विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 13 November 2021

#मराठ्यांमधले_देवक

 


#मराठ्यांमधले_देवक
देवक संकल्पना महाराष्ट्रातील मराठा व इतर बारा बलुतेदारात प्राचीन काळापासून अस्तित्वात असून खासकरून लग्नकार्यासारख्या विधीमध्ये याचा वापर होतो. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज ही संकल्पना बुरसट वाटत असलीतरी त्या त्या कालखंडाचा तो एक ठोकताळा आहे. समान रक्त आणि नातेसंबंध याच्या फायद्यातोट्यासाठी देवक ही संकल्पना आजही कार्यरत आहे. याविषयी मतमतांतरे असलीतरी याठिकाणी देवकाच्या इतिहासावर फक्त भाष्य केलेले आहे.
मराठे व इतर समाजात परंपरेने मानली जाणारी ही एक देवकल्पना आहे. प्राचीन काळापासून अनेक अनार्य जाती जमाती आणि द्रविड वंशातील लोकांनी आपल्या कुळांना पशुपक्षी, वनस्पती किंवा एखादी वस्तू यांची नावे दिली. अशा कुळांना त्या वस्तूवरून ओळखले जाऊ लागले. तेच त्या कुळाचे देवक झाले. एकंदरीत त्या पशू, वनस्पती किंवा वस्तूला देवाचे स्थान दिले. देवकाचा त्या त्या कुळाशी रक्तसंबंध किंवा काही गूढ संबंध असावा. मराठी विश्वकोशात देवकाविषयी पुढील मत मांडण्यात आलेले आहे, देवक कल्पनेची उत्पत्ती बरीचशी गूढ आहे. प्रत्येक कुलातील लोक विशिष्ट वनस्पती किंवा प्राणी यांच्यावर उदरनिर्वाह करीत आणि त्यांचा व्यापार करीत. सर्वांना लागणारे अन्न जपण्याची अथवा घातक वस्तूचा नाश करण्याची जबाबदारी विशिष्ट कुलावर असे. विशिष्ट वस्तूत व्यक्तीचा आत्मा असतो, मृताचा आत्मा विशिष्ट वस्तूत जातो. आदिम स्त्रीला ती प्रथम गर्भवती राहिल्याची जाणीव होई, तेव्हा एखाद्या वस्तूने उदरात प्रवेश केल्याची जाणीव होई, अशा परिस्थितीत ती ती वस्तू देवक म्हणून मानल्याची शक्यता दिसते. व्यक्तिचे किंवा कुळाचे वेगळेपण दाखविण्यासाठी त्यांना वस्तूंची किंवा प्राण्यांची नावे दिली असावीत.
“आदिवासी अवस्था मानवाची प्रारंभिक अवस्था मानली जाते. अनादि काळापासून मानवाच्या मनात निसर्गाविषयी एकप्रकारची अनामिक भीती, आदर, कुतूहल अशा संमिश्र भावना होत्या. आपल्याभोवती घडणार्याि घडामोडींचा कार्यकारणभाव मन जाणून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या घटनाबद्दल पशुपक्षी, वृक्ष, नद्या, पर्वत, डोंगर याबद्दल आदरयुक्त भीती व कुतूहल वाटते. त्यातूनच निसर्गातील उपयुक्त वस्तूंची, घटकांची पूजा, प्रार्थना करणे प्रारंभ झाले.”
‘ नॉर्थ अमेरिकन इंडियन’ जमातीचा अभ्यास करताना जे लॉन्गनी ‘ देवक म्हणजेच ‘Totem’ ही संकल्पना पुढे आणली. त्यातूनच देवक किंवा कुलचिन्ह या संकल्पनेच्या व्याख्या तयार झाल्या. कुळाशी संबंधित असणार्या प्राणी, वनस्पती किंवा इतर वस्तु यांना देवक किंवा कुलचिन्ह असे म्हणतात. त्या विषयांच्या रितीरिवाजाला कुलचिन्हवाद किंवा देवकवाद म्हणतात.
देवक संकल्पना भारतापुरती मर्यादित नाही. तर अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि ईस्ट, फिजी, न्यू गिनिया, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज इत्यादी बेटे याठिकाणी त्यांनी मानलेल्या सजातीयाचे जे नाव ठेवले जाते, त्यास टोटेम ( Totem ) असे म्हणतात. देवक हे त्याच्या जन्मावरून ठरते. टोटेम शब्द अमेरिकेतील ओजिब्वे ( Ojibwe) नावाच्या आदिवासी जमातीच्या भाषेतील ‘ ओतोतेमन’ ( Ototeman ) शब्दावरून घेतलेला आहे. यातील ओते ( ote ) शब्दाचा अर्थ होतो, एकाच आईचे, रक्ताचे. जगभर ज्याठिकाणी आदिवासीचा वावर राहिलेला आहे तेथे टोटेम अस्तित्वात असल्याचे दिसून येते. उत्तर अमेरिकेतील काही आदिवासीच्या ( हैडा, टिलीकिट, क्वाकीटुल ) बोली भाषेत ‘ओडम’ किंवा ‘डोडम’ हा शब्द प्रचलित असून त्यातूनच ‘टोटम’ शब्दाचा जन्म झाला. या आदिवासींचा विश्वास आहे की, त्यांचा विशिष्ट पशुपक्षी, वृक्ष अथवा एखादी विशिष्ट वस्तु यांच्याशी खास संबंध आहे.
देवक या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून Totem हा शब्द वापरला जात असलातरी धार्मिक बाबतीत दोन्हीच्या वापरात खूप फरक आहे. देवकला पर्याय म्हणून Totem शब्द तंतोतंत नसलातरी दोन्ही शब्दातील साम्य म्हणजे, यात आपला पूर्वज एखाद्या ठराविक वस्तूला मानतो आणि आयुष्यभर त्याचे पालन करतो. त्यामुळे केवळ भारतातच देवकाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांना मानतात असे नाहीतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिजी, इजिप्त अशा अनेक देशात Totem च्या माध्यमातून लोक आपल्या पूर्वजांना आठवण करतात.
देवकाबद्दल असलेला विश्वास व श्रद्धेतून वाईट वागल्यास देवक शिक्षा करेल किंवा चांगले वागल्यास देवक वरदान देईल अशी भूमिका आदिवासींच्या मनात तयार होते. यातून पाप पुण्य ही संकल्पना निर्माण होऊन देवकाच्या पुजा प्रार्थना व विधीसाठी कुळातील सर्व सदस्य एकत्रित येतात. त्यामुळे समूह एका विशिष्ट बंधनात बांधला जाऊन परस्पर नियंत्रीत केला जातो. देवक एक असणारी मंडळी आपण एकाच वंशाचे असल्याचे मानत असल्याने एकमेकांच्या सुख-दु:खात सामील होतात. त्यातूनच माणसाला सामाजिक आणि मानसिक सुरक्षा प्राप्त होते. एकच देवक असलेले कुलसदस्य परस्परांना बंधुभगिनी मानतात. त्यामुळे देवक एक असेलतर ते अंतर्गत विवाह करत नाहीत. म्हणून आदिवासी समाजामध्ये देवक बहिर्विवाहाचे प्रचलन दिसून येते. कुळांतर्गत व एकच देवक असलेल्या कुटुंबाअंतर्गत विवाह निषिद्ध मानला जातो.
व्यक्तीचा जन्म ज्या कुळात झाला असेल त्याला त्या कुळाचे सदस्यत्व प्राप्त होते. व ते त्या कुळाचे देवक असते. या देवकामुळे लहान मुलांचे पालनपोषण, संरक्षण होते, देवकाच्या आराधनेमुळे अपत्यप्राप्ती होते, देवकाच्या पवित्र्यामुळे आपणाला अनेक अनिष्ट प्रवृतीपासून मुक्ति मिळते अशाप्रकारची संबंधित लोकांची भावना निर्माण होते.
काही लोकांच्यामते देवक म्हणजे समुदायाची खूण. त्यानुसार पुर्वी माणूस गुहेत रहात असे. पुढे जशी त्याची प्रगती व्हायला लागली तसे त्याचे रहाणे समुदायाने एखाद्या सुरक्षित जागी व्हायला लागले. शिकार करून आपली उपजिविका करणे हे त्याचे महत्वाचे काम होते. शिकारीसाठी समुदायाने गेलातर त्याला आणखी फायदा व्हायला लागला. शिकारीसाठी कितीही दूर गेलातरी तो आपल्या एका निश्चितजागी परत यायला लागला. परंतु त्याकाळी घनदाट जंगले असल्याने त्याला आपले वस्तीस्थान सापडणे कठीण व्हायला लागले. त्यामुळे शिकारीला जाताना उंच झाडावर किंवा आपल्या वस्तीच्याठिकाणी काहीतरी खूण अडकावून ठेवायला लागला. लोकांच्या वस्त्याही वाढायला लागल्या. आपले घर कोणते हे सहज ओळखता यावे ही धडपड सुरू झाली. त्यातच ज्या प्राण्याची शिकार केली त्याचे डोकेवगैरेआपल्या निवार्याजच्या वरच्या बाजूला अडकवायला लागला. ती त्याची खूण झाली. पुढे वस्ती वाढली तशी खूण म्हणून आणखी वस्तूची गरज निर्माण व्हायला लागली. त्यातूनच मग विविध प्राण्याचे डोके, पाने, फुले, शंख, शिंगे व त्यानंतर धातूचा शोध लागल्यानंतर त्याच्यापासून बनविलेल्या वस्तू अडकवायाला लागला. यामुळे त्याला त्याचा निवारातर समजलाच परंतु त्याचवेळी त्याने वस्तीवर लावलेल्या वस्तूमुळे त्याची विशिष्ट ओळख व्हायला लागली. ही वस्तुच त्याचे देवक तयार झाले. लोकसंख्या वाढलीतरी त्याच्या कुळाची ओळखमात्र त्या त्या वस्तूमुळे कायम राहिली. त्यामुळे तो कोठेही गेलातरी त्या त्या कुळाचे देवक तेच राहिले आढळून येते.
लेखन
Dr. Satish kadam Sir
9422650044
क्रमश:

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...