अठराव्या शतकात मराठ्यांबरोबर अनेक सत्तांचा उदय झाला. यात जाट , रोहिले , इंग्रजांबरोबर डच , पोर्तुगीजही होते. पण या काळात एका नावाचा डंका आणि दरारा उभ्या हिंदुस्थानात होता. आणि ते नाव म्हणजे बाजीराव बल्लाळ उर्फ थोरले बाजीराव.
सन १७२८ साली पालखेडला निजामाला धूळ चारल्यानंतर मराठ्यांची मैत्री सर्वांना हवीहवीशी वाटू लागली. यावर कळस म्हणजे चिमाजी अप्पांनी १७२८ साली आमझेराला गिरिधरबहादूर तर १७३३-३४ साली सिद्दीसातला नामोहरम केले. यामुळे बाजीराव आणि चिमाजींची दहशत उभी राहिली. मुघल दरबारात पडलेले दोन तट , अंतर्गत राजकारण अशा अनेक गोष्टींमुळे बाजीरावांशी समोरासमोर बोलावे असे सवाई जयसिंह यांना वाटत होते. शिवाय जयसिंह हे मराठ्यांना अनुकूल असल्याकारणाने त्यांनी बाजीरावांना सपत्नीक रजपूताण्यात येण्याचे आमंत्रण दिले. यावेळी पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई काशि यात्रेस गेल्या होत्या. त्यामुळे मुघलांविरुद्ध कोणताही मोहीम न काढता बाजीराव रजपूताण्यात गेले. यावेळी नानासाहेब सोबत असावे. तर राणोजी शिंदे , मल्हारराव होळकर , आनंदराव पवार , बाजीभिवराव रेठरेकर इत्यादी मंडळी सोबत होती. तर आपल्यामागे दरबारात काही कटकारस्थान होऊ नये म्हणून चिमाजी अप्पा , अंबाजीपंत पुरंदरे यांना मागे ठेवले होते. रजपूताण्यात जाण्याचे आणखी एक प्रयोजन असे की सर्व रजपूतांना मुघलांविरुद्ध एक करणे. जयपूर , उदयपूर , अजमेर सारखी संस्थांने एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यरित्या कुरघोडी करत असत , यांना एक करण्यासाठी राव गेले होते. ०८ ऑक्टोबर १७३५ रोजी बाजीराव पुण्याहून निघाले. उदयपूरच्या जवळ चंपाबाग होती. या बागेत राणा जगतसिंहाने एक मोठा मंडप उभा केला होता. जणू या मंडपाला दरबाराचे रुप आले होते. बाजीराव उदयपूर जवळ आले असे समजताच जगतसिंह स्वतः समोर गेले. नंतर राणा बाजीरावांना सिंहासनाच्या चौथऱ्यावर घेऊन गेला. मंडपात दोन सुवर्णासने एका शेजारी एक मांडण्यात आली होती. तर खाली पाय ठेवायला चांदीचे चौरंग होते. राणाने बाजीरावांना सिंहासनावर बसण्याची विनंती केली. सारा दरबार पहात होता. बाजीराव तडक खाली ठेवलेल्या चांदीच्या चौरंगावर जाऊन बसले. थोडावेळ राणा आणि सगळा दरबार गडबडला. लगेच राणाने त्यांना वर सिंहासनावर बसण्याची विनंती केली. यावेळी बाजीराव म्हणाले " राणाजी ही गादी तुमच्या महाराजांची , राणा प्रतापांची आहे. मी सातारकर छत्रपती शाहू महाराजांचा पेशवा आहे म्हणजे सेवकच आहे. या गादीवर बसण्याची माझी योग्यता नाही " ( पेशवाई ) ही घटना घडत असताना तिथे जयपूर नरेश सवाई जयसिंह यांना दिवाण अयामल देखील उपस्थित होता. त्याने ही सर्व हकीकत जयसिंहाला सांगितली. जगतसिंहाने बाजीरावांचा उत्तम सत्कार केला. यानंतर बाजीराव जयपूर ला निघाले. जगतसिंहाने जो थाटमाट केला तोच जयसिंहाने केला. त्यानेही मंडप उभारुन दोन सुवर्णासनं एक शेजारी एक असे ठेवले. सर्व थाटामाटात पाहून बाजीराव जे समाजाचे ते समजले. जयसिंह हात धरून बाजीरावांना सोन्याच्या सिंहासनापाशी घेऊन आला. क्षणाचाही विचार न करता बाजीराव सुवर्णासनावर जाऊन बसले. सारी सभा हादरली. थोडा धीर धरून नम्रपणे जयसिंहाने याचे कारण विचारले तेव्हा बाजीराव म्हणाले " राणाजी , आपल्याला हे माहिती आहे की उदयपूरची गादी राणा प्रतापांची आहे. सम्राट अकबराच्या अमिषाला भुलून , लाचार होऊन आपलं राज्य अन् आपल्या बहिणी हे सर्व त्याने मोगलांच्या घशात कधीही घातलं नाही. त्यामुळेच अखिल हिंदूंना महाराणाप्रतापसिंह आणि त्यांचे सिंहासन सदैव शिरोवंद्य आहे. याउलट आपले पितामह मिर्झाराजे जयसिंह यांनी काय केले. ? " ( पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे ) बाजीरावांचे ते परखड शब्द सर्वांनी निमूटपणे ऐकले. शेवटी जयसिंहाचा पाहुणचार घेऊन आणि काही गुप्त करार करून बाजीराव मे १७३६ साली काशिबाईंसोबत पुण्यात येण्यास निघाले. वाटेत रावरखेड येथे पेशव्यांचा मोठा वाडा होता. त्या वाळवंटात काशिबाईंनी श्री शिवशंकराचे मंदिर बांधण्यासाठी आज्ञा केली. हेच ते प्रख्यात रामेश्वर महादेव मंदिर. मे अखेरीस बाजीराव पुण्यात परतले
निशांत कापसे
संदर्भ -
१) मराठी रियासत ( थोरले बाजीराव ) - गो.स.सरदेसाई
२) पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे
३) The Era Of BajiRao - Uday Kulkarni
बाजीराव आणि शाहू महाराजांची मुद्रा
( साभार - पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे - राफ्टर पब्लिकेशन )
फोटो परवानगी शिवाय कोणीही शेअर करू नये
No comments:
Post a Comment