विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 April 2022

महाराणी बायजाबाई_शिंदे.

 

महाराणी बायजाबाई_शिंदे.
पोस्तसांभार ::रणवीर शिंदे 



आज ग्वाल्हेरच्या शिंदे (सिंधिया) घराण्याची राणी असं म्हटलं की डोळ्यासमोर राजमाता विजयाराजे सिंदिया यांचं नाव आणि प्रतिमा समोर येते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी भारतीय राजकारणात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे त्यांचं नाव आपल्याला माहिती आहे. 'राजमाता' या त्यांच्या ओळखीमुळे त्यांची ग्वाल्हेरची राणी ही प्रतिमा आपल्या डोळ्यात येते.
पण विस्मरणात गेलेल्या ग्वाल्हेरच्या महाराणी आहेत. त्या राणी म्हणजे बायजाबाई शिंदे.
या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील होत्या. कागलच्या या मुलीने केवळ शिंदे घराण्याची सून म्हणून नाव कमावलं नाही तर अत्यंत दोलायमान राजकीय स्थितीत ग्वाल्हेर संस्थानचा कारभार पाहिला. बायजाबाई शिंदे यांच्या कर्तृत्वाचं वर्णन अनेक देशी-विदेशी इतिहास अभ्यासकांनी केलं आहे.
घाटगे घराण्याचा ग्वाल्हेरशी संबंध कसा आला?
कागल येथिल देशमुखी घाटगे घराण्याकडे होती. या घराण्यातील एक शूर पुरुष सखाराम म्हणजेच सर्जेराव घाटगे हे परशुराम पटवर्धन यांच्याकडे नोकरीस होते. पटवर्धन यांच्यामुळे त्यांचे पुण्यात पेशव्यांकडे येणे-जाणे होऊ लागले.
सर्जेराव घाटग्यांचे गुण पाहून त्यांनी पुण्यातच राहावे अशी विनंती नाना फडणवीसांनी केली आणि घाटगे पुणे दरबारातच रुजू झाले. पुढे सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर दुसरे बाजीराव पेशवेपदी आले तेव्हाच्या काळामध्ये महादजी शिंदे यांचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्याशी सर्जेराव घाटग्यांचा संपर्क आला.
सर्जेराव घाटगे यांच्या मुलीशी दौलतराव शिंदे यांनी विवाह करावा असा प्रस्ताव दुसऱ्या बाजीरावांनी मांडला. ही कन्या म्हणजेच बायजाबाई शिंदे होय. त्यानंतर शिंदे यांच्या दिवाणपदावर सर्जेराव घाटगे यांची नेमणूक झाली आणि मार्च 1798 मध्ये बायजाबाई घाटगे आणि दौलतराव शिंदे यांचा विवाह झाला.
शिंद्यांच्या दरबारातील वाढत्या वजनामुळे अप्रिय झालेल्या सर्जेराव घाटग्यांची आनंदराव नावाच्या एका सरदारांनी आणि मानाजी फाकडे यांच्या मुलाने 1810 साली हत्या केली.
दत्तात्रय बळवंत पारसनिस यांनी महाराणी बायजाबाई शिंदे या नावाने 1902 साली एक चरित्र प्रसिद्ध केलं आहे. या पुस्तकात या सर्व घडामोडींचे वर्णन केलं आहे. पारसनिसांचं पुस्तक मुंबईच्या बाबाजी सखाराम आणि कंपनीने प्रकाशित केलं होतं.
दक्षिणेची सौंदर्यलतिका
बायजाबाई शिंदे दिसायला अत्यंत सुंदर आणि सुस्वरुप होत्या असं वर्णन अनेक इतिहासलेखकांनी केलं आहे. इंग्रज लेखकांनी तिला ब्युटी ऑफ डेक्कन (दक्षिणेची सौंदर्यलतिका) असं म्हटलं आहे.
बायजाबाई शिंदे ग्वाल्हेरला गेल्यावर त्यांचा सर्व कारभारात वावर असे. शिकारीमध्येही त्या सहभागी होत. भाला फेकणे, बंदुकीने शिकार करणे, घोडेस्वारी अशा सर्व कलांमध्ये त्या निपुण होत्या.
दौलतराव शिंदे यांचा 1827 साली मृत्यू झाला. तत्पुर्वी आपला राज्यकारभार बायजाबाई शिंदे यांनीच सांभाळावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे बायजाबाई शिंदे यांच्याकडे ग्वाल्हेरच्या सर्व कारभाराची सूत्रं आली.
राज्यकारभार आणि हिंदुराव घाटगे
1810 साली सर्जेराव घाटगे यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा राजा हिंदुराव (मूळ नाव जयसिंगराव) ग्वाल्हेरला येऊन राहिला. हे हिंदुराव दौलतराव शिंदे यांच्याबरोबर काम करू लागले. हिंदुराव घाटगे यांचं ग्वाल्हेरच्या दरबारात मोठं प्रस्थ तयार झालं.
दौलतराव शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर बायजाबाईंनी शिंदे घराण्यातील मुकुटराव नावाच्या पुत्रास दत्तक घेऊन राजगादीवर बसवलं आणि त्यांचं नाव जनकोजी असं ठेवण्यात आलं.
त्यानंतर बायजाबाई यांनी आपला भाऊ हिंदुराव, बापूजी रघुनाथ, यशवंतराव दाभाडे, यशवंतरावभाऊ बक्षी, लालाभाऊ, फकीरजी गाढवे, माधवरावपंत ब्रह्माजी, लक्ष्मणराव विठ्ठल, रामराव फाळके, मणिराम शेट, दाजीबा पोतनीस, आत्माराम वाकडे या सरदारांच्या मदतीने आणि काही इंग्रज सैन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्यकारभार पाहायला सुरुवात केली.
बायजाबाई यांच्या राज्यकारभाराचं कौतुक अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे. 1 जुलै 1832 साली इंडिया गॅझेटमध्ये त्यांच्या वर्णनाबद्दल म्हटलं आहे, "The Regent Baee conducts the affairs of this state with great regularity, much better, I understand, than what was done in the time of late Maharaja" रिजंटबाई म्हणजेच बायजाबाई अत्यंत नियमितपणे कारभार चालवत असून दिवंगत राजे दौलतरावांपेक्षाही तो चांगला आहे, असं त्यात छापण्यात आलं होतं.
तर मिल्स हिस्ट्रीमध्ये बायजाबाई शिंदे या तेजस्वी, सत्वशील आणि कडक स्वभावाच्या होत्या असं म्हटलं आहे. मुंबई गॅझेटच्या पत्रकारांनी "बायजाबाई शिंदे यांचा कारभार पाहाता त्यांनी उत्तराधिकारी व्हावं हा दौलतरावांचा विचार किती बरोबर होता हे समजतं. त्या शांतता राखण्याच्या बाजूच्या होत्या", अशा आशयाचं वर्णन 1833 साली प्रसिद्ध केलं आहे. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीही बायजाबाईंना ज्ञानकोशात विशेष स्थान देऊन त्यांचं वर्णन लिहिलं आहे.
जनकोजी शिंदे आणि बायजाबाई शिंदे यांच्या बेबनाव
काही वर्षांनी दत्तकपुत्र जनकोजी आणि बायजाबाई यांच्यात राजकारभार कोण चालवणार यावरून वितुष्ट येऊ लागलं. या दोघांमधील कलह मिटवण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. साक्षात गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंक यांनीही 1832 साली ग्वाल्हेरमध्ये आल्यावर मसलत केली होती.
बायजाबाईंच्या नशिबी वनवास
1833 साली जनकोजी यांनी उघड बंड केले. बायजाबाई यांना अटक करण्याच्या हालचाली होत असतानाच बायजाबाई राजवाड्यातून निसटल्या आणि त्या हिंदुराव यांच्या वाड्यात आश्रयाला गेल्या आणि त्यांनी ब्रिटिश रेसिडेंट कॅव्हेंडिश यांच्याकडे मदत मागितली. परंतु या सर्व खटाटोपात जनकोजी शिंदे यांचं पारडं जड ठरलं आणि बायजाबाईंना ग्वाल्हेर सोडावं लागलं.
त्यांना धोलपूर, फत्तेगड, अलाहाबाद, बनारस असं फिरत राहावं लागलं. त्यांच्या हालअपेष्टांचं वर्णन तेव्हा 'दिल्ली अखबार', 'मुसफल आखबार' या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालं होतं.
अखेर 1840 ते 1845 अशी पाच वर्षं त्यांना नाशिकला काढावी लागली. 1844 साली जनकोजी शिंदे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांची पत्नी ताराबाई हिने जयाजीराव शिंदे यांना दत्तक घेऊन राज्यकारभार सुरु केला. त्यानंतर बायजाबाई पुन्हा ग्वाल्हेरला आल्या.
बायजाबाई ग्वाल्हेरला जयाजीराव शिंदे यांच्याबरोबरच राहू लागल्या. अखेर वृद्धापकाळातील आजारांमुळे त्याचं 27 जून 1863 साली निधन झालं. ग्वाल्हेर संस्थानाच्या कारभाराच्या, वाटचालीच्या त्या सहा दशकांहून अधिक काळ साक्षीदार होत्या.
विष्णूभट गोडसे यांनी माझा प्रवास या पुस्तकात वर्णन केलं आहे. बायजाबाई शिंदे सर्वतोमुख यज्ञ करणार आहेत असं पत्र मिळाल्यामुळेच त्यांनी कोकणातील वरसई गावातून उत्तर भारतात भ्रमण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पुस्तकात बायजाबाई शिंदे यांचा उल्लेख अनेकदा आढळतो.
अशा या महान महाराणीस मानाचा मुजरा 🙏🙏🙏
साभार
BBC मराठी.
Whatsapp University.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...