विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 12 June 2022

गंगोबातात्या चंद्रचूड वाडा - कन्हेरसर #पुढचीमोहीम

 











गंगोबातात्या चंद्रचूड वाडा - कन्हेरसर #पुढचीमोहीम
पोस्तसांभार ::

Saurabh Madhuri Harihar Kulkarni

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कन्हेरसर या गावात मल्हारराव होळकर यांचे दिवाण गंगोबातात्या चंद्रचूड यांचा वाडा आहे. कन्हेरसर हे गाव शिरूर - खेड (राजगुरूनगर) रस्त्यावर आहे. राजगुरूनगरपासून १५ कि.मी अंतरावर आहे. गावात चंद्रचूड यांचा भव्य वाडा आहे. वाड्याचे प्रवेशद्वार पण भव्य आहे. वाड्याची माती, वीटा, दगडाची तटबंदी आजही आहे. वाड्याच्या आतील निम्मा भाग सुस्थितीत आहे आणि निम्म्या भागाची पडझड झाली आहे. दुमजली असलेल्या वाड्याला काष्ठशिल्पे आहेत. सागवानी खांब खूप सुंदर कलाकृती आहे. वाड्यात आत एक विहीर आहे. वाड्यात सध्या राहणारे वंशज हे डाॕक्टर आहेत.
गो.स.सरदेसाई म्हणतात "गोविंद बल्लाळ, अंताजी माणकेश्वर, दादो भीमसेन यांच्या तोडीचे होळकरांजवळ पेशव्यांनी नेमलेले कारभारी गंगाधर यशवंत हे होते. त्यांच्या ठिकाणी रणांगणावरील युद्धचातुर्य होते. दुसरे कारभारी रामचंद्रबाबा व गंगाधरपंत हे पेशव्यांच्या हातातील लगाम होता. स्वार्थी सरदारांवर आळा घालण्याचे काम हे करीत." रामचंद्रबुवा व गंगोबातात्या बुंदेलखंडात असताना थोरल्या बाजीरावांच्या पत्नी काशीबाई यांनी त्यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी "मला संकट पडले आहे. माझ्या चित्तास काशीस दोनचार महिने राहावे. तरी माझे काशीस जाणे होईल ते गोष्ट करणे, असे लिहिले आहे."
इ.स. १० ऑगस्ट १७५८ रोजी मल्हारराव होळकर व जनकोजी शिंदे यांची भेट गंगोबातात्यांनी घडवून आणली. मल्हारराव होळकरांचा प्रतिनिधी म्हणून मल्हारराव आजारी असताना पेशव्यांच्या भेटीस गंगोबातात्या गेल्याची नोंद आढळते. पानिपत संग्रामाच्या वेळी भाऊसाहेब येण्यापूर्वी तहाची बोलणी चालू होती. ती चालविण्यास हिंगणे आणि गंगोबातात्या हे होते. इ.स.१७६१ सलाबतजंग यास फोडून मराठ्यांकडे आणण्याचे काम गंगोबांनी फत्ते केले. अब्दाली निघून गेल्यानंतर मराठ्यांना आपला जम परत बसवावा लागला. त्या कामासाठी मल्हाररावांनी गंगोबातात्यांस दिल्लीस पाठविले.
माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यातील भांडणात गंगोबातात्या राघोबादादांच्या पक्षात राहिले. त्यांचा मोठा मुलगा यशवंत गंगाधर ऊर्फ दादाजी हे विद्वान व व्यवहारचतुर होते. त्यांनी आपल्या वडिलांना 'तुम्ही दादांस सामील होऊ नका' असा सल्ला दिला, पण त्यांनी तो ऐकला नाही. त्यामुळे त्यांना वीस वर्षे कैदेत खितपावे लागले. तीस लाख रुपये दंड भरल्यावर इ.स.१७७२ फेब्रुवारी मध्ये पेशव्यांनी त्यांना मुक्त केले. राक्षसभुवनाच्या लढाईनंतर गंगोबातात्या मुलीचे लग्न उरकून उत्तरेस गेले त्या वेळी आपला धाकटा मुलगा यास बरोबर नेले व यशवंतरावांस अहिल्याबाईंच्या दरबारात काम सांभाळण्यास ठेवले. इ.स.२० फेब्रुवारी १७७४ ला गंगोबांचा मृत्यू झाला.
चंद्रचूड घराणे आजही देशासाठी आपले योगदान देत आहे. वाय.बी.चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते व त्यांना सर्वाधिक काळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहण्याचा बहुमान मिळालेला आहे. त्यांचेच सुपुत्र धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी विराजमान आहेत. तसेच चंद्रचूडांनी आपली काही जागा शाळेसाठी दान केलेली आहे.
साभार - डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...