विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 April 2022

शिंदे म्हैसाळकर याच्या घराण्याची माहिती

 

स्व.श्रीमंतकेदारराव

शिंदे म्हैसाळकर याच्या घराण्याची माहिती 
पोस्तसांभार :मयुरेश शिंदे 
विजयनगरचे पाडावानंतर बरेचसे थोर घराण्यातील शिलेदार आपणांजवळ असणाऱ्या ,सैन्यनिशी विजयनगर दौलताबाद सोडून उत्तरेकडे वळले. त्यातीलच शिवछत्रपतींचे घराणे दौलताबाद जवळ वेरुळ जवळच्या परगण्यात स्थायिक झाले. जिजाबाईंचे माहेर - जाधवराव हे पण याच कालखंडात उदयास आले. भोसले घराण्यातील मालोजी ,शहाजी वगैरे पराक्रमी पुरुष दक्षिणेतील यवनांच्या दरबारी शिलेदारी करू लागले.त्यावेळी शिंदे घराण्यातील पराक्रमी असे काही शिंदे महाराष्ट्रात आले आणि त्यांनी पण स्वपराक्रमांनी आपल्या छोट्या जहागिऱ्या स्थापन केल्या. कण्हेरखेड हे शिंदे घराण्याचे पहिले ठिकाण मानले जाते. त्याबरोबरच तोंडली-बोंडली ही इनामी गांवे पण शिंदे घराण्याचीच होती. या शिंदे लोकांपैकी काह पराक्रमी पुरुष ढवळेश्वराला स्थायिक झाले. आजही त्या गांवी शिंदे घराण्यातील मूळ पुरुषांच्या समाध्या प्रचंड स्वरुपात उभ्या आहेत. तसेच कांहीसे कर्नाटकात मोडणारे म्हैसाळ हे टुमदार कृष्णेच्या काठी असलेले गाव शिंदे घराण्याचेच आहे. कण्हेर गावी शिंदे हे पाटील म्हणून घेत असत आणि त्यामुळेच महादजी शिंदे यांना पेशवे दरबारात पाटील बाबा म्हणून मोठ्य सन्मानाने संबोधले जायचे.
शिंदे सरकार-कसबे म्हैसाळ गांवचे सरंजामदार
या घराण्याचा फार जुना इतिहास उपलब्ध नाही. परंतु सर्वसाधारण १५ व्या शतकापासून इतिहास मिळू शकतो. उपलब्ध माहितीनुसार या शिंदे सरंजामदार घराण्याचा मूळ पुरुष “भवानराव शिंदे'' हे गावाचे राजे म्हणून कार्यभार सांभाळत होते. त्यांचा मोठा वाडा गावाच्या मध्यावर, टेकडीवर, उंचवट्यावर होता. (सध्या तो वाडा पाटील यांना विकला आहे) जवळ जैन मंदिर, सरकारी घोड्याची पागा, चौगुले यांचे वाडे होते. खाजगीतला वाडा व त्याचे जवळ दप्तरखाना, दिवाण कुलकर्णी यांचे ऑफिस होते. त्या इमारतीजवळ प्रचंड बुरुज होता टेहळणीसाठी व प्रत्येक तासाला तास वाजविणेची व्यवस्था होती. अजूनही ह्या ठिकाणी हुड्यांचा वाडा म्हणतात. तो स्वर्गीय मलगोंडा केसगोंडा पाटील यांनी पुढे खरेदी केला. त्यांना हुड्यांतील पाटील म्हणतात. नियमित आयुष्य जगणारे भवानराव एक सरंजामदार होते. भवानरावांना दोन राण्या होत्या मोठ्या विठाबाई व धाकट्या नबाबबाई. भवानरावांच्या पश्चात या दोन्ही स्त्रियांनी बरीच वर्षे म्हैसाळ गांवचा कारभार पाहिला असावा असे वाटते. या दोन्ही स्त्रियांनी गावासाठी काही सार्वजनिक कामे केल्याचे दाखले आहेत.अशा या दोन्ही महत्वाकांक्षी स्रियांनी कांही वर्षे म्हैसाळचा कारभार पाहिला व पुढे वंशाला वारस असला पाहिजे म्हणून सहकार्यांच्या विचाराने दत्तक घेणेचा खल सुरु झाला. त्यावेळी सरकारांनाच शिंदे म्हणत. इतर भाऊबंदांना '“मोकाशी” म्हणत असत. मोकासा म्हणजे वतन, त्यावरून या लोकांना शिंदे आडनाव असतानाही मोकाशी म्हणत. अजुनही काही गावात मोकाशी नावांची मराठ्यांची घराणी आहेत . म्हैसाळ मधील मोकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही लोकांनी नंतर शिंदे हेच आडनांव चालू ठेवले.भवानरावांच्या पहिल्या पत्नी विठाबाई यांनी वारसासाठी दत्तक घेणेचा विचार केला.त्याचवेळी भवनरावांच्या दुसऱ्या पत्नी नबाबबाई यांनी पण दत्तक घेणेचा विचार केला. गावात दोन वारसदार होणेची चिन्हे दिसू लागली. दोन्ही बाजुचे लोकांतील कांही भाऊबंद विठाबाईकडे तर कांही नवाबबाईकडे. तसेच गावातील लोकांमध्ये पण झाले. जो तो जागरुक हालचाली पाहू लागला व करु लागला. विठाबाईंनी आपल्या जवळच्या भाऊबंदापैकी मुलगा पाहिला तो म्हणजे ''केदारराव ऊर्फ आप्पासाहेब' होत, या मुलाच्या वडिलांचे नांव बाबासो शिंदे मोकाशी. हा भाऊबंद तसा थोडा जवळचा होता. बाबासोंच्या पत्नीचे नांव राधाबाई या सोनीच्या चव्हाण घराण्यातील होत्या. बाबासो व राधाबाई यांचा एकच असलेला पुत्र केदारराव यांना विठाबाईंनी दत्तक घेतले.यावेळी कोल्हापुरच्या गादीवर छ.चौथे शिवाजी होते. वयाने ते लहान होते. त्याकाळी संस्थानाचा कारभार ब्रिटीश अधिकारी (रिजंट) पाहत असे. दत्तक युवराजांची सर्व व्यवस्था, शिक्षण वगैरे त्यांच्या नजरेखाली चाले. म्हैसाळची मंडळी कोल्हापुरला कोणाकडे गेली, केदाररावांना रिजंट पुढे कोणी उभे केले हा इतिहास दुर्देवाने जाणू शकत नाही. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या शिक्षणासाठी जय्यत तयारी सुरु होती. त्यासाठी रिजंटने सौराष्ट्रातील राजकोट राजधानीत प्रिन्स कॉलेजमध्ये छत्रपतींच्या शिक्षणाची व्यवस्था करणेचे ठरविले होते. ह्या कॉलेजमध्ये प्रायमरी, सेकंडरी, हायर एज्युकेशनची व्यवस्था होती. फक्त भारतातील राजे लोकांच्याच मुलांनाच तिथे घेतले जाई. कोल्हापूरच्या रिजंटने छत्रपती युवराजाबरोबर कंपॅनियन्स म्हणून दक्षिण भागातील संस्थानाच्या राजपुत्रांना सिलेक्ट केले होते. भाग्याची गोष्ट म्हणजे अतिशय स्मार्ट, हुशार, चपळ अशा या म्हैसाळच्या राजपुत्राला छत्रपतींचा एक कंपॅनियन म्हणून राजकोटच्या प्रिन्स कॉलेजमध्ये शिक्षणाची संधी मिळाली. कोल्हापुरने म्हैसाळचा सरंजामदार घडविला'' आहे. या सर्वांचा छोट्या केदाररावांवर फारच चांगला परिणाम झाला ते बहुश्रुत झाले. इंग्रजी विषयावर त्यांनी जबरदस्त पकड बसविली. ब्रिटीशांपेक्षा तडफदार ते इंग्रजी बोलत, अस्खलीत उच्चार, भरीव आवाज, उत्तुंग व्यक्तिमत्त्व, प्रसन्न जरब बसविणाराचेहरा यामुळे त्यांच्या पुढे उभे राहून बोलणे म्हणजे एक दिव्यच वाटत होते. ह्या नंतर कागलचे महाराज जयसिंगराव घाटगे हे कोल्हापूर संस्थानचे रिजंट झाले.आप्पासाहेब म्हैसाळकर कोल्हापूर या ठिकाणीच असल्याने साहजिकच जयसिंगरावांच्या सानिध्यात आले. त्यांच्या बरोबर कोल्हापूर संस्थानच्या कारभारात लक्ष घालू लागले.तडफदार, उत्साही, बाणेदार, उमदा, राज घराण्याचे तेज असलेला हा म्हैसाळ जहागिरीचा तरणाबांड राजपुत्र जयसिंगराबांसारख्या राजकारणी चाणाक्ष, धुरंदर व्यक्तीच्या नजरेतून कसा सुटेल. जयसिंगरावांनी आपला मोठा मुलगा श्रीमंत यशवतराव यांना कोल्हापुरच्या गादीवर दत्तक दिले आणि तेच सर्व मराठ्यांचे दैवत शाहू महाराज. जयसिंगरावांच्या सानिध्यात केदारराव आल्याने चतुर जयसिंगरावांनी आपली धाकटी मेहुणी लक्ष्मीबाई यांचा विवाह केदारराव ऊर्फ आप्पासाहेब यांच्याशी केला. कोकणातील सुर्वे कुटुंब हे खानदानी कुटुंब आहे. ह्या सात बहिणी व दोन भाऊ (अप्पासाहेब व मामासाहेब) होते. त्यातील पहिली मुलगी कागल घराण्यातील जयसिंगराव घाटगे यांना दिली होती. मागील सहा पण अशाच जहागिरदारांना दिल्या होत्या. केदारराव व लक्ष्मीबाई हे दोघेजण कोल्हापूर, कागल या ठिकाणी रहात होते. महाराजांचा दत्तकविधी, शिक्षण व राज्याभिषेक होईपर्यंत केदारराव कोल्हापूर मध्येच होते. छ.शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार सुरु केल्यानंतर जयसिंगरावांच्या राजकारणाच्या तालमीत तयार झालेल्या आपल्या लोकांना जवळ केले. ह्यात प्रमुख आप्पासाहेब ऊर्फ केदारराव होते. सख्या मावशीचा पती म्हणून श्रीमंत केदारराव शिंदे म्हैसाळकरांना कोल्हापूर संस्थानात फार मान होता कोल्हापूर संस्थानात बराच काळ राहून श्रीमंत केदारराव आपल्या स्वत:च्या जहागिरीतम्हैसाळ या ठिकाणी अंदाजे २४-२५ व्या वर्षी आले. ह्यावेळी दीड-दोन हजार लोकवस्तीअसलेले हे छोटे गाव होते. म्हैसाळ हे सांगली संस्थानच्या अधिपत्याखाली होते. त्याला “कसबा म्हैसाळ'' असे म्हणत असत व अजूनही “'कसबा म्हैसाळ'' म्हणूनच सांगली जिल्ह्यात ओळखतात. तशी ही जहागिरी - सरंजाम सात गांवचा मिळून होता. त्यामध्ये मुख्य कसबे म्हैसाळ, नरवाड, कवठेगुलंद, मल्लेवाडी, मळणगांव वगैरे गाव होती. त्याकाळी सरंजाम एकत्र न ठेवता त्या त्या गांवात शिंदे सरकार घराण्याला एक एक गांव दिले. त्यातील कांही गावे सांगली संस्थानाच्या अधिपत्याखाली व कांही मिरज संस्थानाच्या अधिपत्याखाली होती. उदा. नरवाड मिरज संस्थानात होते. ब्रिटीशांच्या "Divide and Rule" यानुसार सर्वांना स्वतंत्र करुन त्यांच्यामध्ये भांडणे लागावीत ही त्यांची विचारसरणी/ विचारधारा होती आणि आत्तापर्यंत ते सर्वांच्यात छोटे मतभेद आहेत. श्रीमंत केदारराव शिंदे म्हैसाळमध्ये आले. सध्या जैन मंदिराजबळ जो सरकार वाडा आहे तो सध्या स्वर्गीय मलगोंडा पाटील यांचे नातू व स्वर्गीय बाळासो मलगोंड पाटील यांचे चिरंजीव डॉ. श्री बापूसाहेब पाटील यांच्याकडे आहे. हा वाडा प्रचंड मोठा होता. त्याच्या दक्षिण बाजूस स्वतंत्र कचेरीची इमारत होती. मुख्य इमारतीच्या उत्तर बाजूस स्वतंत्र घोड्याच्या पागा,जनावरांचे गोठे होते.
संदर्भ ग्रंथाचे नाव - आनंदयात्री
लेखकाचे नाव - डॉ. श्री जयसिंगरावबाबा शिंदे (म्हैसाळकर)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...