विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 May 2022

मल्हारराव होळकर. कारकीर्द : दि.16 मार्च 1693 ते दि. 20 मे 1766


मल्हारराव होळकर.
कारकीर्द : दि.16 मार्च 1693 ते दि. 20 मे 1766
मल्हाररावांचा जन्म भटक्या धनगर मेंढपाळ कुटुंबात झाला . त्यांचे वडिल खंडोजी वीरकर चौगुला यांचा अशाच भटकंतीत बारामती तालुक्यातील होळ गावी मुक्काम पडला होता .तिथे दि.16 मार्च 1693 रोजी मल्हाररावांचा जन्म झाला . मल्हारराव लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला . भाउबंदांचा जाच वाढू लागला म्हणून त्यांनी मातोश्रींसमवेत सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला . होळ गावातील वास्तव्य संपले पण होळचे नाव त्यांच्यामागे कायमचे चिकटले .
मल्हारराव आपल्या पराक्रमाने कसलीही घराणेशाहीची परंपरा नसताना , स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचा मुख्य आधारस्तंभ बनले . ते एक धोरणी मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते . मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे ते पहिले सुभेदार होते . मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मल्हाररावांचा फार मोठा वाटा होता . श्रीमंत पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली होती . अंगी गुण असले , वीरश्री असली तर एखादा सामान्य धनगर मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले .
दाभाड्यांचे एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या टोळीतून मल्हाररावांनी आपली कारकीर्द सुरू केली . शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली . आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांना इ.स.1729 च्या सुमारास माळवा प्रांताची सुभेदारी मिळाली .
मामांची मुलगी गौतमी हिच्याबरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला . त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले . उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती .राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत मल्हारराव माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते . उत्तर हिंदुस्तानामधील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा झाला होता . इ.स.1733 मध्ये माणकोजी शिंदे यांची कन्याअहिल्याबरोबर पुत्र खंडेरावांचा विवाह लावून देण्यात आला . दि.17 मार्च 1754 रोजी कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यातून सोडलेला तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले . अहिल्याबाई सती जाण्यास निघाल्या असता मल्हाररावांना त्यांचा विचार बदलण्यात यश आले . पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या . इ.स.1758 मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकावले . यात मल्हाररावांचा मोठा वाटा होता . मात्र मोगल सरदार नजीबच्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या , आणि त्याला मोकळे सोडून दिले . याच नजीबने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले . रणांगणात मराठ्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला .
मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग मित्र हौते . उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला होता . मोगल बादशहाचे सर्व सरदार या दोघांना टरकून असायचे . अब्दालीच्या तीन स्वाऱ्यांनंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील असा विश्वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता . त्याने कनोज येथे होळकर शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला होता . ( दि.27 मार्च 1752 )
जयाजी शिंदेंचा बिजोसिंगाने केलेला खून आणि कुंभेरच्या लढ्यात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती मृत्यू या प्रकरणांमुळे शिंदे होळकरात वैमनस्य निर्माण झाले होते . मराठी साम्राज्याच्या हितासाठी होळकरांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला . बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे झुंजत असताना मल्हाररावांनी तुकोजीराव होळकरांना मदतीसाठी पाठवले होते .
पानिपतच्या युद्धापूर्वी दि.13 मार्च 1760 रोजी मल्हाररावांनी अब्दालीशी तह करून त्याला परतही पाठवायची सुरूवात केली होती . पण ते जुळून आले नाही . दि.14 जानेवारी 1761 रोजी पानपतावर मराठ्यांची शिकस्त झाली .
पराभवाचे शल्य मनात बोचत असतानाच त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमीबाई यांचे दि. 29 सप्टेंबर 1761 रोजी निधन झाले . त्यामुळे ते आणखीनच खचले . अहिल्याबाईंची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा त्यांच्याशी सल्ला मसलत करीत असत स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्याबाईंना पार पाडाव्या लागत .
पानिपतनंतर मराठेशाहीची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यात मल्हाररावांनी माधवराव पेशव्यांबरोबर पुढाकार घेतला .अशाच एका मौहिमेवर असताना दि.20 मे 1766 रोजी अलमदूर येथे मल्हाररावांना मृत्यूने गाठले . आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या .पेशव्यांच्या घरात त्यांना वडिलकीचा मान होता .
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य , निष्ठेने वाढवण्याची जबाबदारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती . मराठी साम्राज्य वाढवण्याच्या कामी मल्हाररावांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा सिंधू नदीपर्यंत वाढवल्या .
आज स्मृतीदिनी शूर सुभेदार मल्हाररावांना त्रिवार मानाचा मुजरा !
✍️मुकुंद कुलकर्णी.

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...