हंबीरराव - मुंबईचा अप्रसिद्ध शासक.
मुंबईचा इतिहास म्हटलं तर आपण ४००-५०० वर्षच मागे जातो कारण मुंबईची घडण ब्रिटिशांच्याच काळात झाली. पण या आधी काय? आधीच्या काळाबद्दल दंतकथा अशी की मुंबईत बिंब(रामचंद्र यादवाचा मुलगा) नावाचा राजा होता ज्याची राजधानी माहीम(महिकावती) होती. परंतु या कथेला महिकावतीची बखर सोडल्यास कोणताही आधार नाही.
ही पार्श्वभूमी सांगण्याची गरज आहे कारण पुढील माहितीची सुरवात याच गोष्टीवरून होते.
काही काळापूर्वी पुरातत्व शास्त्रज्ञांना(डॉ. कुरुश दलाल) एक शिलालेख हाती लागला. तो शिलालेख नांदगाव(अलिबाग जवळ) मध्ये चोरगे कुटुंबच्या घरी वर्षोनुवर्षे होता. तो त्यांना ६० वर्षांपूर्वी विहीर खणताना मिळाला होता.
या शिलालेखाविषयी आणि हंबीररावाविषयी मी इथे लिहीत आहे.
शिलालेख
या शिलालेखावरील बहुतांश मजकूर मराठीत(यादवकालीन मराठी) आहे. काही मजकूर संस्कृत आणि फारसी शब्दातही आहे. मजकुराची लिपी देवनागरी आहे.
१. मजकुरानुसार फिरोजशाह तुघलकाच्या हाताखाली महाराजाधिराज हंबीरराव ठाणे,कोंकण आणि बिंबाचे माहीम या ठिकाणी राज्य करीत होता.
२. शिलालेखावर कोरलेल्या हंबीररावाचा पंतप्रधान (पंतप्रधानाला शब्द - सर्वव्यापारी) सिहिप्रो याच्या उपस्थितीत झालेल्या विक्री कराराबद्दलचा हा मजकूर आहे.
३. हा शिलालेख इ.स.१३६७ सालातील आहे. याला गधेगल म्हणतात. दगडावर खाली एक आकृती कोरलेली दिसेल. ती आकृती हे सांगण्यासाठी कोरलेली असायची की जर कोणी दगडावर लिहिलेला हुकूम पळाला नाही तर त्याच्या आईला शिक्षा म्हणून गाढवाबरोबर समागम करावे लागेल.
हंबीरराव
१. हा शिलालेख मिळण्याआधी हंबीरराव संदर्भातील ४ शिलालेख मिळाले होते. परंतु त्यावरून हंबीरराव एक छोटासा प्रमुख असेल असे वाटत होते.
२. परंतु हा शिलालेख मिळाल्यानंतर हंबीरराव मुरुडपासून वर ठाण्यापर्यंतच्या भागाचा राजा होता(फिरोजशाह तुघलकाच्या अधिपत्याखाली) हे सिद्ध झाले. त्याच्या राज्यात बिंब राजाचा माहीम परिसरही होता हे ही सिद्ध झाले. यावरूनच हंबीरराव हा मुंबईचा आतापर्यंत माहीत नसलेला राजा होता हे आपल्याला या शिलालेखवरून समजले. "माहाराजाधिराज श्रीहंबीरराओ ठाणेकोंकणमाहिमबिंबस्थाने राज्यं करोति"
३. हंबीररावसंबंधी जे एकूण ५ ठिकाणी शिलालेख आहेत ती ठिकाणे - रानवड, नागाव, नांदगाव, BARC, वाघरण.
४. या पाचही शिलालेखांचा काळ इ.स. १३६६ ते १३६८ दरम्यानचा आहे. यावरून हंबीरराव याच काळात होऊन गेला हे सिद्ध होते.
5. रानवड आणि नागाव येथील शिलालेखांमध्ये हंबीररावाचा अनुक्रमे 'पश्चिमसमुद्राधिपतीरायकल्याणविजयाराज्यी' आणि 'प्रौढप्रतापचक्रवर्ती' असा उल्लेख येतो. परंतु या दोघानंतरच्या BARC शिलालेखात त्याचा उल्लेख केवळ 'ततपादपदमौजिवि महाराजाधिराजा' एवढाच येतो. यावरून आपण असा तर्क काढू शकतो की ६६-६८ या दोन वर्षांमध्येच कधीतरी हंबीरराव फिरोजशाह तुघलकाच्या अधिपत्याखाली आला असावा.
या सगळ्यावरून,
1. या शिलालेखांमध्ये बघितले तर महिकावतीच्या बखरी मध्ये जे काही लिहिलंय ते पूर्णपणे अविश्वसनीय असेल असे नाही.
2. सुरवातीला मुंबई यादवांकडे होती. यादवानंतर ती अल्लाउद्दीन खिलजीच्या ताब्यात गेली. खिलजी नंतर त्याचा मुलगा मुबारक खानाकडे मुंबई होती साधारण १३०८-१३०९ च्या दरम्यान.
3. यानंतर असं सांगितलं जातं की मुंबई गुजरातच्या सुलतानाकडे गेली. परंतु गुजरातचा सुलतान तर १४व्या शतकाच्या शेवटची मुंबईत आला. मग मधली जवळजवळ ८०-९० वर्ष काय? कोण होतं या दरम्यान इकडे मुंबईत? याविषयी कुठलाच पुरावा आज आपल्याकडे नाही.
4. परंतु या ५ शिलालेखांवरून आपण असं सांगू शकतो की काही काळ तरी मुंबई हंबीरराव/हमीरराव च्या ताब्यात होती.
5. महिकावतीच्या बखरीप्रमाणे एक मोठे युद्ध झाले. ज्यात एका सैन्याने चौल वरून हल्ला केला. त्या सैन्याला ठाण्याजवळ अडवणारा आणि हरवणारा खुद्द हंबीरराव/हमीरराव असावा. (महिकावतीच्या बखरी प्रमाणे हल्ला करणाऱ्याचा मुलगा हंबीररावकडून मारला गेला.) आणि हंबीरराव ने इकडे आपले राज्य स्थापन केले व कालांतराने फिरोजशाह तुघलकाचे अधिपत्य स्वीकारले.
त्यामुळे खिलजींनंतर मुंबईचे शासक तुघलक जरी असले तरी इथे राज्य करणारा एक राजा जरूर होता!
फोटो :- नांदगाव मधील शिलालेख/गधेगल.
संदर्भ :- पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. कुरुष दलाल यांचे लेक्चर.
- ओंकार ताम्हनकर. Omkar Tamhankar
No comments:
Post a Comment