विनोद जाधव एक संग्राहक

Monday 26 July 2021

महापाषाणीय संस्कृती

 महाराष्ट्र देशा

💐 

महापाषाणीय संस्कृतीतील लोक मृत्यूनंतर शरीराचे किंवा अस्थींचे विधिपूर्वक दफन करून त्यावर मोठे मोठे शिलाखंड ठेवत असत किंवा त्याच्या भोवती शिळा वर्तुळाकार ठेवत असत. ही पद्धत यूरोपपासून जपान पर्यंतच्या अनेक समाजांमध्ये दिसून आली आहे. ही पध्दत भारतात कशी आली , कोठून आली बाहेरून भारतात आली की भारतातून बाहेर गेली हा विचार येथे करणं योग्य वाटत नाही. शेवटी कधी कधी ही एकच विश्वसंस्कृती आहे असेही वाटते. मेक्सिकोमध्ये असलेले मोठ मोठी- माणसाचे हात पाय विरहित शिळाशिल्प, इंग्लंड फ्रांस जर्मनी मधील मोठाले मेगालिथस, अरबस्तान मधील कबरी, मध्य आशिया, चीन, जपान मधील दफने ही सर्व थोड्याफार फरकाने महापाषाणीय संस्कृतीशी संबंधित आहेत. शेवटी समस्त मानव प्रजाती विशिष्ट परिस्थितीमध्ये सारखाच विचार करते असं वाटतं.

महाराष्ट्रात विदर्भातील माहुरझरी, नायकुंड, देवळी, चिंचोली, हिंगणा, चिक्कीखापा, टाकळी, कराडी, पिंपळा, उमरेड, गोधानी, सोनेगाव, कुही, बडगाव अशा अनेक ठिकाणी महापाषाणीय संस्कृतीचे अवशेष आढळून आले आहेत. महापाषाण हा शब्द megalith या इंग्रजी शब्दाचे भाषांतर आहे. mega म्हणजे महा किंवा मोठे व lith म्हणजे पाषाण किंवा दगड. या संस्कृतीचा पाषाणयुगाशी म्हणजेच अश्मयुगाशी काही संबंध नाही. या संस्कृतीला हे नाव त्यांच्या उत्तरक्रिया करण्याच्या पद्धतीमुळे पडले आहे. वर सांगितल्या प्रमाणे मृत व्यक्तीचे दफन केल्यानंतर लोक त्यावर मोठाले दगड ठेवीत तसेच त्याच्या भोवताली वर्तुळाकार लहान दगड रचून ठेवीत. पण उत्खनन केल्यानंतर या दफनांमधे एकाच व्यक्तीचा संपूर्ण सांगाडा क्वचितच सापडतो. आतील अस्थी या विखुरलेल्या किंवा कुंभात भरलेल्या स्वरूपात आढळून आल्या. उदरनिर्वाहानिमित्त भटकंती करत असताना मधेच एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर तिचे शव काही काळ उघड्यावर ठेवून किंवा झाडाला बांधून मग काही दिवसांनी तिच्या अस्थी गोळा करून त्यांचे दफन केले जाई. एकाच थडग्यात एकाहून अधिक व्यक्तींचे अवशेष आढळतात. यावरून हे निमभटके लोक वर्षाकाठी जेव्हा आपल्या मूळ गावी येत तेव्हा मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करीत असत असे दिसते. काही दफने ही छायाशिल्प प्रकारची असत, म्हणजे मध्यभागी मोठे पाषाण व त्याभोवती गोलाकार मांडलेले लहान दगड. त्या मोठ्या पाषाणाची सावली त्या लहान दगडांवर पडण्याची सोय केलेली असे. अंत्यविधी करताना सावली कोणत्या दगडावर पडली हे हेरून ठेवत व पुन्हा त्याच दगडावर जेव्हा सावली पडेल तेव्हा व्यक्तीला मरून विशिष्ट काळ लोटला असे गणित बांधत.
महापाषाणीय लोक कुशल कारागीर होते. त्यांच्या बहुतेक वस्त्या या मुख्य मार्गावर असायच्या जेणेकरून त्यांना इतर लोकांशी व्यापार संबंध ठेवता यायचे. आपण दिलेल्या वस्तूंच्या बदल्यात ते शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांकडून धान्य घेत. पण अर्थातच ते त्यांना कमी पडे म्हणून ते शिकार ही करत. मारून खाण्यासाठी म्हणून काही प्राणी पाळले जात. हे लोक पोवळी, शंख, अकिक, लॅपीस लॅझुली इत्यादींपासून मणी बनवत. त्यावर कोरीव काम ही करत. नागपूर जवळील माहुरझरी हे या उत्पादनाचे केंद्र असावे. विदर्भातील जुनापाणी येथे सुवर्णालंकारही आढळून आले आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांनी हे सोने भंडारा जिल्ह्यातून मिळवले असावे. या संस्कृतीतील लोकांना सिंधूसंस्कृतीतील लोकांप्रमाणे प्रसाधनाची आवड होती. उत्खननात आरसे, नखे कापण्याचे उपकरण, वस्तरे इत्यादी आढळून आले आहेत. ते त्यांचा व्यावसायिक उपयोग करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संस्कृतीतील लोकांची थडगी गटागटाने उभी केली जात यावरून हे टोळ्या टोळ्यांनी राहत असावेत असे दिसते. थडगी बनवण्यासाठी मोठे दगड लागत. ते खणून काढावे लागत, योग्य ठिकाणी आणावे लागत, त्यांना रचावे लागे, या सर्व कामांसाठी लोक व त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुणी नायक असणे गरजेचे होते. म्हणूनच समाजात नायकशाही असावी असे दिसते.
आधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचा आवडता प्राणी घोडा आणि मोठी थडगी यांशिवाय आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट या लोकांकडे होती, जिच्या मुळे त्यांच्या जीवनाला स्थिरता प्राप्त झाली.... काय होती ती गोष्ट ?...पाहू पुढील लेखात
✒️पितांबर जडे
9224223189

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...