Saurabh Madhuri Harihar Kulkarniपुढची मोहीम Pudhachi Mohim
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपे (पवार) या गावी देवासकर पवार यांची गढी आहे. सुपे हे गाव पुणे-नगर महामार्गावर वसलेले आहे. सुपे गावातील गढी सद्यस्थितीत अखेरच्या घटका मोजत आहे. तिचे प्रवेशद्वार पाहिल्यावर तिची भव्यता लक्षात येते. खूप सुंदर असे प्रवेशद्वार आजही लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वारावर देवीची, गणेशाची, मारूतीरायांची शिल्पे आहेत. बुरूज, तटबंदी पडक्या अवस्थेत आहेत. आतमध्ये खूप झाडोरा वाढलेला असल्यामुळे जाता आले नाही. गढीत आत बारव, भुयारे, पागा आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली. गढीला लागून पवारांचा वाडा आहे. वाड्याबाहेर सुंदर अशी बारव आहे.
रजपूत कुटुंबातील साबुसिंग उर्फ शिवाजीराव पवार दक्षिणेत अहमदनगरजवळील हंगे गावात येवून राहिले.त्यांच्या पत्नी फुलकुवरबाई सुद्धा सोबत होत्या. नंतर त्यांचे निधन झाले. साबुसिंग हे निझामशाही सरदार मलिक अंबर यांच्याकडे चाकरीस होते.तिथे ते मालोजीराजे व शहाजीराजेंचे सहकारी बनले. पुढे छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्वराज्यस्थापना करून विस्ताराला सुरवात केली तेव्हा साबुसिंग यांनी मोलाची कामगिरी बजावली. तोरणा, कल्याण मोहिमेत त्यांची कामगिरी उत्तम होती. त्यांची हंगे गावच्या पाटलाकडून हत्या झाली. नंतर त्यांचे पुत्र कृष्णाजी यांनी शौर्य गाजविण्यास सुरवात केली.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कामात विशेष काम करणाऱ्या ३० लोकांच्या यादीत कृष्णाजींचे नाव आहे. विशेषतः प्रतापगडच्या संग्रामाच्या वेळी कृष्णाजीराव यांची कामगिरी विशेष होती. त्यांना सुपे-कणगी व करंजगाव ही दोन गावे इनाम म्हणून मिळाली. नंतर ते आजारी पडले. ४० वर्षे युद्धमोहिमांवर राहणाऱ्या या वीराने सुपे आपल्या गावी गढी व शिवमंदिर बांधले. या गावचे मूळ नाव 'सुखेगाव (सुखाने राहण्यासाठी), साबुसिंगांनी हे गाव वसविले होते. त्याचे नाव पुढे 'सुपे' असे झाले. कृष्णाजीस तीन मुले, पहिले बुवाजी, दुसरे रायाजी व तिसरे केरोजी.
छत्रपती राजाराममहाराजांच्या कारकीर्दीत बुवाजींना महाराजांनी तापीपासून कर्नाटकापर्यंतच्या मुलुखाचा बंदोबस्त करावयास सांगून त्यांची स्वतःची फौजेची व जहागिरीची व्यवस्था लावून दिली. केरोजींस 'वारासहस्त्री' हे पद दिले. नंतर मुघली कैदेतून सुटून छत्रपती शाहूराजे इ.स. १७०८ मध्ये साताराला आल्यावर वुबाजी पवार यांनी आपल्या पराक्रमावर विश्वासराईचा सरंजाम मिळविला. छत्रपती राजाराममहाराज महाराष्ट्रात परत आल्यावर बुवाजी खानदेश- स्वारीवर गेले. त्या वेळी मुघल सरदाराच्या तावडीत सापडले. मुघल सरदारांनी त्यांना तलवार खाली टाकण्यास सांगितले. त्यावर त्यांनी तलवार बाहेर काढली. आपल्या गुडघ्यावर घेऊन तिथे दोन तुकडे केले व म्हणाले, 'ही तलवार फक्त छत्रपतींच्यापुढेच शरणागती पत्करते.' बुवाजींचे पुत्र काळोजी. काळोजींना चार पुत्र १. कृष्णाजी २. तुकोजी ३. जिवाजी ४. मानाजी
इ.स.१७३७ मध्ये नर्मदा व चंबळ या नद्यांमधील प्रदेश मराठ्यांना मिळाला. त्यापूर्वी इ.स. १७२९ मध्ये छत्रसालांच्या मदतीसाठी उजनीला पिलाजी जाधव, तुकोजी पवार, नारो शंकर, दावलजी सोमवंशी २५ हजार सैन्यानिशी बंगशवर चालून गेले. बंगशचा बीमोड झाल्यावर माळव्यात मराठ्यांची सत्ता स्थिरावली. शाहूमहाराजांनी माळव्यातील महालाची वाटणी करून दिली. यासंबंधी सरदार मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, तुकोजी पवार, जिवाजी पवार यांना पेशवे एका पत्रातून म्हणतातः “तुम्हांस प्रांत माळवा येथील वाटणी करून दिल्ही आहे. सनदा सादर आहेत.” इ.स. १७३७ मध्ये बाजीरावांनी दिल्लीवर धाड घातली. त्या वेळी इतर सरदारांबरोबर तुकोजी पवार होते. काळोजींचे ज्येष्ठ पुत्र कृष्णाजी यांनी डभईच्या लढाईत शौर्य गाजविले. तुकोजी व जिवाजी काळोजींसह देवासला राहू लागले.
साभार - डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम
No comments:
Post a Comment