पोस्तसांभार :: Suvarna Naik Nimbalkar
श्रीमंत बाजीराव आणि मस्तानीबाई ची हळवी प्रेम कहाणी हे पेशवाईतील कायम उत्सुकता असलेले प्रकरण... खरं तर त्या बद्दल खूप वाचलेले आणि ऐकलेले असते ...पण या दोघांच्या मृत्यु नंतर
पुढच्या पिढीचं नेमके काय झालं? हे बहुतेकदा ठाऊक नसतं ...
या दोघांचा एकुलता एक मुलगा म्हणजे समशेर बहाद्दर यांचा जन्म २८ जानेवारी १७३४ ला झाला , त्याचे मूळ नाव कृष्णसिंह, पण नंतर मामाच्या नावावरून ठेवलेले समशेर नाव प्रचलित झाले,
नियती ने आई वडलांचे छत्र वयाच्या सहाव्या वर्षी हिरावून घेतले ....
पण ....आई वडलांच्या प्रेमा मुळे जे वादळ उठले होते , त्याचा थोडाही परिणाम या मुलाला वाढवण्यात झाला नाही ...पेशवाईतील प्रत्येकांने विशेषतः राधा बाई , नाना साहेबांनी जातीने लक्ष घालुन त्यांना वाढवले ...प्रेम जिव्हाळा देण्यात पेशवाईतील कोणीही हात आखडता घेतला नाही ... त्या मुळेच इतर मुला प्रमाणे समशेर शनिवार वाड्यात लहानाचा मोठा झाला ...इतर मुला प्रमाणे मराठी , मोडी भाषे मध्ये शिक्षण झाले बरोबरीने फारसी शिकले ... हिंदु आणि बरोबरीने मुस्लिम चालीरीती शिकवल्या ..शनिवार वाड्यात वाढत असताना सदाशिव भाऊ आणि समशेर मध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले होते .. एकमेकांवर खुपच जीव होता ...भाऊ च्या सहवासात राहुन समशेर दरबारी आणि युद्ध दोन्ही आघाडयांवर तरबेज झाले होते ...
समशेर बहाद्दर चे पहिले लग्न लालकुंवर , वडलांचे नाव लक्षाधिर दलपतराय जहागीरदार हिच्याशी १४ जानेवारी १७४९ ला झाले होते , पण १७५३ ला लालकुंवर चे दुर्दैवाने निधन झाले , नानासाहेब पेशव्यांनी त्या वेळच्या पद्धती प्रमाणे लगेचच १८ ऑक्टॉबर १७५३ ला समशेर चा दुसरा विवाह मेहेरबाई ह्यांच्याशी लावुन दिला ...त्यांच्या वडिलांचे नाव गुलाब हैदर निंबगिरीकर .पुढे जाऊन १७५८ ला त्यांना मुलगा झाला , त्याचे नाव अली बहाद्दर ...
भाऊ आणि विश्वासराव बरोबर समशेर पानिपतावर गेले ,त्या वेळेस पार्वतीबाई च्या बरोबरीने मेहेरबाई पानिपतावर गेल्या होत्या ...पानिपतावर भाऊ , विश्वासराव आणि समशेर तिघेही कामी आले ...त्या आधीच युद्धाचा बेरंग लक्षात आल्यावर समशेर ने मेहेरबाई ना झाशी ला पाठवले होते ...तिथुन मजल दर मजल करत त्या पुण्याला आल्या ...
नवरा अकाली गेलेला , नवर्याचे वय अवघे २७! म्हणजे या मुलीचे वय असेल २३-२४ ... मुलगा अवघा २-३ वर्षाचा , धर्म वेगळा , पुण्यात रक्ताचे असे कोणीच नाही ...अशा वेळेस काय परिस्थिती आली असेल त्यांच्यावर ?..एक गोष्ट महत्वाची आहे ...प्रत्येक पिढीत स्त्री ही पुरुषा पेक्षा मानसिक आणि शारीरिक जास्त सक्षम असते ...त्या मुळे कुठल्याही कठीण प्रसंगाला ती सहज सामोरी जाऊ शकते ... अशा प्रसंगी तिला हवी असते आपल्या लोकांची साथ ...या परिस्थितीत मेहेरबाई ला शनिरवाड्याने साथ तर दिलीच बरोबरीने त्यांची योग्य काळजी घेतली ... थोडे दिवस माहेरी राहायला गेल्या ...काही दिवसांनी मुलाला म्हणजे अली बहाद्दर ला घेऊन मेहेरबाई पुण्यात मस्तानी महालात राहु लागल्या ...अलिबहाद्दर ला युद्ध कला आणि कारभाराचे शिक्षण मिळेल याची काळजी घेतली ... अलिबहाद्दर सगळ्या आघाडयावर तरबेज झाला ...
पेशवाईतील इतर स्त्रिया प्रमाणे मेहेरबाई पण सुशिक्षित होत्या .... लिहिता वाचता नुसते येतच नव्हते तर आवडही होती ... त्यांना राजकारणाची चांगलीच जाण होती ... अली बहाद्दर ला वेळोवेळी त्या सल्ले देत असत .
मस्तानी बाईचा हा संपुर्ण परिवार इस्लामी असुनही तीन पिढ्या ब्राह्मणी वातावरणात वाढला होता , त्या मुळे त्यांनी हिंदु आणि बरोबरीने इस्लामी संस्कार आत्मसात केलेले होते ...
मेहेरबाई ची गणपती वर श्रद्धा होती ... चतुर्थी , एकादशी चे उपास , सोवळे ओवळे त्या पाळत ...
पुढे जाऊन त्यांना सुन आली तिचे नाव रहिमत बीबी ,तिने पण सासु कडुन मिळालेले संस्कार पुढे चालवत नेले ...
अशी ही जन्माने मुस्लिम पण आचरणाने हिदू स्त्री , जी साक्षात मस्तानी बाई ची सुन ... पेशवे दप्तरात जिचा उल्लेख " महाराज साहेब " असा आहे ... ती पेशवे सुन १८०५ नंतर कधी तरी मृत्यु पावली ...इतिहासाला तिची नोंद ठेवायची गरज वाटली नाही ...
बिपीन कुलकर्णी
संधर्भ - पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक )
No comments:
Post a Comment