विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 13 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग २५

 

भाग २५
निजामास असा प्रबळ सरदार आपल्या पक्षात हवाच होता म्हणून त्याने यशवंतरावांना माळवा प्रांतात जहागिरी व पंचहजारी साहेब नौबत हा काताब दिल्याचे जाहीर केले.( राजवाडे खंड 8 लेख 178 तारीख 19/8/ 1748 ) यावेळी मराठा राज्याची स्थिती फार नाजूक झाली होती .होळकर वगैरे दुसरे सरदारही निजामास मिळु पहात होते. ( म.रि.मध्य.वि.2 पृ. 241) तथापि यशवंतरावांनी प्रत्यक्षपणे असा विरोध मराठी राज्याशी केला नाही. शेवटी हे प्रकरण यशवंतरावां कडील काशीपंत (शिक्केनवीस) यांनी सदाशिवराव भाऊंचे दिवान रामचंद्रबाबा (सुखठणकर) यांच्याशी संधान बांधून मिटविले.( लेले दप्तर अप्रकाशित ) तेव्हा यशवंतरावांना पुन्हा जप्त झालेले महाल व किल्ले परत मिळाले.
इसवीसन 1751 च्या आरंभी मल्हारराव होळकर व जयाप्पा शिंदे यांनी वजीर सफदरजंग यास सहाय्य करून त्याचे शत्रू अहमदखान पठाण वगैरेंचा फारुखाबाद वगैरे ठिकाणी मोड केला ; व पेशव्यांचे नावांने दिल्लीच्या बादशहाकडून एक फर्मान करून घेतले. या फरमानाने मुलतान , पंजाब , राजपुताना व रोहीलखंड या सर्व मुलखात चौथाई वसूल करण्याचा हक्क मराठ्यांना मिळाला. या महत्त्वाच्या स्वारीत शिंदे , होळकर यांच्या बरोबर यशवंतराव पवार व तुकोजी पवार यांच्याकडील प्रत्येकी 1000 याप्रमाणे फौज देण्यात आली होती .या मदतीबद्दल स्वारीत वसूल झालेल्या सुरजमल जाटा कडील खंडणीचा हिस्सा पुढे यशवंतराव पवार व तुकोजीराव पवार यांना मिळाला होता.( इतिहास सं.पु. 7 अंक 1/2/3 स्फुट लेखन नंबर 2 पृष्ठ 203)
इसवी सन 1751 च्या ऑगस्टमध्ये यशवंतरावांनी पुन्हा स्वारीवर जाण्याची तयारी केली.( कवठेकर राजोपाध्ये दप्तर लेख 55) यावेळी ते पुण्यात होते (कवठेकर राजोपाध्ये दप्तर ले. 28) पुण्याहून पेशवे आॅक्टोंबरात गाजत गाजुद्दीनाच्या कामाकरता मोगलांकडे स्वारीवर निघाले होते ; त्यावेळी यशवंतरावांना दहाहजार फौजेनिशी खुदाबंद खाना वर पाठवले होते.(राज.खं.1ले 21 ता.11/10/1751) या स्वारीत घोडनदीचे युद्ध , कुकडी ची लढाई वगैरे लढायाही झाल्या.. शेवटी शिंगव्याचा तह जानेवारी1752 मध्ये झाला ; (मध्य वि.पृ.347 ) तथापि हे प्रकरण असेच पुढे चालले होते. अखेरीस भालकीचा तह नोव्हेंबर1752 मध्ये झाला तेव्हा ते प्रकरण मिटले. या युध्दाने पेशव्यांचे निजामशाहीवर चांगलेच वर्चस्व स्थापिले गेले.( मध्य.वि 2 पृष्ठ 357 )
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

० कमेंट्स



No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...