शिलाहारवंशीय झंझ राजाने बांधलेलं,
कुकडी नदीचे उगमस्थान असलेलं,
जुन्नर तालुक्यातील पूर गावचं अद्भुत
"कुकडेश्वर शिवालय".
संदीप राक्षे
जगासाठी प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवराय त्यांचे जन्मस्थान असलेली भूमी म्हणजे पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर! जुन्नर हा परिसर आमच्यासाठी स्वर्गच! या निसर्गरम्य, पवित्र वास्तूंच्या स्वर्गात पुन्हा पुन्हा जावं इथली माती कपाळाला लावावी, इथल्या वास्तूंशी एकरूप व्हावं, गड किल्ल्यावरील कातळाशी नतमस्तक व्हावं! अस सतत वाटतं. मागच्याच आठवड्यातील रविवारी चावंड किल्ल्याची मोहीम केली होती. पाऊस व वा-यामुळे चावंड किल्ल्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले पूर गावचे कुकडेश्वर शिवालय हे पहायचे राहून गेले होते. या रविवारी जुन्नर तालुक्यातीलच निमगिरी किल्ल्यावर जायची योजना आखली होती. निमगिरीवर जाण्याअगोदर "दीपान्वित अमावस्या" असल्याने कुकडेश्वराच्या मंदिरात दिपोत्सोव करायचा आणि पुढे निमगिरी किल्ल्यावर जायचे असे ठरवले होते.
सकाळी नऊ वाजता भोसरीहून निघालो, यावेळी सोबतीला चिरंजीव गौरव, संकेत व पुतणी श्रद्धा होती. जुन्नर मध्ये शिवनेरीच्या पायथ्याशी दिगंबर शिंदे आमची वाट पहात थांबला होता, त्याला सोबत घेतले. शिवनेरीला प्रदक्षिणा घालून कुकडेश्वराच्या दिशेने निघालो. आज पाऊसाने उघडीप दिली होती. सह्याद्रीच्या कड्यावर ढग मात्र रेंगाळत होते. खरतर या सह्याद्रीची व ढग्गोबाईंची एक अनोखी मैत्रीच नजरेस पडते, वायुदेव इतक्या जोरदार प्रवाहाने त्यांना वाहून नेत असतो, पण ढग्गोबाई सह्याद्रीच्या रांगेत आल्या की स्थिर होऊन जातात आणि तासनतास रेंगाळत राहतात. हे नयनरम्य दृष्य पहातच आम्ही आपटाळे गावात पोहोचलो होतो. आपटाळे गावातून गाडीने उजवीकडे टर्न घेतला, पुढे थोडासा डोंगरमाथा लागला त्या डोंगराईवर बहर आलेली सागाची झाडं लक्ष वेधून घेत होती. चावंड किल्याच्या शेजारून पुढे आलो. कुकडी नदीवरील पूल ओलांडून डावीकडे जाणा-या रस्त्याने कुकडेश्वराच्या मंदिराजवळ पोहचलो होतो. डोंगरावरावरून येणा-या ओढ्याच्या खळखळाटाने आमचे स्वागत केले. आम्ही गाडीतून खाली उतरून कुकडी नदीचा उगम ज्या गोमुखातून होतो त्याचे दर्शन घेतले. आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस व श्रावणी महिन्याची सुरवात, अशा मध्यमुहूर्तावरील दीपान्वित अमावस्येचा योग साधून, घरून निघातानाच शिवालयात दिपोत्सोव करण्यासाठी पणत्या घेऊन आलो होतो. कुकडेश्वराच्या गर्भ मंदिरात पोहचलो, थोडी साफसफाई केली, मंदिरातील आजूबाजूच्या शिल्पावर कोळी जातीच्या किड्यांच्या भरपूर जाळ्या होत्या त्या काढून शिल्प कपड्यांनी पुसले व गौरव, दिगंबर, संकेत व श्रद्धा यांनी दिवे मांडण्यास सुरवात केली. आभाळ असल्याने व लाईट गेल्याने मंदिरात संपूर्ण अंधार होता. मंदिरातील प्रत्येक कोनाड्यात, कातळातील शिल्पासमोर दिवे मांडून ते मेणबत्तीच्या साह्याने पेटवले,
तमसो मा ज्योतिर्गमय!
एक एक दिवा पेटत गेला तसे शिल्पांचे सौंदर्य वाढत होते. डाव्या बाजूला असलेल्या गणेशाचे शिल्प, उजव्या बाजूचे महालक्ष्मीचे शिल्प व गर्भगृहातील पितळी पिंड दिव्यांच्या उजेडात सुवर्णमयी भासत होती. संपूर्ण मंदिर दिव्यांच्या उजेडाने लखाकून गेले होते, मंदिरात दिव्य अनुभूती अनुभवायला मिळत होती, पितळी पिंडीतून बाहेर पडणारी उर्जा व पेटवलेल्या दिव्यांची उर्जा यांचा संगम होऊन उर्जेचा एक भव्य अविस्मरणीय अविष्कार निर्माण झाला होता. क्षणभराची ही अनुभूती मंत्रमुग्ध करून गेली. दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. तर, दिवा मांगल्याचे प्रतिक आहे. अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपपूजन’ केले जाते. त्याच आषाढ अमावास्येला ‘दीपान्वित अमावास्या पण म्हणतात.
कुकडेश्वर प्रकटला, अज्ञान अंधार लोपला!
दिनरात्र प्रकाश अर्पी, अस्त न जया कल्पिला!
दुर्मिळ वास्तू इथे उभी दृश्य जयाचे महान!
शिल्पही जयांचे विशेषज्ञान देखती जे मनी सुजाण!
पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात शिलाहार वंशाचे राज्य होते. इसवी सन ९१० दशकात शिलाहार वंशामध्ये झंझ नावाचा राजा होऊन गेला. हा राजा शिव भक्त होता त्याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थानी बारा शिवालये बांधली. त्यातील हे कुकडेश्वर शिवालय, झंझ राजानेच बांधलेले हरिश्चंद्र गडावरील शिवालय प्रती बद्रीनाथ, केदारनाथ म्हणून सुप्रसिद्ध आहे. माझ्या दृष्टीने ही बारा शिवालय बारा ज्योतिर्लिंगा प्रमाणेच आहेत. प्रसिद्ध असलेल्या ज्योतिर्लिंगापेक्षाही या शिवालयात जी सकारात्मक उर्जा व चैतन्य जाणवते ते कुठेच जाणवत नाही. मी या शिवालय शृंखलेतील तीन चार शिवालयांचा साक्षात अनुभव घेतलेला आहे. या मंदिरात थोडावेळ जरी शांत बसलो तरी ॐ काराचा ध्वनी स्पष्ट ऐकायला मिळतो. दुर्दैवाने ही पवित्र स्थान आज दुर्लक्षित आहेत कित्येक शिवालय शेवटची घटका मोजत आहेत. आता हेच कुकडेश्वराचे मंदिर पाहिले याचा संपूर्ण कळसाचा भाग कोसळलेला आहे, त्या मुळे या मंदिराची सुंदरता नाहीशी झालेली आहे. पाश्चिमाभिमुख असलेलं हे शिवालय आतून बाहेरून अनेक शिल्पांनी नटलेले आहे. गर्भगृह चौरसाकृत असून मधोमध शिवलिंग आहे. गर्भगृहासारखाच अंतकृत भाग सुद्धा चौरसाकृत आहे. मधोमध अलंकृत चार खांब आहेत. मंदिराच्या अष्टकोनी भागात चाळीस योगिनी आहेत, त्यासोबत नवग्रह सुद्धा कोरलेले दिसतात. गणेशपट्टी, शिवतांडव, वराह अवतार, शिवगण, शिव, गौरी, भैरव, शैव व्दारपाल, खांद्यावर घागर घेतलेल्या गंगा यमुना देवी, विविध खांबावर सुर सुंदरी, यक्ष, किन्नर, गंधर्व, गणेश, शिव पार्वती, हंस पट्टी, कलश, फुलांची पट्टी तसेच वेगवेगळ्या भुमितीय आकृत्या कोरलेली कातळ शिल्प शिवालयाचे वैभव वाढवतात. तासनतास ही शिल्पकृती पहात राहावसं वाटते. एक एक शिल्प पहाताना प्रत्येक माणूस देहभान विसरून जातो. या शिवालयाची एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे पुर्वीच्या काळी, मुस्लिम आक्रमणाच्या वेळी या मंदिराचा बचाव व्हावा म्हणून गावक-यांनी हे शिवालय मातीने पूर्ण गाडून टाकले होते. त्यामुळे या जागी भली मोठी टेकडी तयार झाली होती. बराच काळ लोटला गेला. शिवालय मातीने झाकलेली पिढीही संपून गेली. या मंदिराचा विसर पडून गेला. इस १९३० च्या काळात या टेकडीवर गुराखी मुलाला एक भगदाड दिसले, त्या भगदाडात मधमाश्या ये जा करताना दृष्टीस पडल्या म्हणून त्याने ते भगदाड उकरायला सुरवात केली तर खाली नक्षीकाम असलेले दगड त्याला दिसले. त्या गुराख्याने गावात जाऊन वस्तीवरील माणसांनी या वास्तूची माहिती दिली. गावक-यांनी कुदळ फावडे घेऊन माती उकरायला सुरवात केली. आठ ते दहा दिवसांनी हे कुकडेश्वराचे शिवालय मातीतून मुक्त केले. इतकी अप्रतिम वास्तू दृष्टीस पडताच गावकरी आनंदीत झाले.
शिवशक्ती इथे प्रकटली!
सुवर्णकाळ भासला!
तेजोमय शिवालय दृष्टीस पडता!
अज्ञान अंधार लोपला!
इतके दिवस हे शिवालय मातीखाली असल्याने जीर्ण झाले होते. काही दिवसांनी शिवालयाचा कळस निखळून पडला त्याचे अवशेष मंदिराच्या आजूबाजूलाच अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. असेच अवशेष न्याहाळत असताना माझी नजर मंदिराच्या उजव्या बाजूला पडलेल्या शिल्पावर पडली. जवळ जाऊन पाहिले तर तर ते किर्ती मुख होते. कधीकाळी या मंदिराचा एक भाग हे किर्तीमुख होते, आज दूरअवस्थेत जमीनीवर पडलेले आहे. पौराणिक पुस्तकात या किर्तीमुखाविषयीची आख्यायिका वाचली होती.
एका बलाढ्य राक्षसाने देवांचा पराभव करून स्वर्गावर आपले राज्य स्थापन केले होते. तेथून तो तडक कैलासावर पोहोचला आणि विजयी झाल्याच्या त्वेषाने त्याने शिवशंकराकडे पार्वतीची मागणी केली. संतप्त शिवाने आपले तिसरे नेत्र उघडले आणि त्यातून विजेचा लोळ बाहेर पडला. त्या लोळातून पहिल्या राक्षसापेक्षाही बलवान आणि भयंकर असा दुसरा राक्षस निर्माण झाला. सिंहाचे डोके, त्यावर लांबलचक जटाधारी केस, प्रचंड शरीर असणाऱ्या या राक्षसाची निर्मिती शिवाने पहिल्या राक्षसाला खाऊन टाकण्यासाठी केली होती. या राक्षसाला पाहून पहिला राक्षस थरथरा कापू लागला आणि शिवाकडे क्षमायाचना करू लागला. भोळ्या शिवाला दया आली, पहिल्या राक्षसाला क्षमा केली. आता दुसऱ्या राक्षसाने शिवाला विचारले, माझी निर्मिती या पहिल्या राक्षसाला खाण्यासाठी तुम्ही केलीत. मी प्रचंड भुकेला आहे. आता मी कोणाला खाऊ? शिवशंकर त्या राक्षसाला म्हणाले, असं कर. तू स्वतःलाच खा." शिवशंकराची आज्ञा शिरसावंद्य मानून या राक्षसाने प्रथम आपले पाय खाण्यास सुरूवात केली. मग पोट खाल्ले. नंतर हात खाल्ले, छाती, मान खाल्ली आणि असे करता करता केवळ डोके शिल्लक राहिले. राक्षसाच्या या आज्ञाधारकतेवर प्रसन्न झालेल्या शिवाने त्याला तेथेच थांबवले आणि वर दिला, तो असा यापुढे तुला जग कीर्तिमुख म्हणून ओळखेल. माझ्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुझी स्थापना होईल. तुझ्यासमोर वाकल्याखेरीज माझे दर्शन लोकांना होणार नाही, त्यांना पुण्य प्राप्त होणार नाही. आज पाऊस नसल्याने वातावरण गरम होते, त्यात सूर्यदेव माथ्यावर येऊन पोहचले होते, वायूदेवाने तर चक्क आज सुट्टी घेतलेली होती. पुढे आम्हाला निमगिरी किल्ल्यावर जायचे होते. कुकडेश्वर महादेवाला पुन्हा एकदा साष्टांग दंडवत घातले आणि पुढच्या प्रवासाला निघालो...
सकाळच्या कुकडेश्वर मंदिरातील काही फोटो व व्हिडीओ मी स्टेटसला ठेवले होते. ते अनेक जणांनी पाहिले होते. ते स्टेटस पाहून लोकप्रिय खासदार डाॅ. अमोलजी कोल्हे यांची सावली असलेले, आमचे मित्र तेजस झोडगे यांचा मला फोन आला. जुन्नर तालुक्यात आपले स्वागत आहे, परंतु मी बाहेरगावी असल्याने भेटू शकत नाही. माझे स्वागत केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले व त्यांना माझी एक खंत बोलून दाखवली? कुकडेश्वर मंदिर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. अशी दुर्मिळ मंदिर, महाराष्ट्रात आताच्या घडीला, हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच शिल्लक आहेत. कुकडेश्वर मंदिराचा कळसाचा भाग संपूर्ण कोसळला असून त्यावर फक्त सिमेंट थापलेले आहे. त्यामुळे इतके वास्तुकलेचा अद्भुत नमुना व सुंदर मंदिर विद्रूप दिसत आहे. त्या माझ्या प्रश्नावर त्यांनी मला मधेच थांबवले आणि म्हणाले तुमच्या मनात असलेली खंत लवकरच दूर होईल, बरेच दिवस झाले पुरातत्व विभागाकडून मंदिराचे व कळसाचे ड्रॉईंग व खर्चाचे अंदाज पत्रक मिळत नव्हते त्यासाठी आपले कार्यक्षम खासदार डाॅ अमोलजी कोल्हे यांनी पुरातत्व खात्याला पत्र दिले. त्या पत्राची तातडीने दखल घेऊन बांधकामाचा सविस्तर आराखडा व अंदाजपत्रक तयार करून मान्यता देण्यात आली. यासाठी डॉ अमोलजी कोल्हे यांच्या सोबत स्थानिक आमदार अतुलजी बेनके व राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पुरातत्व विभागाकडून या मंदिर जिर्णोद्धाराची परवानगी मिळालेली असून लवकरच हे कुकडेश्वर मंदिर आपल्याला मूळ रूपात दिसेल. त्यांचे हे बोलणं ऐकून खूप आनंद झाला. डाॅ. अमोल कोल्हे आपल्या महाराष्ट्रातील अशा दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तूंच्या विषयी नक्कीच मनावर घेतील त्यामुळे अशा पवित्र वास्तुंचे, गडकिल्ल्यांचे जतन होईल यात शंकाच नाही..
संघर्षयोद्धा हे डाॅ अमोल कोल्हे
जिद्दी आणिक परिश्रमी!
दुर्दम्य इच्छाशक्तीने तयांच्या
मिळते दैदीप्यमान यशाची हमी!
मित्रांनो व माझा हा लेख वाचणा-या वाचक दानशूर बंधू भगिनींनो, प्रचलित सुप्रसिद्ध मंदिरापेक्षाही ही पुरातन मंदिर, गडकिल्ले उर्जादाई असतात, कल्याणकारी असतात इथेही रिद्धी सिद्धी पाणी भरीत असतात अशा दुर्लक्षित व दुर्मिळ वास्तूंना नक्की भेट द्या! अशा पुरातन ऐतिहासिक मंदिरांना, वास्तूंना दान धर्म करून, मोठ्या मंदिरांच्या इतकेच पुण्य तुम्ही इथे सुद्धा मिळवू शकता!
संदीप राक्षे
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment