिर आणि त्यातील श्रीकृष्ण कोल्हापुरातील १८५७ च्या उठावाचा साक्षीदार आहे हे आणखी एक वेगळेपण या मंदिराला लाभले आहे .आपण कोल्हापूरकरांनी या वेगळ्या ऐतिहासिक क्रांतीच्या संदर्भासह या श्रीकृष्णाच्या मंदिराकडे पाहिले तर या मंदिराचे वेगळेपण आणखी ठळक होणार आहे. कोल्हापुरातील ब्रिटीशांच्या विरोधातील अठराशे सत्तावनचा क्रांतीचा साक्षीदार असलेल्या या श्रीकृष्णाची कोल्हापूरकरांना ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे
हा हल्ला ३१ जुलै १८५७ रोजी २७ व्या स्थानिक पलटणी बाम्बे आर्मीच्या छावणीत रात्री झाला
तेथून हे शिपाई कोल्हापूर शहराकडे आले पण रविवार दरवाजा उघडला गेला नाही त्यामुळे पहाटे हे सैनिक ब्रिटिशांच्या स्थानिक फौजा येण्याचा सुगावा लागल्या व तेथे त्यांच्यामधे दोन गट पडले एक कोकणाकडे गेला व दुसऱ्या गटाने राधाकृष्ण मंदीरात आसरा घेतला कारण तेथे एक बंदीस्त घोड्याची पागा होती तेथे त्यांनी ब्रिटीशांना ९ दिवस झुंजविले पण १० आगस्ट रोजी एका केर नावाच्या अधिकार्याला आत जाण्याचा चोरमार्ग दाखवला त्यामुळे तेथून हल्लाकरण्यात केर यशस्वी प्रचंड गोळागोळी झाली त्यात अनेक हे उद्रेककरणारे शिपाई मारले थोडे पकडले गेले साधारणपणे तेथे अनेक ठिकाणी गोळीबाराच्या खुणा होत्या
आज मंदीर सभोवती वस्ती आहे
मंदीरामुळे या वीरांची आठवण येते
सलग दोन वर्षा आम्ही व आमचे मित्रानी मिळून त्यांच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न करतोय तसेच त्यांच्या बलीदानाची शौर्याची गाथा पुस्तक रुपाने लवकरच आणत आहोत.
No comments:
Post a Comment