बडोदा संस्थानाच्या महाराणी जमनाबाईसाहेब"
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
"जिद्द, चिकाटी असेल तर बिकट परिस्थितीतूनही मार्ग काढता येतो" याचं साजेस उदाहरण म्हणजे बडोदा संस्थानाच्या महाराणी जमनाबाईसाहेब ।
जमनाबाईसाहेब ह्या म्हसवड घराण्याची शाखा असलेल्या रहिमतपूरच्या माने (सरकार) यांच्या कन्या. त्यांचा विवाह बडोदा संस्थानचे महाराज खंडेराव यांच्याशी झाला. जमनाबाईंच्या आधीच्या , खंडेरावांना दोन पत्नी होत्या परंतु कोणालाही मुलबाळ नव्हते. म्हणून, जमनाबाईकडून मूल व्हावे अशी प्रखर इच्छा खंडेरावांना होती आणि त्यासाठी त्यांनी नवस करायला देखील सुरुवात केली होती. खंडेरावांचे बंधू, मल्हारराव यांनी खंडेरावांना घातपाताने मारण्याचा प्रयत्न केला होता म्हणून त्यांना अटक करून पादरा येथे तुरुंगात डांबले गेले होते. दरम्यान, दुर्दैवाने अल्पशा आजाराने १८७० साली खंडेरावांचे निधन झाले .आणि जमनाबाई एकाकी पडल्या.
खंडेराव गेल्यामुळे मल्हारराव गादीवर आले. त्यावेळेस जमनाबाईसाहेब गरोदर होत्या. जमनाबाईंना जर पुत्ररत्न झाले तर गादीचा हक्क हा त्यांच्या पुत्राला मिळणार होता. त्यामुळे जमनाबाई काळजीत पडल्या. कारण, याच्या अगोदर आपले महाराज खंडेराव यांना मल्हारराव कडून जीवे मारण्याचा झालेला प्रत्यन,आपण स्वतः गरोदर, पती गेल्याचे दुःख, त्यात पाताळयंत्री मल्हारराव गादीवर, आणि अशा वेळेस मल्हारराव काय करतील याचा त्यांना नेम नव्हता, आणि या सगळ्याने त्यांना तिथे राहणे धोक्याचे वाटू लागले होते. म्हणून त्या बडोदा मधून बाहेर पडल्या. आणि पुण्यात दिवस काढू लागल्या. काही काळाने त्यांना कन्यारत्न झाले आणि मल्हारराव हेच गादीवर स्थित राहिले. जमनाबाई अजून जास्त चिंतीत झाल्या, त्यांना काहीही करून बडोदासंस्थान मल्हाररावांच्या हाती सोपवायचे नव्हते परंतु त्यांना काही मार्ग दिसेना.
अशात मल्हाररावांनी रेसिडेंट कर्नल फेयर यांना सरबताच्या पेल्यात सोमल आणि हिऱ्याची पूड टाकून मारण्याचा प्रत्यन केला, म्हणून त्यांना गादीवरून बडतर्फ करण्यात आले आणि नेमकी हीच वेळ जमनाबाईंनी हेरली. त्यावेळेस संस्थांनचे दत्तक पुत्र नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याची ब्रिटिशांची सवयच होती. परंतु जमनाबाई यांनी वेळ प्रसंगी पैसे मोजून, ओळखी भेटी काढून/वाढवून ब्रिटींशांकडून दत्तक पुत्र घेण्याची परवानगी घेतली आणि पुन्हा एकदा, पुणे येथे लहान मुलीसोबत रहात असलेल्या जमनाबाई परत बडोदा येथे आल्या.बडोदेकरांनी जमनाबाई राणीसाहेब व त्यांच्या मुलीचे बडोदामध्ये सन्मानाने स्वागत केले. आणि जमनाबाई राणीसाहेब बडोदा संस्थांच्या पुन्हा महाराणी बनल्या.
बडोदा येथे आल्यानंतर जमनाबाईंनी दत्तक पुत्राची शोध मोहीम चालू केली. त्यावेळेस एक कायदा बसवण्यात आला होता कि, दत्तक पुत्र हा गायकवाड परिवारातीलच हवा. बडोदेकरांना माहिती होतेकी गायकवाडांची एक शाखा महाराष्ट्रातील खान्देश येथे आहे. त्यामुळे जमनाबाईंनी सगळीकडे हुकूम सोडले. शोधाशोध करून शेवटी विनायक भट दीक्षितांकडे आणि त्र्यंबकेश्वरच्या धोंडभट शुक्ल यांच्या दफ्तरी बडोद्याच्या गायकवाडांची नोंद सापडली. कवळाणे जिल्हा नाशीक येथील काशीराव गायकवाड आणि त्याचे चार भाऊ हे बडोदा राज घराण्यातील प्रतापरावांचे कायदेशीर औरस वारस आहेत हा पुरावा हाती लागला. आणि जमनाबाई यांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी तात्काळ काशीराव गायकवाड आणि त्यांच्या लहान मुलांना बडोदा मध्ये येण्याचे निरोप पाठवले.
काशीराव गायकवाड आणि त्यांच्या लहान मुलांना बडोदा मध्ये आणले गेले. आता जमनाबाईसाहेब यांना एका लायक मुलाची निवड करायची होती. प्रत्येक मुलाची कटाक्षाने चौकशी करू लागल्या. अर्थातच त्यांना बडोदा संस्थानासाठी राजाची निवड करायची होती. काशीरावांच्या मुलांपैकी गोपाळराव हे बाकीच्या मुलांपेक्षा शांत, आत्मविश्वासू आणि हुशार होते.बडोदा येथे आल्या नंतर त्यांना निवड समितीने काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी ऊत्तर देताना मी राजा होण्यासाठी येथे आलो आहे.असे रोकठोक ऊत्तर देऊन निवड समितीचे मन जिंकले.यावेळी जमनाबाई राणीसाहेब यांनी आपल्या चाणाक्ष नजरेतून गोपाळराव यांची निवड केली.यातून जमनाबाई राणीसाहेब यांची अचूक दूरदृष्टी दिसून येते.
गोपाळरावांचा दत्तकविधी होऊन त्यांचे नामकरण 'सयाजीराव गायकवाड तिसरे' असे करण्यात आले. त्यावेळेस गोपाळचे वय १२ वर्षे होते आणि शिक्षणाचा आणि त्यांचा काही संबंध नव्हता. जमनाबाईंराणीसाहेबांनी बडोदा संस्थानचे कारभारी माधवराव यांच्याशी चर्चा करून नव्या राजाच्या शिक्षणाची व राजकारभाराची कामे चालू केली. महाराणी ह्या त्यावेळेस वयाने अगदी लहान होत्या, जेमतेम २२-२३ वर्षांच्या परंतु त्यांनी अनुभवलेले दुःख, पाताळयंत्री घटना यांनी त्या सुजाण झाल्या होत्या.
सयाजीरावांच्या दिवसभरातील कामाकडे, शिक्षणाकडे त्यांचे बारीक लक्ष होते. त्यांना एक आदर्श राजाची घडी बसवायची होती, आणि त्यात त्या कुठेच कमी पडल्या नाहीत. अनेक प्रयत्नांनी त्यांनी एका नव्या राज्याची घडी बसवली. आणि पुढे याच गोपाळरावांनी -'सयाजीराव गायकवाड तिसरे' बडोदा संस्थानाचे चित्र पालटून टाकले.
आजही गायकवाड कुटुंबाचे राजवाडे अगदी दिमाखात उभे आहेत. अशा या युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड याच्या जीवनाची सांगड बसविण्याचे श्रेय त्यांच्या दत्तक मातोश्री जमनाबाई यांना नक्कीच जाते.
अशा या स्री शक्तीला ,बडोद्याच्या जमनाबाई राणीसाहेबांना आमचा मानाचा मुजरा
संदर्भ:
१. युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड - बाबा भांड
२. महाराजा सयाजीराव गौरवगाथा युगपुरुषाची - खंड १२, संपादक - बाबा भांड
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
No comments:
Post a Comment