विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 25 March 2022

आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव का देण्यात आले असावे?

 


आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव का देण्यात आले असावे?
पोस्त सांभार ::विनय आपटे
मराठी माणसांनी दिलेल्या लढ्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातचे द्विभाषिक राज्य मोडण्याची अधिकृत घोषणा ८ मार्च १९६० रोजी करण्यात आली. त्यासाठी जेव्हा २३ एप्रिल रोजी लोकसभेत विधेयक मांडण्यात आले, तेव्हा त्यात ‘बॉम्बे राज्य’ आणि ‘गुजरात राज्य’ अशी दोन राज्य निर्माण करण्याची तरतूद होती. तेव्हा खासदार बॅ. नाथ पै, एस. एम. जोशी आणि आचार्य अत्रे आदी नेत्यांनी ‘महाराष्ट्र’ नावाचा आग्रह धरला. त्याला इतर भाषिकांचा खूप विरोध झाला. ‘भारत हे एक राष्ट्र असताना त्यात आणखी वेगळे महाराष्ट्र कशाला?’ असा युक्तिवाद करण्यात आला. शेवटी काँग्रेस श्रेष्ठींनी नाखुषीने ‘महाराष्ट्र’ या नावाला संमती दिली.
मराठी लोकांनी आपल्या राज्याला “महाराष्ट्र’ असे नाव देण्याचा आग्रह का धरला, याला इतिहास आहे. याची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी प्रथम आपण ‘राष्ट्र’ ही संकल्पना आणि ‘राज्य’ आणि ‘राष्ट्र’ यातील फरक समजून घेतला पाहिजे. ‘राज्य’ ही त्यातील नागरिकांचे नियमन आणि नियंत्रण करणारी संस्था असते. या नागरिकांत जेव्हा ऐक्यभावना निर्माण होते, तेव्हा राज्याचे राष्ट्र होते.
इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठयांची ओळख ‘राष्ट्र’ म्हणून स्वीकारली होती. इंग्रज अधिकारी आणि लेखक ऍकवर्थ याने लिहिले की “या देशातील इतर लोक जाती, पंथ, धर्म, जमाती आदी कारणांमुळे संघटित झालेले दिसतात, परंतु मराठे हे एक राष्ट्र आहे आणि त्याचा ब्राह्मणांपासून कुणब्यांपर्यंत सर्वाना अभिमान आहे”. वॉरेन हेस्टिंग्ज असे म्हणाला होता की, “हिंदुस्तानातील आणि दख्खनेतील सर्व लोकांमध्ये केवळ मराठे असे आहेत की, ज्यांच्यापैकी प्रत्येकाच्या मनावर राष्ट्रभावना कोरलेली आहे”. ऑर्थर वेलस्ली म्हणाला होता की, “स्वतःची विशिष्ट ओळख आणि भाषा असलेले मराठे ही भारतातील एकमेव राजकीय शक्ती होती, जी राष्ट्रीय भावनेने जोपासली होती”.
(दुर्दैवाने राजकारण्यांनी मतांसाठी आज मराठी समाजाच्या चिरफाळ्या उडवल्या आहेत.)
चौथ्या शतकात ‘महाराष्ट्र’ या शब्दाचा उल्लेख प्रथम आढळतो. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण या गावी सापडलेल्या स्तंभलेखात हा उल्लेख आहे. वरहमिहिराच्या इ.स. ५०५ मधील बृहतसंहितेत ‘महाराष्ट्रीय’ या अर्थी ‘महाराष्ट्रा:’ हा शब्द आला आहे. त्याच काळात दंडी कवीने ‘महाराष्ट्रातील भाषा मुख्यतः प्राकृत आहे’ असे लिहिले आहे. महानुभाव पंथाच्या साहित्यातही सातशे वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्र’ हा शब्द आढळतो. ‘महाराष्ट्र राज्य’ हे शब्द ‘जेधे करीना’ आणि ‘शिवचरित्रप्रदीप’ मध्ये आले आहेत. समर्थ रामदास स्वामींनी ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।’ असा प्रेरक संदेश दिला.
‘महाराष्ट्र’ या नावाला अशी पार्श्वभूमी असल्यामुळे मराठी माणसाने त्या नावाचा आग्रह धरला आणि काँग्रेस श्रेष्ठींनी तो मान्य करावा लागला. शेवटी १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...