विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 19 June 2021

छत्रपती शिवाजी महाराजांकडून संताजी घोरपडे यास मानाचे कडे

 


छत्रपती शिवाजी महाराजांकडून संताजी घोरपडे यास मानाचे कडे

एक दिवस दहा हजार घोडा नि पाच हजार पावलोक अशी जंगी फौज घेऊन ते कल्याणहून निघाले नि हा हा म्हणता मोगलाईतलं संपन्न शहर नि व्यापारी बंदर असलेल्या सुरतेवर जाऊन कोसळले. तिथले व्यापार्यांचे वाडे, श्रीमंतांच्या हवेल्या, सराया जिथे जिथे म्हणून संपत्तीच्या राशी होत्या, तिथे तिथे धाड घालून अमीर बादशहातीच्या हसर्या गालावरचा हा खुबसूरत तीळ अवघ्या तीन दिवसांत त्यांनी खरवडून काढला. जाळून लुटून शहर तलफ केलं. सुरतेची बेसुरत करून टाकली. महाराष्ट्रातून गुजरातेत घुसून ज्या तडफेने हा कार्यभाग त्यांनी उरकला ती तडफ थक्क करणारी होती.
या स्वारीची तुलना वेगवान वावटळीशीच होऊ शकली असती. सुरत लुटून पुरंदरच्या तहाने लादलेल्या अपमानास्पद अटी आणि आगर्याला झालेली कैद याचा त्यांनी पुरेपूर सूड घेतला. शेकडो उंट, गाढवे, बैल आणि खेचरांच्या पाठीवर खचाखच लादलेली लूट घेऊन परतताना चांदवडच्या पश्चिमेला पाच सहा कोसांवरचा कंचन मंचनचा घाट मराठे पार करू लागले, एवढ्यात मोगल सरदार दाऊदखान कुरेशी आठ दहा हजारांची फौज घेऊन अचानक आडवा आला. त्याचा शूर सरदार इख्लासखानाने हरोलीच्या पथकांसह चाल केली. महाराजांनी लूट पुढे पाठवली आणि इख्लासला अंगावर घेतलं. रण कडोविकडीचं झालं. महाराजांच्या उपस्थितीमुळे मराठ्यांच्या शौर्याला सीमा उरली नाही. इखलास जखमी होऊन घोड्यावरून खाली आला. लढवय्या दाऊदखान हमतमेनं झुंजला. पण मराठ्यांनी त्याचाही मोड केला. दिवसभराच्या भीषण लढाईत तीन हजारांवर मोगल सैन्य मारलं गेलं.
दाऊदखान पळून गेला, वणी दिंडोरीची लढाई म्हणून हे रण गाजलं.
संताजींने या लढाईत शर्थीची तलवार केली. राजगडावर शूरवीरांचा गौरव करताना त्यांच्या हातात सोन्याचं कडं घालून कौतुकाची थाप पाठीवर टाकताना महाराज म्हणाले, 'शाब्बास पोरा ! सफेजंगीने लढलास.
महाराजांच्या तोंडून निघालेल्या त्या पहिल्यावाहिल्या कौतुकबोलांचं मोल संताजींना अस्सल मोत्यांपेक्षा अधिक वाटलं.
सदर्भ - संताजी (कादंबरी) काका विधाते
छायाचित्र संताजी (कादंबरी) pc_ @_rahul_2811_
लेखन लव नामदेव घोरपडे @love_ghorpade

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...