मराठ्यांच्या एकंदरीत मानसिकतेवर टाकणारं एक महत्वाचं पत्रं इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी इतिहाससंग्रहाच्या ऑक्टोबर १९०८च्या अंकात प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रं महत्वाचं का आहे? पुढे त्याबद्दलच सांगतो आहे..
इ.स.१७९२ मध्ये महादजी शिंदे दक्षिणेत आले आणि त्यांनी पुढे आपले दत्तक पुत्र दौलतराव शिंदे यांचा लग्नसोहळा उरकून घेतला. या लग्नसोहळ्याला नाना फडणवीस गेले असताना महादजीबावा आणि नाना या दोघांमध्ये अत्यंत मैत्रीपूर्ण बोलणी झाली. या सगळ्या घटनेचा वृत्तांत नाना फडणवीसांनी पुढे पुण्यात आल्यावर हैदराबादचे वकील गोविंदराव काळे यांना लिहून कळवला. गोविंदराव काळ्यांना ही बातमी ऐकूनच इतका आनंद झाला की त्यांनी नाना फडणवीसांना उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात मराठ्यांच्या एकंदरच मानसिकतेबद्दल, शौर्याबद्दल आणि उदारतेबद्दल भरभरून लिहिलं. असो, फार वेळ न काढता आधी मूळ पत्रं देतो आणि मग पत्राचा आजच्या भाषेतील सारांश:
"विनंती ऐशी जे - राजश्री पाटीलबावा जामगावास आलियावर, तुकोजी शिंदे यांचे नातू, दौलतराव शिंदे, वय बारा वर्षांचे, त्यांच्या लग्नाचा निश्चय करून, श्रीमंतांस व मंडळींस अक्षद द्यावयाकरिता फडणीसास पाठवले. त्यांनी श्रीमंतांस व सर्व मंडळीस अक्षद दिली. सरकारांतून राजश्री गोविंदराव बाजीबराबर अहेर पाठविला. आम्ही आपला अहेर वेदमूर्ती राजश्री गोविंदभात यांजबरोबर पाठविला. त्यांसी व बावांसी निखालसतेचे बोलणे जाले. त्यात निखालसता बहुत पाहिली. नंतर मागाहून राजश्री आबा चिटणीस पुढे आले. त्यांसी बोलणे होऊन, परस्परे निखालसतेचा विध राजश्री हरिपंततात्यासुद्धा जाला. नंतर भेटीचा समारंभ जाला. कोणे गोष्टीचा संशय राहिला नाही. तुम्हांस कालविण्याकरिता लिहिले म्हणोन आज्ञा. ऐशियास पत्रं पावतीच रोमांच उभे राहून अति संतोष जाला. याचा विस्तार पत्री किती लिहू? सीमा असे. यावरून ग्रंथांचे ग्रंथ मनात आले. ते लिहिल्याने बहुचकपणा दिसतो. दिसो, परंतु जे मनात आले त्यातून किंचित अमर्याद करून लिहितो. एक एक रक्कम मनात आणून दीर्घ दृष्टीने तोलून पाहिल्यास खरे आहे असेच निघेल. ते काय? तपशील - अटक नदीचे अलीकडे दक्षिण समुद्रपावेतो हिंदूंचे स्थान ! तुरकस्थान नव्हे ! हे आपली हद्द पांडवांपासोन विक्रमाजित पावेतो. त्यांनी राखून उपभोग केला. त्यामागे राज्यकर्ते नादान निघाले. यवनांचे प्राबल्य जाले. चकत्यांनी हस्तनापूरचे पद घेतले. शेवटी अलामगिराचे कारकीर्दीस यज्ञोपवीतास साडेतीन रुपये जेजया बसून ओले अन्न विकावे, सर्वांनी घ्यावे, हे नौबत गुजरली. त्या दिवसांत कैलासवासी शिवाजीराजे शककर्ते व धर्मराखते निघाले. त्यांनी किंचित कोन्यात धर्मसंरक्षण केले. पुढे कैलासवासी नानासाहेब भाऊसाहेब प्रचंडप्रतापसूर्य असे जाले, की असे कधी जाले नाही. अमुक ब्राह्मणांनी राज्य केले असे शास्त्री पुराणी वर्णन नाही. परशुराम अवतारी काय असेल ते असो. त्या गोष्टी यांस, शिंदे होळकर दोन बाजू होऊन प्राप्त जाल्या. हल्ली श्रीमंतांचे पुण्यप्रतापेंकडून व राजश्री पाटीलबावांचे बुद्धी व तरवारेच्या पराक्रमेकडून सर्व घरास आले. परंतु जाले कसे? प्राप्त जाले तेणेकरून सुलभता वाटली. अगर, मुसलमान कोणी असे, तरी मोठे मोठे तवारीखनामे जाले असते. यवनांच्या जातीत तिळाइतकी चांगली गोष्ट जाल्यास गगनाबराबर करून शोभवावी; आमचे हिंदूंत गगनाइतकी जाली असता उच्चार न करावा हे चाल आहे. असो. अलभ्य गोष्टी घडल्या. उग्याच दौलती पुसत घरास आल्या. यांचे संरक्षण करणे परम कठीण ! दोस्त दुश्मन फार. यवनांचे मनात की काफरशाई जाली, हे बोलतात. लेकिन ज्यांनी ज्यांनी हिंदुस्थानात शिरे उचलली, त्यांची शिरे पाटीलबावांनी फोडली. कोणाच्याही मनात हे वाहाडलें, ते शेवटास जाऊ नये. यास्तव, नाना स्वरूपे व युक्तिकडून नाश करावे यैसे आहेत. न लाभाव्य त्या गोष्टी लाभल्या. त्यांचा बंदोबस्त शकाकर्त्याप्रमाणे होऊन उपभोग घ्यावे हे पुढेच आहे. कोठे पुण्याईत उणे पडेल आणि काय दृष्ट लागेल न कळे. जाल्या गोष्टी यात केवळ मुलुख, राज्य प्राप्त, इतकेच नाही, तरी वेदशास्त्ररक्षण, धर्मसंस्थापन, गोब्राह्मणप्रतिपालन, सार्वभौमत्व हाती लागणे, कीर्ती व यश यांचे नागरे वाजणे, इतक्या गोष्टी आहेत. हे किमया सांभाळणे हक्क आपला व पाटीलबावांचा ! यात वेत्यास पडला की दोस्त दुश्मन मजबूद. संशय दूर जाले, हे अति चांगले ! अति चांगले ! याउपरी हे जमाव व फौजा लाहोरच्या मैदानात असाव्या, यांचे मनसबे दौडावे. वेत्यास पडावे, तमाशे पाहावे, असे जन जे आहेत ते उशापायथ्यास लागून आहेत. चैन नव्हते. आता आपण लिहिल्यावरून स्वस्थ जाले. जितके लिहिले इतक्याचे उगेच मनन व्हावे. खरे की लटके हे समजावे. रवाना, छ ११ जिल्काद हे विनंती".
वरील पत्रात, विनंती ऐशी जे नंतर "राजश्री पाटीलबावा जामगांवास आलियावर" पासून ते "तुम्हांस कळवावयाकरीत लिहिले" पर्यंतचा मजकूर हा आधीच्या नाना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रातील आहे. पूर्वी एखाद्या पत्रात, नेमक्या कोणत्या पत्राला आपण उत्तर देत आहोत हे समजण्यासाठी आधीचे पत्र उद्धृत करण्याची पद्धत असे. नाना फडणवीसांनी घडलेला वृत्तांत कथन केला आहे, तो आणखी सोपा करून सांगण्याची फारशी आवश्यकता नाही. यानंतर "ऐशियास पत्रं पावताच रोमांच उभे राहून.." पासूनच पुढील मजकूर गोविंदराव काळ्यांचा आहे.
नाना फडणवीसांचं हे पत्रं वाचताच गोविंदराव काळ्यांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले ! याचं कारण, महादजी कित्येक वर्षे दक्षिणेत आले नव्हते, आणि सालबाईच्या तहानंतर नाना-महादजींमध्ये वितुष्ट आल्याच्या अनेक खबरा उठत होत्या. या दोघांमध्ये काही वाद निश्चित होते, पण शेवटी उत्तर पेशवाईत राज्य सांभाळणारे हे दोघे कर्तृत्ववान पुरुष, कुठे ताणायचं, कुठे सांभाळून घ्यायचं हे दोघांनाही माहित होतं. वकील-इ-मुतालिकीच्या प्रकरणात महादजींविषयी काही काळ साऱ्यांना संशय आला होता, पण मधल्या लोकांचे हे उपद्व्याप असल्याचं नंतर नानांच्याही लक्षात आलं. पुढे महादजी चार वर्षांनी स्वतः दक्षिणेत आले आणि या लग्नाच्या सुमारास नाना-महादजी बसून बोलणी झाली त्यात सारे संशय दूर झाले. यामुळेच गोविंदराव काळ्यांना अत्यंत आनंद झाला. गोविंदराव म्हणतात, "माझ्या आनंदाला पारावार नाहीये, इतकं की ग्रंथच्या ग्रंथ लिहून होतील. हे सगळं लिहिलं तर भोचकपणा करतोय असं वाटेल. पण असो, जे मनात आलं तेवढं तरी लिहितो. मी जे काही लिहितोय ते नीट पाहिल्यास खरंच आहे असं तुमच्याही लक्षात येईल. काय? त्याचा तपशील असा". असं म्हणून गोविंदरावांनी मुख्य मुद्द्याला हात घातला आहे.
गोविंदराव लिहितात, "अटक नदीपासून तिच्या अलीकडे, दक्षिण समुद्रापर्यंत (म्हणजे सिंधुसागर-हिंदी महासागरापर्यंत) सगळं आहे ते हिंदूंचं स्थान, प्रदेश. हे तुर्कस्थान म्हणजे यवनभूमी नव्हे. ही आपली हद्द अगदी पांडवांपासून ते विक्रमादित्यापावेतो चालत आली आहे. त्यांनी राखून या भूमीचा उपयोग केला, त्यानंतर मात्र इतर राज्यकर्ते नादान निघाले आणि सर्वत्र यवनांचं प्राबल्य झालं. चकत्यांनी (मुघलांनी) हस्तिनापूर घेतलं. शेवटी आलमगीराच्या म्हणजे औरंगजेबाच्या कारकिर्दीत दर यज्ञोपवीतास साडेतीन रुपये जिझिया कर लावण्यात आला. म्हणजे प्रति ब्राह्मणास साडेतीन रुपये जिझिया. ओले अन्न विकावे (याचा नेमका अर्थ काही समजत नाही, बहुदा मांस असावं), सगळ्यांनी घ्यावं अशी नौबत आली. या दिवसांत केवळ कैलासवासी शिवाजी महाराज शककर्ते आणि धर्म संरक्षण करणारे निघाले. त्यांनी एका कोपऱ्यात (वर जो अटकेपासून दक्षिणेपर्यंतचा प्रदेश दिला आहे त्याच्या तुलनेत), म्हणजे दख्खनच्या काही भागात धर्मसंरक्षण केलं. पुढे, कैलासवासी नानासाहेब आणि सदाशिवरावभाऊ हे प्रचंडप्रतापसूर्य असे झाले की त्यांच्यासारखे तेच. शास्त्रपुराणात कधी ब्राह्मणांनी राजय केल्याचं वर्णन नाही, परशुराम अवतारीच जे काही झालं असेल ते. पण ते या दोघांना होऊन, शिंदे होळकर हे जणू काही दोन बाजू, म्हणजे डावे उजवे हातच झाले. हल्ली श्रीमंतांच्या पुण्यप्रतापाने आणि राजश्री पाटीलबावांच्या बुद्धी आणि तलवारीच्या पराक्रमाने सगळं काही प्राप्त झालं. पण हे कसं झालं? झाल्यामुळे सुलभता वाटली खरी". (अर्थात याला प्रचंड कष्ट पडले, आणि पाटीलबावांनी ते सोसले असा याचा अर्थ).
गोविंदराव काळे पुढे लिहितात, "पाटीलबावांच्या जागी कोणी मुसलमान असता तर मोठं मोठे तवारिखनामे झाले असते. म्हणजेच पराक्रमाच्या लांबच्या लांब बखर लिहिल्या गेल्या असत्या. यवनांच्या जातीत तिळाइतकी गोष्ट झाली तरी अगदी काही आभाळाएवढं झालं आहे असं दाखवावं, आणि आमच्याकडे हिंदूंमध्ये मात्र आभाळाएवढी झाली तरी त्याचा फारसा उच्चार न करण्याची चाल आहे, अर्थात, आम्ही इतके साधे आहोत की उगाच कौतुकात रमणं आमच्या रक्तातच नाही. असो, फार मोठ्या गोष्टी घडल्या, मोठ्या दौलती म्हणजे मोठमोठे प्रांत स्वराज्यात आले. या सगळ्याच संरक्षण करणं मात्र महा कठीण आहे. आपल्याला शत्रू-मित्र फार आहेत. यवनांच्या मनात ही खदखद फार आहे की ही आता 'काफरशाही' म्हणजे हिंदूंचं राज्य झालं आहे. पण, ज्यांनी ज्यांनी आपल्याविरुद्ध हिंदुस्थानात डोकी वर काढली त्या त्या सर्वांची डोकी पाटीलबावांनी फोडली. कोणाच्याही मनात आमच्याविषयी किल्मिष आलं असता ते शेवटास जाऊ नये हाच हेतू, यामुळेच शत्रूही नाना युक्त्या करून आपल्या नाशावर टपून बसले आहेत. ज्या न लाभाव्य त्या गोष्टीही लाभल्या, त्यामुळे याचा उपयोग आता शककर्त्यांप्रमाणे, म्हणजे शिवछत्रपती महाराजांप्रमाणे करून उपभोग घ्यावा हे उत्तम. उगाच कुठे पुण्यात उणे पडेल, कुठे दृष्ट लागेल हे समजणार नाही. या ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या सामान्य नाहीत, केवळ मुलुख आणि राज्य प्राप्त झालं एवढ्याच नाहीत. यात 'वेदशास्त्रसंरक्षण, धर्मस्थापना, गोब्राह्मणप्रतिपालन, सार्वभौमत्व, यशकीर्ती' इत्यादी अनेक गोष्टी आहेत. हे आता योग्यपणे सांभाळणं हा आपला (नानांचा) आणि पाटीलबावांचा (महादजीचा) हक्क म्हणजेच जबाबदारी आहे. यात व्यत्यास आला, म्हणजेच यात ढिलाई आली तर शत्रूचाच फायदा आहे. आपल्या दोघांमधले संशय दूर झाले हे अति चांगलं झालं. याउपरी या फौज आता अगदी लाहोरच्या मैदानातही उतरावाव्यात, अर्थात तो प्रांत पुन्हा आपल्याकडे घेण्याची वेळ आता योग्य आहे. असं झाल्याने उशापायथ्यास बसलेले जे जे वाईटावर टपले आहेत ते निपचित पडून राहतील. मला इतकी वर्ष चैन नव्हतं, आता आपण सविस्तर लिहिल्यावरून स्वस्थ वाटतं आहे. कळावे".
या संबंध पत्रात मला आवडलेली एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे "आमच्या लोकांमध्ये कितीही प्रचंड कौतुकास्पद गोष्ट घडली तरी आम्ही विनयशीलपणे फारसं कौतुक करून घेत नाही, आणि त्यांच्याकडे अगदी तिळाएवढं घडलं तरी आभाळाएवढं काही काम केलं आहे असं सांगतात" ही होय. जाता जाता सहज एक गम्मत सांगतो, कोकणच्या स्वारीत बाजीरावांविषयी आणि चिमाजीअप्पांविषयी अंतर्गत शत्रूंनी छत्रपती शाहू महाराजांचे कान भरले. महाराज भर दरबारात भडकले आणि महादोबा पुरंदऱ्यांना बोलले. पुढे महाराजांना हवं तसंच काम चिमाजीअप्पांनी कोकणात करून दाखवलं. महाराजांना खात्री पटली की हे दोघे भाऊ उगाच बोलत नाहीत, कामं मनाप्रमाणे करून दाखवतात. तरीही सहज महाराजांनी पेशव्यांचे मुतालिक महादोबा पुरंदरे यांना बोलावून विचारलं, "सदरेवर आम्ही इतक्या इरेच्या गोष्टी बोललो, अगदी लागेल असं बोललो, तरीही त्यावर तुम्ही काहीच कसं म्हणाला नाहीत?" यावर महादोबा पुरंदऱ्यांनी अतिशय थंडपणे उत्तर दिलं, "वरकडाचा कारभार महाराजांपासी बोलावे फार आणि करावे थोडे; आणि आमच्या खावंदांचा (पेशव्यांचा) दंडक, करावे फार आणि बोलावे थोडे हे पहिल्यापासून महाराजांस विदित आहे", म्हणजेच इतर लोक लहानशी गोष्ट करून मोठ्या फुशारक्या मारतात आणि आमचे खावंद (पेशवे बंधू) हे प्रचंड गोष्टी करतात पण त्याचा गाजावाजा मात्र करत नाहीत". हे पत्रं पेशवे दप्तरातून निवडलेले कागद खंड ३, लेखांक १३५ म्हणून सरदेसाईंनी प्रसिद्ध केलं आहे.
असो. एकंदरीतच असे होते मराठे !
- © कौस्तुभ कस्तुरे
स्रोत: इतिहाससंग्रह, पुस्तक १ ले, अंक ३ रा, ऑक्टोबर १९०८, ऐतिहासिक टिपणे लेखक १३
No comments:
Post a Comment