विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 7 August 2021

महाराष्ट्राच्या इतिहासात लढवैया स्त्रिया चांदबिबी

 




महाराष्ट्राच्या इतिहासात लढवैया स्त्रिया

चांदबिबी
संदर्भ केतकरी कोश
चांदबिबी -चांदबिबी ही विजापूरचा बादशाहा अल्ली आदिलशहा ह्याची पत्नी व अहमदनगरचा बादशहा हुसेन निजामशहा ह्याची कन्या होय. हिचा जन्म अदमासें इ. स. १५४७ मध्यें झाला. हिचा अहमदनगर व विजापूर ह्या दोन्ही राजघराण्यांशीं अशा प्रकारचा संबंध असल्यामुळें तिला ह्या दोन्ही ठिकाणीं आपलें राजकारणचातुर्य व पराक्रमपटुत्व व्यक्त करण्याचे अनेक प्रसंग आले, व दोन्ही ठिकाणच्या इतिहासांत तिनें आपलें नांव गाजविलें. अल्ली आदिलशहा गादीवर बसल्यानंतर विजापूर व अहमदनगर ह्या दोन्ही राज्यांमध्यें तह होऊन, दोन्ही बादशहांचें सख्य झालें. त्यावेळीं हुसेननें ही लावण्यवती शहाजादी, अल्ली यास अर्पण करून, सोलापुरचा किल्ला त्यास अंदण दिला ( १५६४ ).
चांदबिबी व अल्ली ह्यांचा विवाह झाल्यापासून विजापूरच्या पातशाहीचा चांगला उत्कर्ष झाला. अल्ली यास राज्यकारभाराच्या कामीं चांदबिबीचें फार सहाय्य झालें, ती मूळची कुशाग्र, सद्गुणी व राज्यव्यवहारदक्ष होती.
ती युद्धकलेमध्यें चांगली निष्णात असून प्रत्येक स्वारीमध्यें घोड्यावर बसून आपल्या पतीबरोबर जात असे. तिला फारसी, अरबी इत्यादि भाषांचें ज्त्रान असून कानडी, मराठी इत्यादि भाषाहि समजत असत. आणि चित्रकला व संगीतशास्त्र ह्यांचीहि तिला माहिती होती.
अल्ली हा स. १५८० मध्यें निपुत्रिक मरण पावला मृत्यूपूर्वीं त्यानें आपल्या बंधूचा मुलगा इब्राहिम ह्यास गादीवर बसवून आपल्या पत्नीनें सर्व राज्यकारभार चालवावा अशी योजना केली होती. त्याप्रमाणें त्याच्या पश्चात् घडून आलें. इब्राहिम हा विजापूरच्या गादीवर येऊन चांदबिबी ही त्याच्या वतीनें सर्व राज्यकारभार पाहूं लागली. इब्राहीमचें वय ह्या वेळीं अवघें नऊ वर्षांचें असल्यामुळें चांदबिबीनें सर्व राज्यकारभार दिवाण कामीलखान ह्याच्या सहाय्यानें उत्कृष्ट रीतीनें चालविला. ह्या वेळीं दक्षिणेंतील सर्व राज्यांमध्यें विजापूरचें राज्य विस्तीर्ण व मोठें होतें. चांदबिबीनें नवर्याच्या पश्चात् विजापुरच्या बादशाहीचा लौकिक व दरारा तसाच कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. तिनें राजपुत्राच्या शिक्षणाकडे चांगलें लक्ष पुरविलें. व सर्व राजदरबारी कामें मोठ्या तत्परनें चालविलीं. ती न्यायाच्या कामांत फार दक्ष असे. बुधवार व शुक्रवार खेरीज करून सर्व दिवशीं, ती राजवाड्यांत आपला दरबार भरवून व राजपुत्रास तख्तावर बसवून न्यायनिवाडे स्वत: करी. त्यामुळें ती प्रजेस फार प्रिय झाली होती. पुढें दिवाण कामीलखान हा राणीस जुमानीनास झाला; व त्यानें तिचें महत्व कमी करण्याचा प्रयत्न चालविला. तेव्हां तिनें त्यास कामावरून दूर केलें. किशवर नामक दुसर्या एका जुन्या वजिरास दिवाणगिरी सांगितली. परंतु तोहि लवकरच उन्मत्त होऊन राणी व तिचे अनुयायी ह्यांच्या विरूद्ध बंड करण्याचा प्रयत्न करूं लागला. तेव्हां त्यास दिवाणगिरीवरून काढून टाकण्याची मसलत चांदबिबी व तिचे सरदार ह्यांनीं केली. परंतु ती सिद्धीस जाण्यापूर्वींच कोणी विश्वासघात करून ती किशवर यास कळविली. त्यानें एकदम इब्राहिमच्या नांवानें द्वाही फिरवून चांदबिबी हिला कैद केलें, व तिची फार अप्रतिष्ठा करून, तिला सातारच्या किल्ल्यावर बंदिवासांत टाकिलें ( १५८२ ).
चांदबिबी विजापूरांतून गेल्यानंतर सर्वत्र झोटिंग पादशाही माजली. किशवर ह्याची सत्ता कोणी जुमानीनासें झालें, शेवटीं अमीर उमराव व लष्करी लोक ह्यांनीं एकत्र होऊन व दिवाण किशवरखान ह्यास विजापुराहून पिटाळून लाविलें, पुन्हां चांदबिबीस सातार्याहून परत आणविले व एखलासखान नामक एका हबशीला दिवाण केलें. परंतु त्यामुळें ‘हबशी’ व दक्षिणी असे राज्यामध्यें दोन पक्ष झाले व ते परस्परांशीं मत्सरबुद्धीनें वागू लागले व त्याचा परिणाम बादशाहीस भोगावा लागला. वर्हाड, बेदर व गोवळकोंडा येथील बादशहांनीं आदिलशाही कमजोर झाली असें पाहून तिकडे स्वार्या करण्यास सुरूवात केली. अशा एका प्रसंगीं खुद्द विजापूर शहरास शत्रूंनीं वेढा घातला, व राजधानी काबीज करण्याचा प्रयत्न केला. ह्या आणीबाणीच्या प्रसंगीं चांदबिबी हिनें हिंमत धरून किल्ल्याचें रक्षण केलें व सैनिकांस प्रोत्साहन देऊन शत्रूंची चढाई होऊं दिली नाहीं. तिचें शौर्य व हिंमत सर्व लोकांस कळून चुकल्यामुळें सतत एक वर्षपर्यंत वेढा पडला असतांहि सर्व सैन्यानें मोठ्या उत्साहानें व निकरानें शत्रूसीं टक्कर दिली, व अखेर त्यासच वेढा उठवून परत जाण्यास भाग पाडिलें ( १५८४).
पुढें सन १५८५ त पुन्हां अहमदनगर व विजापूर येथील बादशहांचा शरीरसंबंध जडण्याचा योग आला. चांदबिबी हिचा भाऊ मूर्तिजा निजामशाहा याला इब्राहिम आदिलशाहाची बहिण खुदिजा बेगम ही दिली. त्याच वेळीं चांदबिबी अहमदनगरास आली. अर्थात् हें लग्न उरकून घेऊन राहिलेलें आयुष्य स्वस्थ चित्तानें ईश्वर भक्तींत घालवावें असा तिचा संकेत होता. परंतु ह्यावेळीं नगर येथील दरबारामध्यें विजापूरपेक्षांहि अधिक पक्ष व कलह माजले होते. त्यामुळें मूर्तिजा व त्याचा मुलगा मिरान ह्यांच्या मध्यें कलह सुरू झाला आणि या पितापुत्रांच्या झटापटींत मूर्तिजा ह्याचा वध झाला. ह्या प्रसंगीं इतिहासकार फेरिस्ता हा राजवाड्यामध्यें हजर होता. त्यानें स्वत: पाहिलेला हा वृत्तांत आपल्या ग्रंथांत लिहिला आहे. ह्यावेळीं चांदबिबी नगरच्या किल्ल्यांत हजर होती. मिरान ह्यानें आपल्या बापाचा वध करून गादी बळकाविली, परंतु लवकरच त्याचाहि शिरच्छेद होऊन अहमदनगर येथें झोटिंगबादशाही सुरू झाली. अखेर मूर्तिजाचा पुतण्या गादीवर येऊन जुमालखान हा मुख्य दिवाण झाला. परंतु ह्या बादशहाच्या विरूद्ध विजापूर व वर्हाड येथील शहांनीं प्रतिकार करून जुमालखानाचा पराभव केला. चांदबिबी ही ह्या परिस्थितीस कंटाळून पुन्हां विजापूरास परत गेली. तेथें गेल्यावर तेथील तिचा प्रजेकडून चांगला सत्कार झाला व बादशहानेंहि तिची मानमान्यता कायम ठेविली. चांदबिबी विजापुरास गेल्यानंतर अहमदनगर येथें राज्यक्रांति होऊन रक्तपात व मारामार्या चालू झाल्या. बुर्हाण निजामशहा मृत्यु पावल्यानंतर दरबारांतील निरनिराळ्या पक्षांनीं बहादुरशहा, अहमदशहा वगैरे अज्त्र बालकें गादीवर बसवून जो तो आपल्या हातीं सत्ता घेण्याचा प्रयत्न करू लागला. ह्यावेळीं मिया मंजू नामक एक वजनदार मुत्सद्दी पुढें आला व त्यानें अहमदशहाची बाजू उचलली व शहाजादा मुराद, जो गुजराथप्रांतांमध्यें तीस हजार सैन्यानिशीं होता त्यास आपल्या मदतीस बोलाविलें. दिल्लीच्या सैन्यास दक्षिणेंत प्रवेश करण्याची उत्कट इच्छा होतीच. मंजू ह्यांस प्रतमदर्शनीं आपल्या कृतीचें भावी फळ लक्षांत आलें नाहीं. परंतु मोंगली जेव्हां फौजा नगरावर चालून आल्या त्या वेळीं त्याचे डोळे उघडले व त्यानें नगरच्या इतर अमीरउमरावांची सल्ला विचरिली. सर्वांनीं त्याच्या कृत्याचा निषेध करून त्यास चांदबिबीस नगरास आणण्यास सांगितलें व त्याप्रमाणें त्यानें बोलावणें केलें. तेव्हां तिनें निजमशाहीची संकटावस्था पाहून उदार अंत:करणानें साह्य करण्याचें मान्य केलें व ती नगरास आली. तिचें वय ह्या वेळीं अदमासें ५० वर्षांचें होतें; तथापि तिचा अभिमान, तेजस्विता, शौर्य आणि धैर्य यत्किंचित् हि कमी झालें नव्हतें. तिनें नगरास येऊन सर्व राज्यसूत्रें आपल्या हातीं घेतलीं आणि प्रथम सर्व सैनिक लोकांस प्रोत्साहन देऊन किल्ल्याची तटबंदी वगैरेंचा पक्का बंदोबस्त केला; आणि मिया मंजू ह्यास गोवळकोंडें व विजापूर येथें पाठवून तिकडून कुमकेसाठीं अधिक सैन्य बोलाविलें. परंतु तिकडून कुमक येऊन पोहोंचण्यापूर्वींच नगरास दिल्लीच्या फौजा येऊन दाखल झाल्या व त्यांनीं शहराभोंवती वेढा घातला ( १५९५ ). तेव्हां चांदबिबीनें स्वत: मोठें शौर्य दाखवून किल्ल्याचें रक्षण केलें.
मुराद हा राणीचें अलौकिक शौर्य व विलक्षण धैर्य अवलोकन करून आश्चर्यानें थक्क झाला व त्यानें तिचें अभिनंदन करण्यासाठीं आपले प्रतिष्ठित सरदार तिजकडे पाठवून, तिच्या मर्दुमकीबद्दल तिला ‘चांद-सुलताना’ असा किताब समर्पण केला ( १५९६ ). यानंतर मंजु यानें पुन्हां अहमद शहाचा पक्ष स्वीकारिला. परंतु चांदबिबी हिनें बहादुरशहा हाच खरा वारसदार आहे असें ठरवून त्याची बाजू धरिली. हा तंटा लवकर मिटेना. तेव्हां चांदबिबीनें विजापुराहून इब्राहिम यास लढाऊ सैन्यानिशीं नगरास बोलाविलें. त्यानें निजामशाहीच्या खर्या वारसाची चौकशी करून बहादूरशहाच्या नांवानें द्वाही फिरविली. यानंतर कांहीं दिवस राज्यमध्यें शांतता झाली, आणि चांदबिबीनें राज्यासुधारणेंकडे लक्ष दिलें.
अकबर बादशाहा ह्याचा अहमदनगरचें राज्य काबीज करून घेण्याचा फार हेतु होता. सबब कांहींहि कारण नसतां त्यानें नगरवर स्वारी केली. चांदबिबी हिनें हें मोंगलांचें प्रचंड सैन्य येण्यापूर्वीं पुन्हां एकदां विजापुराहून सोहिलखान नामक एक अनुभवी मुत्सद्दी आणवून राज्यांतील अंतर्गत कलह नाहींसे करण्याचा प्रयत्न केला. अकबराचा पुत्र दानियल हा खानखान, राज अल्लीखान, राजा जगन्नाथ वगैरे मोठमोठ्या योध्यांसहवर्तमान प्रचंड सैन्यानिशीं इ. स. १५९७ च्या जानेवारीमध्यें नगरच्या राज्यावर चढाई करून आला. निजामशाही सरदारांनीं मोठ्या निकरानें मोंगली सैन्याशीं टक्कर दिली, व त्यांचा पराभव केला. अकबर बादशहाचा इतिहासकार अबुलफजल ह्यानें ह्या घनघोर रणसंग्रामाचें विस्तृत वर्णन दिलें आहे.
इ. स. १५९९ मध्यें दानियल हा पुन्हां नगरावर चालून आला. त्यावेळीं चांदबिबीनें कोणाहि दरबारी इसमावर विश्वास न ठेवतां आपल्या स्वत:च्या विचारानें या आलेल्या संकटाचा परिहार करण्याचा संकल्प केला. मोंगली सैन्य प्रचंड असल्यामुळें त्याशीं टक्कर देण्याचें सामर्थ्य निजामशाही सैन्यांत बिलकुल राहिलें नव्हतें. तेव्हां चांदबिबी हिनें युक्तीनें तह करून, बालराजासह जुन्नरास जाण्याचा विचार मनांत आणिला. परंतु निजामशाही सरदारांमध्यें दुफळी होऊन त्यांनीं चांदबिबी हिजवर हल्ला केला व मोंगल सैन्याशीं लढाई चालू असतांच हमीदखान नामक एका पठाण सरदारानें तिचा राजवाड्यांत खून केला ( सन १५९९ ). अर्थात चांदबिबीच्या मागें मोंगलांस नगर जिंकून घेण्यास फारसा वेळ लागला नाहीं. [ ऐने-इ-अकबरी; बील-ओरि. बायॉग्रा. डिक्शनरी; फेरिस्ता; इतिहाससंग्रह. पु. १. अं. ३; मुसलमानी रिसायत. ].

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...