मराठा साम्राज्यातील एक सेनापती सदाशिवराव भाऊ
पोस्तसांभार :: घनश्याम ढाणे
सदाशिवराव भाऊ : (३ ऑगस्ट १७३० – १४ जानेवारी १७६१). मराठा साम्राज्यातील एक सेनापती. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. नानासाहेब पेशवे यांचे चुलतभाऊ. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव सदाशिव अनंत भट. परंतु ‘सदाशिवराव भाऊʼ म्हणून ते सर्व परिचित होते.
पहिल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू अनंत बाळाजी भट तथा चिमाजी आप्पा यांचा हा मुलगा. त्यांच्या आईचे नाव रखमाबाई. सदाशिवराव २५ दिवसांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे आजी राधाबाईसाहेब यांनीच त्यांचे संगोपन केले. पहिल्या बाजीराव पेशव्यांसोबत चिमाजी आप्पा नेहमीच मोहिमेवर असत. त्यामुळे लहानग्या सदशिवाकडे लक्ष द्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळत नसे. दौलतीचे शिक्षण घेण्यासाठी ते शाहू महाराजांकडे दाखल झाले होते. तलवारबाजीमध्ये ते अतिशय तरबेज होते. २० मार्च १७३६ मध्ये त्यांचे मौंजीबंधन झाले, तर २५ जानेवारी १७४० मध्ये त्यांचे लग्न उमाबाई यांच्याशी झाले. त्यांचे दुसरे लग्न भिकाजी नाईक कोल्हटकर (पेण) यांच्या पार्वतीबाई नावाच्या मुलीशी झाले. सदाशिवराव भाऊ यांच्या ठायी मुत्सद्दीपणा, समयसूचकता व शौर्य इत्यादी गुण होते. पेशवाईच्या अंतर्गत कारभारात रामचंद्रबाबा शेणवी यांच्या साहाय्याने त्यांनी खूप सुधारणा केल्या.
सदाशिवराव भाऊ यांचा दक्षिणेतील मोहिमांमधील सहभाग महत्त्वपूर्ण आहे. कृष्णा तुंगभद्रा या नद्यांमधील ठाणी देशमुखांनी उठवली होती. ती परत घेण्याकरता ते तिकडे गेले. इ. स. १७४७ मध्ये दक्षिणेतील कोप्पळ जवळील बहादुरबंदी हा किल्ला त्यांनी घेतला.
परशुराम त्रिंबक प्रतिनिधी व त्यांचा मुतालिक यमाजी शिवदेव यांचे बंड मोडण्यासाठी छ. रामराजांना बरोबर घेऊन सदाशिवराव भाऊ सांगोल्याच्या स्वारीवर गेले. तेथील बंड मोडून छ. रामराजांकडून त्यांनी मराठी राज्याची कायमची पूर्ण मुखत्यारी लिहून घेतली.
सदाशिवराव भाऊंनी आपला दिवाण रामचंद्रबाबा शेणवी यांच्या सांगण्यावरून नानासाहेब पेशवे यांच्याकडे दिवाणगिरीची मागणी केली. परंतु महाजीपंत पुरंदरे यांना त्या जागेवरून कमी करण्याचा पेशव्यांचा मानस नसल्याने भाऊंनी कोल्हापूरकरांची पेशवाई स्वीकारली; पण भावाभावांत तंटा लागू नये म्हणून महादजीपंत यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला आणि भाऊ पुण्याच्या पेशव्यांचे दिवाण झाले.
मे १७५२ मध्ये दिल्लीच्या बादशहाने अब्दाली व रोहिले यांच्यापासून मराठ्यांनी बादशाहीचे संरक्षण करावे म्हणून मराठ्यांशी करार केला. यामुळेच रघुनाथ दादासारखे लोक अटक, पेशावरपर्यंत जाऊन अफगाणांचा बंदोबस्त करून आले होते. रघुनाथराव तेथून माघारी फिरताच अब्दाली पुन्हा हिंदुस्थानवर चालून आला. शिंदे व होळकर यांच्या आपसांतील वैरामुळे अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला. यामध्ये दिल्लीजवळ बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे धारातीर्थ पडले. ती बातमी महाराष्ट्रात येण्यास महिना लागला. याच दरम्यान भाऊंनी उदगीरच्या लढाईत निजाम अलीचा पराभव करून साठ लाख उत्पन्नाचा मुलूख मराठी राज्याला जोडला. या युद्धातील यशामुळे नानासाहेब पेशवे यांनी अब्दालीचा बिमोड करण्यासाठी उत्तर हिंदुस्थानावरच्या मोहिमेस सदाशिवराव भाऊंची रवानगी केली. मराठी सैन्य पटदूरास एकत्र आले. तेथूनच १४ मार्च १७६० मध्ये मराठी फौजा उत्तरेकडे निघाल्या. भाऊंच्या सैन्यात यात्रेकरू, बाजारबुणगे यांचा भरणा खूप होता. भाऊंनी सर्व सरदारांचे रुसवे काढून सर्वांना कामाला लावले. बुऱ्हाणपूर, भोपाळ, सीरोंज, ओर्छा, नरवर, ग्वाल्हेर या मार्गाने भाऊ दिल्लीकडे निघाले. वाटेत गंभीर नदी ओलांडण्यास भाऊंना खूप दिवस लागले. याच दरम्यान अब्दाली गंगा-यमुनेच्या दुआबात होता. भाऊंना उत्तरेतील संस्थानिकांना आपल्या बाजूने वळवण्यात अपयश आले. यमुनेच्या पाण्याला उतार नसल्याने प्रथम दिल्ली काबीज करून नंतर अब्दालीस कोंडावा असे ठरले. मथुरेत भाऊंना सुरजमल येऊन मिळाला. पुढे मात्र सुरजमलने तटस्थ भूमिका घेतली.
२२ जुलै १७६० रोजी दिल्ली काबीज करून भाऊंनी दिल्लीचा बंदोबस्त नारोशंकर यांच्याकडे सोपविला. यावेळी भाऊंनी अब्दालीचे तहाचे बोलणे धुडकावले. दिल्ली बादशहा शाह आलम याने युद्धाचा निर्णय लागल्याशिवाय दिल्लीत येण्यास नकार दिला. त्यामुळे भाऊंनी अली गोहरचा मुलगा जवानबख्त यास दिल्लीचा युवराज केले.
दिल्लीच्या विजयानंतर भाऊंनी आपला मोर्चा दिल्लीपासून उत्तरेस पाऊणशे मैल यमुनेच्या काठी असलेल्या कुंजपुराकडे वळवला. येथून अब्दालीला रसदेचा पुरवठा होत होता. १७ ऑक्टोबर १७६० ला भाऊंनी इब्राहिमखानाकरवी तोफा डागून कुंजपुराचा किल्ला फोडला. तेव्हा कित्येक खंडी गहू मराठ्यांच्या हाती पडला. दत्ताजी शिंदे यांचे मारेकरी अब्दुल समतखान व कुतुबशहा हे कुंजपुरा येथे जिवंत सापडले. त्यांना मारून त्यांची मस्तके भाऊंनी अब्दालीस पाठवून दिली. यामुळे अब्दालीने चिडून जाऊन यमुनापार होण्याची खटपट सुरू केली. भाऊंनी कुंजपुरा घेऊन ते ससैन्य कुरुक्षेत्रावर आले. कित्येक दिवस तिथे मुक्काम करून मराठी फौजा दिल्लीच्या रोखाने निघाल्या. याच दरम्यान बागपताजवळ गौरीपुरापासून अब्दाली यमुनापार होऊन दिल्लीच्या वाटेवर येऊन बसला. सदाशिवराव भाऊ अब्दालीवर गणोरपर्यंत चालून गेले. पानिपतगाव पाठीशी ठेवून भाऊंनी अब्दालीशी झुंज देण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर मध्यापासून ते जानेवारीपर्यंत हे युद्ध झाले.
पानिपतवर मराठी सैन्य व अब्दालीचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले. रोज त्यांच्या छोट्या-मोठ्या चकमकी चालू होत्या. मात्र बळवंतराव मेहेंदळे, गोविंदपंत बुंदेले, दादाजी पराशर यांसारखी मंडळी पडल्यानंतर भाऊंचा धीर खचला. अशातच मराठी सैन्याची अन्नापासून दुर्दशा होऊ लागली. यावर भाऊंनी शत्रूवर तुटून पडून शत्रूची कोंडी फोडून दिल्लीच्या रोखाने जाण्याचा विचार केला. भाऊंनी इब्राहिमखान गारदी याच्या तोफांचा वापर करून गोलाची लढाई द्यायची ठरवले. त्याप्रमाणे १४ जानेवारी १७६१ या दिवशी सकाळी युद्धास प्रारंभ झाला. यावेळी मराठी पूर्वाभिमुख होते, तर अब्दालीचे सैन्य पश्चिमाभिमुख होते. अब्दालीच्या मागील बाजूस यमुना होती. हे युद्ध भल्या सकाळी आठ वाजता सुरू झाले. दुपारी तीनला विश्वासराव यांना गोळी लागून ते ठार झाल्याने मराठी सैन्यात एकच गोंधळ उडाला. मराठी सैन्यात पळापळ सुरू झाली. विश्वासराव पडल्यावर देहभान विसरून सदाशिवराव भाऊ शत्रूसैन्यात शिरले. नाना फडणीस यांनी आपल्या आत्मचरित्रात भाऊ गर्दीत नाहीसा होईपर्यंत आपण त्यांच्याजवळ होतो, असे लिहिले आहे. पानिपतच्या रणभूमीवर दुसऱ्या दिवशी भाऊंचे प्रेत शोधून काढून काशीराजाने त्यांच्या प्रेताला अग्नी दिला.
सदाशिवराव भाऊ पानिपतच्या युद्धात मारले गेले होते, पण तदनंतर त्यांचे अनेक तोतये महाराष्ट्रात आले. पानिपत युद्धातून वाचून ते कोठेतरी गुप्तपणे राहिले असावेत, अशी सामान्यजनांची समजूत होती. खुद्द सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी पार्वतीबाई यांनीही अशी समजूत मनाशी बाळगली होती. त्यामुळे त्या सारे सौभाग्यालंकार अंगावर परिधान करीत.
संदर्भ :
राजवाडे, विश्वनाथ काशिनाथ, मराठ्यांच्या इतिहासाची साधने : १७५० ते १७६१, वाई, १८९८.
शेजवलकर, त्र्यं. शं. पानिपत : १७६१, आवृ-९, पुणे, २०१८.
सरदेसाई, गोविंद सखाराम, रियासत : मध्य विभाग ३ : पानिपत प्रकरण, पुणे, १९२२.
हेरवाडकर, रघुनाथ विनायक, संपा., कृष्णाजी शामराव विरचितभाऊसाहेबांची बखर, पुणे, १९९०.
No comments:
Post a Comment