मराठ्यांची एक महत्त्वाची मोहीम. पेशव्यांची जंजिरा मोहीम (Janjira campaign of Peshwas)
पोस्तसांभार :: संदीप परांजपे
पेशव्यांची जंजिरा मोहीम : ( १७३३ ते १७३६ ). मराठ्यांची एक महत्त्वाची मोहीम. छ. शाहू आणि बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत ही मोहीम घडून आली. यात जंजिरेकर सिद्दीचा समूळ नाश झाला नसला, तरी त्याला काबूत ठेवण्यात मराठ्यांना यश मिळाले.
या मोहिमेचे निमित्त ठरले ते ब्रह्मेंद्रस्वामींचे घडलेले ‘हत्ती प्रकरण’. कर्नाटकातील सावनूरच्या नबाबाने एक हत्ती सिद्दी घराण्यातील सिद्दी सात यास भेट म्हणून ब्रह्मेंद्रस्वामींबरोबर पाठवला होता. तो माखजनजवळ आंग्र्यांच्या लोकांनी जकातीसाठी जप्त केला व जयगडला पाठवला. हे सर्व ब्रह्मेंद्रस्वामींचे कारस्थान आहे, असे समजून ८ फेब्रुवारी १७२७ रोजी शिवरात्रीला सिद्दीने ब्रह्मेंद्रस्वामींच्या चिपळूण जवळच्या ‘परशुराम’ देवस्थानावर हल्ला करून देवस्थान व लोटे आणि पेढे ही गावे लुटली. तेथील लोकांचा छळ केला. हा प्रकार ऐकून ब्रह्मेंद्रस्वामींनी आंग्र्यांशी बोलून हत्ती गोवळकोटास आणला व सिद्धी सातच्या ताब्यात दिला. पुढे जंजिऱ्याचा प्रमुख सिद्दी रसूल याकुदखान याच्या सांगण्यावरून सिद्दी सातने परशुरामाची केलेली लूट परत केली. छ. शाहू महाराज व पहिले तीन पेशवे हे या ब्रह्मेंद्रस्वामींचे शिष्य होते. ब्रह्मेंद्रस्वामी व आंग्र्यांनी छ. शाहू महाराजांना सिद्दी प्रकरण निकालात काढण्याची विनंती केली; पण त्यावेळी मराठ्यांच्या फौजा बुंदेलखंड व उत्तर हिंदुस्थानच्या मोहिमेत गुंतलेल्या असल्याने हे प्रकरण सबुरीने मिटवण्याचे छ. शाहूंनी ठरवले.
बाणकोट खाडीपासून उत्तरेस रेवदंड्यापर्यंतचा सह्याद्रीच्या पायथ्याचा प्रदेश सिद्दीच्या ताब्यात होता. तसेच उंदेरी, थळ, रेवस, बाणकोट, जयगड, दाभोळ या जागा सिद्दीच्या ताब्यात होत्या. या प्रदेशालगतच्या मराठी मुलखांवर सिद्दी हल्ले करत असल्याने या जागा सोडवून जंजिरा किल्ला ताब्यात घेणे व सिद्दीला नेस्तनाबूत करणे, हे मराठ्यांचे उद्दिष्ट बनले होते. पुढे एप्रिल १७३३ मध्ये जंजिरा मोहीम छ. शाहू महाराजांच्या आज्ञेने सुरू झाली. बाजीराव पेशवे व फत्तेसिंग भोसले सिद्दीच्या मोहिमेसाठी कोकणात उतरले. दाभाडे, गायकवाड, आंग्रे यांना बाजीरावांच्या कुमकेस जाण्यास छ. शाहू महाराजांकडून आज्ञापत्रे गेली. सिद्दीच्या घरात चाललेल्या यादवीचा फायदा घेऊन बाजीराव यांनी कोकणात उतरून जंजिऱ्यावर चाल केली. जंजिऱ्यातून सिद्दी रह्यान बाजीराव पेशव्यांवर चालून आला. घनघोर युद्ध होऊन सिद्दी रह्यान व त्याचे १०० लोक मारले गेले. हबशी सरदारास फितूर करून बाजीरावांनी जंजिरा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला; तथापि राजापुरी, खोक्री, तळे, घोसाळे, बिरवाडी येथील किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले. सुवर्णदुर्गाचा किल्लेदार बंकाजी नाईक याने हल्ला करून बाणकोट व मंडणगड काबीज केले आणि गोवळकोटाकडे आपला मोर्चा वळवला. जयगडचा किल्लेदार म्हस्के याने विजयगड जिंकून घेतला. पुढे मे महिन्यात श्रीनिवास पंतप्रतिनिधी, आनंदराव सोमवंशी सरलष्कर व कृष्णाजी दाभाडे कोकणात उतरले. त्याच वेळी जंजिरेकर सिद्दीच्या ताब्यात असलेला रायगड किल्ला जिंकण्यासाठी देखील बाजीराव पेशव्यांनी प्रयत्न केला. पण पेशव्यांना सुगावा लागू न देता प्रतिनिधीने स्वतंत्रपणे कारभार करून ८ जून १७३३ रोजी रायगड ताब्यात घेतला. त्यामुळे दरबारात प्रतिनिधीचा रूबाब वाढला, तर बाजीराव नाराज झाले. आंतोरे, नागोठणे, अवचितगड, बिरवाडी, निजामपूर, रायगड या जागा मराठ्यांच्या ताब्यात आल्या असल्या तरी, अंजनवेल, गोवळकोट, जंजिरा, उंदेरी हे बळकट किल्ले सिद्दीच्या ताब्यात होते. सिद्दीला पोर्तुगीज व इंग्रज मदत करतच होते. जून अखेर मराठ्यांनी थळ व रावळी हे किल्ले जिंकून घेतले. अंजनवेल व गोवळकोट काबीज करण्यासाठी बंकाजी नाईकाचे सिद्दीबरोबर युद्ध चालू होते. सन १७३३ मध्ये सेखोजी आंग्रे मृत्यू पावले. तेव्हा मानाजी आंग्र्यांच्या विनंतीवरून छ. शाहू महाराजांनी पिलाजी जाधवास कोकणात पाठवले. सेखोजीच्या मृत्यूनंतर संभाजी व मानाजी यांच्यात सरखेलीच्या पदावरून तंटा उत्पन्न झाला. तेव्हा छ. शाहू महाराजांनी त्या दोघांत समेट घडवण्याचा प्रयत्न केला; पण तो सफल झाला नाही. छ. शाहूंनी सरखेली सेखोजीकडे दिली. या सर्वांचा परिणाम म्हणून रायगड प्रकरणानंतर बाजीराव पेशव्यांनी जंजिरा मोहिमेतून आपले अंग काढून घेण्यास सुरुवात केली. सन १७३३ च्या डिसेंबर महिन्यात सिद्दीसोबत तह करून बाजीराव पेशव्यांनी जंजिरा प्रकरणातून पूर्ण माघार घेतली.
जंजिरा स्वारी यशस्वी होण्यासाठी आंग्र्यांच्या मदतीची गरज होती; पण संभाजी व मानाजी यांच्यातील भांडणामुळे या मोहिमेवर परिणाम होऊ लागला होता. १६३४ मध्ये छ. शाहू महाराजांनी उदाजी पवार यांना सिद्दीवर पाठवले. त्यांनी वाडी पाचाड येथे सिद्दी अफवानी याचा पराभव करून त्याचे मुंडके कापून आणले. महाड व बाणकोट हस्तगत करून रायगडाचा वेढा उठवला. पुढे १७३६ च्या सुरुवातीला पिलाजी जाधवांनी बाणकोट जिंकून घेतला व गोवळकोट आणि अंजनवेलवर चढाई केली. पण सिद्दी सातने प्रखर विरोध केला. याच वेळेस छ. शाहू महाराजांनी चिमाजी आप्पांस सिद्दी सातच्या बंदोबस्तास पाठवले. सिद्दी सात व त्याच्या फौजा रेवस बंदरातून सागरगडावर चालून गेल्या. रेवसजवळ कामार्ली येथे लढाई झाली. यात सिद्धीचे १३०० लोक कापले गेले, तर मराठ्यांची ८०० माणसे धारातीर्थी पडली. मानाजी आंग्रे यांना गोळी लागली, पण त्यातून ते बचावले. सिद्दी सातला नानाजीराव सुर्वे याने ठार मारले. याशिवाय उंदेरीचा सिद्दी याकुब, कृष्णाजी व सुभानजी घाटगे, कोंडनाईक व बाळाजी शेणवई हे ही मारले गेले. यावर आनंदी होऊन छ. शाहू महाराजांनी, ‘सिद्दी सात केवळ रावणासारखा दैत्य, तो मारून हबशांचा मूळ कंदच उपटून काढीला, चहूकडे लौकिक विशेषात्कारे जोडीला’ असे चिमाजी आप्पांच्या बाबतीत गौरवोद्गार काढून बहुमान, वस्त्रे, हिरेजडीत पदक, मोत्याची कंठी, रत्नखचित तलवार देऊन त्यांचा गौरव केला. हबशांचे दोन प्रबळ सरदार पडल्यामुळे सिद्दी रहमान याने पेशव्यांशी केलेला पूर्वीचा तह कायम ठेवून युद्ध थांबवले. मात्र यामुळे अंजनवेल व गोवळकोट हे महत्त्वाचे किल्ले सिद्दीकडेच राहिले. पुढे तुळाजी आंग्रे यांनी हे किल्ले सिद्दीकडून जिंकून स्वराज्यात आणले (१७४५).
पेशव्यांसह प्रतिनिधी, आरमार प्रमुख, सरलष्कर व राजमंडळातील सर्व प्रमुख सरदार सहभागी झाले, हे या मोहिमेचे प्रमुख वैशिष्ट्य, तर कोणा एका सेनापतीची हुकमत नव्हती, हे या मोहिमेचे वैगुण्य. प्रतिनिधी व पेशवे यांच्यातील वैमनस्य व बाजीरावांस दाभाडे, गायकवाड, प्रतिनिधी, वगैरे सरदारांनी न दिलेली कुमक यांमुळे ही मोहीम १७३६ पर्यंत लांबणीवर पडली. छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर प्रबळ झालेल्या सिद्दीकडे जवळजवळ ४० किल्ले होते. या मोहिमेमुळे ते किल्ले मराठ्यांकडे आले आणि सिद्दीला फक्त पाच किल्ल्यांवर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर सिद्दीकडील अनेक गावे मराठ्यांकडे आली. मराठ्यांचे पुन्हा एकदा कोकणावर वर्चस्व अबाधित राहिले, हे या मोहिमेचे फलित.
संदर्भ :
सरदेसाई, गो. स. मराठी रियासत – मध्य विभाग (१७०७—१७४०): हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास, मुंबई, १९२०.
No comments:
Post a Comment