मराठेशाहीतील मद्यपानविषयक धोरण
postsaambhar ::Visoba Khechar
मराठी राज्यात जे लोक दारू करून विकत असत त्यांना कलाल म्हणत. खाटीक किंवा तत्सम लोक दारूच्या भट्ट्या लावीत, दारू बनवित व कलाल तिची विक्री करी. हे दारूविक्रीचे काम सरकारी परवान्यानेच होत असे.
शिवकालात द्राक्षाची किंवा मोहाची दारू पीत असत. पण दारूची दुकाने तुरळक होती व त्यावर कोतवालाची व इतर सरकारी अधिकाऱ्यांची करडी नजर असे. गावात अगर चार गावाकरिता एक असे गावाबाहेर कलालाचे दुकान असे. कोणी व्यक्ती दारू पिऊन धुंद झालेली रस्त्यात किंवा वाड्यात दृष्टीस पडल्यास त्यास सरकार मोठे शासन करीत असे.
शिवकालात बहुतेक अष्टप्रधान विद्वान ब्राह्मण असत. त्यांनी मराठी राज्यात दारू पिण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी, पिणाऱ्यास जबर दंडाची व फटक्याची कडक शिक्षा करण्यासाठी राजाकडून हुकूम काढविले होते. सैनिकांवर शराबी पिण्याची बंदी होती. (आज्ञापत्र, विविध ज्ञान विस्तार माला 1923, पृ. 29)
थोरले माधवराव पेशवे यांनी न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्या सांगण्यावरून दारूविषयी तपशीलवार नियम करून ठेविले होते. पेशव्यांचे सरदार व जहागिरदार यांनी आपल्या अंकित प्रदेशांतील शहरात दारू विकू नये, अशी अट सरंजाम देताना घालण्यात येई....
दारूच्या फुलाची भट्टी लावून फूल सरकारी कारखान्याचे कामास नेण्यास व दारूची भट्टी जेजुरीस चालविण्यास छाट वा खाटकास सरकारकडून इ. स. 1778 त परवाना जिलेला आढळतो. (भा. इ. सं. मं. जाने-जुलै 1950, ले. 11) सरकारात या दारूभट्टीची रक्कम जमा झालेली दिसते. (पेशवाईच्या सावलीत, चापेकर, पृ. 41) दारू पिण्याचा गुन्हा करणारे सापडल्यावर सरकारने दारूच्या भट्ट्या मना करण्यासाठी व कलालांना म्हणजे दारूविक्री करणाऱ्या दुकानदारांस दारूविक्री बंद करण्याचे हुकूम काढले. ह्या हुकुमाची अंमलबजावणीही त्वरित करण्यात आली. त्यावेळेपासून सरकारच्या भीतीमुळे मराठी राज्यात दारू पिणे व त्यापासून उत्पन्न मिळविणे या बाबी बंद झाल्या....
पण पैसा मिळविण्याच्या लालसेने चोरून दारूचा साठा करून विकणे चालत असे. असे साठे व चोरटी दुकाने हुडकून काढण्यासाठी नाना फडणिसाने फिरस्ते प्यादे ठेवले होते. अशा एका पथकास 1776 त नारायण पेठेतील म्हातारी द्रविड ब्राह्मण हिच्या घरी दारूने भरलेले वीस-पंचवीस शिसे व त्याजबरोबर खाण्यासाठी शिजविलेले मांस सापडले. ते जप्त करून तिला शासन करण्यात आले. (पेशवे दप्तर 43, ले. 144)
ैजे पेठ पारगाव, तालुका खेड सरकार जुन्नर येथील बाळाजी धोंडदेव कुळकर्णी हा ब्राह्मण कलावंतिणीसमागमे गमन, मांसभक्षण व सुरापान करण्यात अट्टल निघाला. त्यास पंक्तीबाह्य केले व पुण्यातील ब्रह्मवृंदांनी एकत्र येऊन पृथ्वीप्रदक्षिणा व तीर्थस्नाने असे प्रायश्चित्त सांगितले. (पे.द. भा. 40, ले. 144)
पेशव्यांच्या कारकीर्दीत ब्राह्मणांनी दारू पिऊ नये असा शासनाचा दंडक होता. दारू पिणाऱ्या ब्राह्मणांना कैद करून किल्ल्यावर पाठवीत असत. नाशिक येथील ब्राह्मणवृंद मद्यपान करतात, त्यात त्यांचा धर्माधिकारीही सामील आहे, हे वृत्त सवाई माधवराव पेशव्यांच्या कानी येताच त्यांनी सर्वोत्तम शंकर नावाच्या खास अधिकाऱ्यास नाशिकला याची चौकशी करण्यास पाठविले आणि आज्ञा दिली, की धर्माधिकारी यात सापडले त्यांचे धर्माधिकारीपण (वतन) जप्त करावे व सरसुभ्याचे हिशेबी जमा करावे. तसेच गुन्हेगार ब्राह्मणास अटक करून त्यांना पक्क्या बंदोबस्ताने घोडप, पटा व मुल्हेर या किल्ल्यांवर अटकेत ठेवण्यास पाठविणे. (सवाई माधवराव रोजनिशी, भा. 3(, पृ. 120)
(हा सर्व मजकूर महाष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - डॉ. वि. गो. खोबरेकर, (म. रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988) या पुस्तकातून घेतला आहे.)
No comments:
Post a Comment