अपरिचित सरदार गाढवे देशमुख घराणे.
-----------------------------------------------
शिवपूर्वकाळापासून आणि त्यांनतर बरीच घराणी हि आपल्या पराक्रमाच्या जोरावर प्रसिद्धीस आली. त्यापैकीच एक हे सरदार गाढवे देशमुख घराणे.आपली समशेर रणांगणात गाजवून या घराण्याने अनेक किताब, पदव्या मिळविल्या.आपल्या हिमतीवर पाटीलकी देशमुखी मिरविलेल्या गाढवे घराण्याला आढळराव हा किताब होता.पुढे स्वराज्य जसे वाढू लागले तसे या घराण्यातील वीरपुरुषांचे घोडे हिंदुस्थानभर दौड मारू लागले.
गाढवे देशमुख घराण्याचा इतिहास खूप कमी प्रमाणात प्रकाशित झाला आहे.अनेक कागदपत्रांत त्यांच्या मूळ गावांची माहिती मिळते.प्रामुख्याने सातारा जिल्हा तसेच सातारा जिल्ह्यातील वाई व खंडाळा तालुक्यात गाढवे देशमुखांची गावे आहेत.साताऱ्याकडे जाताना आपल्याला जो खंबाटकी घाट लागतो त्याच्या अलीकडेच खंडाळा हे हायवे लगत असणारे गाव तालुक्याचे ठिकाण आहे.ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्वाचे आणि अनेक घटनांचे साक्षीदार असणाऱ्या खंडाळा गावची पाटीलकी सरदार गाढवेंकडे होती.
छत्रपती श्री राजाराम महाराज यांच्या कार्यकाळात गाढवे व खंडागळे यांच्यात पाटीलकी वरून वाद झाला होता त्याचा निवाडा महाराजांच्या निधनानंतर काही दिवसांनी झाला.'सीवाजी बीन संभाजी पाटील गाढवे यांनी तकरीर लिहून दिली होती ती पुढीलप्रमाणे,
"खंडागळे पाटील यांच्यावर कर्ज झाल्यामुळे त्यांनी आपली पाटीलकी आमचे मुळपुरुष बाळाजी पाटील गाढवे यांना विकली.खंडागळे पाटील यांच्याकडून पाटीलकी खरेदी करून बाळाजी पाटील गाढवे पाटीलकी करू लागले त्याच्यानंतर त्यांचा मुलगा कायकोजी पाटील गाढवे पुढे त्यांचा मुलगा नाईकजी पाटील गाढवे पाटीलकी करत होते यांना दोन मुले झाली,थोरले बाबाजी व धाकटे येकाजी पाटील गाढवे.
पुढे बाबाजी पाटील यांचा लेक मिलोजी पाटील त्यांचा लेक संभाजी यांनी पाटीलकी उपभोगली.खंडागळे यांनी आपल्या वडिलांच्या कारकिर्दीत कधी पाटीलकीवरून वाद घातले नाहीत.एवढेच काय तर आदिलशाहीपासून ते आता छत्रपती राजाराम महाराजांनापर्यंत एवढा मोठा काळ लोटला तरी खंडागळे यांनी कधी व्यवहार लावून धरला नाही म्हणजेच कधी पाटीलकी वरून वाद घातला नाही.बाळाजी पाटील गाढवे यांच्यापासून सातपिढी आम्ही पाटीलकी खात आलो आहे,न्याय मिळावा अशी तकरीर सीवाजी पाटील गाढवे यांनी केली होती."
खंडाळा या गावी गाढवे घराणे खूप पूर्वीपासून वास्तव्यास असल्याचे वरील तकरीर वरून समजते.ग्वाल्हेरचे सरदार गाढवे घराणे हे मूळचे खंडाळा या गावचे असल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत परंतु हे घराणे नक्कीच वाई-खंडाळा या भागातले असावे.
ग्वाल्हेरकर शिंदे सरकारांच्या दरबारात सरदार गाढवे घराण्याला महत्वाचे स्थान होते.सरदार गाढवे घराण्याचे नातेसंबंध ग्वाल्हेरकर शिंदे सरकार या मातब्बर घराण्याशी होते,त्यामुळे गाढवे घराण्याचा त्याकाळी असणारा दबदबा आणि वजन यावरून स्पष्ट होते.श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे यांनी उत्तरेत मराठा साम्राज्य मजबूत केले तेव्हा गाढवे घराण्यातील वीरपुरुषांनी शिंदे सरकारांच्या पदरी राहून स्वराज्य सेवा केली.
सरदार लिंगोजीराव गाढवे हे सुभेदार राणोजीरावांचे मुख्य साह्यकर्ते होते,त्यांनी राणोजीबाबांची सावली बणून महत्वपूर्ण लढायांमध्ये आपला पराक्रम गाजवला. सरदार लिंगोजीराव गाढवे यांची मुलगी सखुबाईसाहेब शिंदे यांचा विवाह सुभेदार जयाप्पाराव शिंदे यांच्याशी झाला होता.त्यामुळे या दोन्ही घराण्याचे नातेसंबंध अधिकच घट्ट झाले.पुढे सखुबाईसाहेब यांचे बंधु सरदार सखोजीराव(मामासाहेब) गाढवे यांनी श्रीमंत जयाप्पाराव यांना भक्कमपणे साथ दिली.आपले भाचे जनकोजीराव शिंदे यांच्या पाठीशी आपली तलवार निष्ठेने धरली. पानिपतच्या रणांगणात जनकोजीरावांच्या पाठीवरील वार आपल्या छातीवर घेऊन धारातीर्थी पडले. पानिपतनंतर यांचा उल्लेख शिंदे सरकारांच्या राजकारणात किंवा पत्रव्यवहारात मिळत नाही.पानिपतच्या युद्धात सरदार तुकोजीराव गाढवे धारातीर्थी पडले.
कोटे संस्थानचे कमावीसदार लालाजी बल्लाळ यांना लिहिलेल्या पत्रात सरदार कुमाजीराव गाढवे यांचा उल्लेख आढळतो.शिंदे सरकारांचा पत्रव्यवहार प्रकाशित करणारे सरदार फाळके घराण्याचे वंशज लेखक आनंदराव फाळके यांनी सरदार कुमाजीराव गाढवे यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती दिली आहे.ती पुढीलप्रमाणे,
"कुमाजी गाढवे हा शिंदेशाहीत शिलेदार होता परंतु हुजरातपैकी शिलेदार असल्यामुळे तो कोणी साधारण शिलेदार नसावा." कुमाजीराव गाढवे सोबतच सरदार सिधोजीराव गाढवे हे शिंदे सरकारांच्या सेवेत होते.
श्रीमंत महादजी शिंदे यांचे प्रमुख सहकारी सरदार खंडोजीराव गाढवे,रघोजीराव गाढवे यांनी शिंदे सरकारांच्या पदरी राहून निष्ठेने स्वराज्यसेवा केली.
सरदार फकीरजी गाढवे यांनी श्रीमंत महादजीबाबांच्या निधनानंतर श्रीमंत दौलतराव शिंदे सरकार यांच्या कार्यकाळात महत्वपूर्ण भूमिका निभावली.आपल्या मुत्सद्देगिरी व पराक्रमामुळे सरदार फकिरजी गाढवे यांना शिंदे सरकारांच्या दरबारात महत्वाचे स्थान प्राप्त झाले.राजस्थानकडील भाग फकिरजींनी कायम आपल्या तलवारीच्या धाकात ठेवुन चोख बंदोबस्त लावला.सरदार फकिरजी गाढवे यांना महाराणी बायजाबाईसाहेब यांनी खाजगीपागेतुन 200 घोड्यांचे पथक देऊन त्यांचा दरबारात मोठा सन्मान केला. फकिरजी गाढवे यांनी अविरतपणे शिंदे राजघराण्याची सेवा केली.पुढे हा वारसा त्यांचे पुत्र सरदार नानासाहेब गाढवे यांनी चालविला.
सरदार कुमाजीराव गाढवे यांची माहिती देताना आनंदराव फाळके यांनी गाढवे घराण्याची कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे या घराण्याची इतर माहिती व इतिहास मिळण्याची शक्यता कमी असल्याची खंत व्यक्त केली आहे.दुर्लक्षित राहिलेल्या सरदार गाढवे घराण्याची माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असुन यातुन नवीन माहिती हाती लागेल.
-----------------------------------------------
प्रसाद शिंदे
संदर्भ-शिवचरित्र साहित्य खंड-१.
शिंदेशाही इतिहासाची साधने.
मराठी रियासत उत्तर विभाग-३.
तवारीख-ए-शिंदेशाही.
No comments:
Post a Comment