कोल्हापूर प्रांताचा कारभार
पोस्तसांभार ::इतिहास अभ्यासक मंडळ ( चेतन दादा )
राजधानी म्हणजे राज्याचे केंद्र, त्या त्या प्रदेशाचे संपूर्ण समाजकारण आणि राजकारण या राजधानी भोवती फिरत असते. महामंडलेश्वर विक्रमादित्य राजा भोज दुसरा यांनी आपली राजधानी प्रथम वाळव्यातून(वळीवडे) कोल्हापूरला आणली आणि मग काही वर्षातच ती शहरातून पुन्हा किल्ले पन्हाळ्यावर स्थापित केली. पुढच्या काळात राजसत्तेचे समीकरण आणि केंद्रस्थान बदलत गेली असली तरी कोल्हापूर प्रांताचा कारभार चालला तो पन्हाळ्यावरूनच.
राजधानी निवडताना त्या त्या राज्यांनी तत्कालीन राजकीय भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतल्याचं पाहायला मिळते. खेड शिवापुरच्या वाड्यातून आधी पुरंदर मग राजगड आणि शेवटी रायरीच्या भरभक्कम किल्ल्यावर स्थापन झालेल्या स्वराज्याच्या राजधानी निवडी मागे हीच कारणे होती. छत्रपतीं शाहूंनी(शंभू राजे पुत्र) यांनीही आधी अजिंक्यताऱ्यावर राजधानी वसवली आणि नंतर सातारा शहर वसवून राजधानी गडावरून खाली आणली. लढाईचे बदलले स्वरूप, सैन्याचा आणि कारभाराचा वाढलेला प्रचंड डोलारा ही त्या मागची काही कारणे.
कोल्हापूर शहरातून बाराव्या शतकात किल्ले पन्हाळ्यावर गेलेली राजधानी पुन्हा कोल्हापुरात आणली ती करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) यांनी. १७८८ साली एक घटना घडली आणि छत्रपतींनी राजधानी गडावरून शहरात आणायचे ठरवले.
सरकारी कामकाज पाहणारे रत्नाकरपंत म्हणजे करवीर दरबारातील एक मोठे प्रस्थ, चिकोडीच्या स्वारीत त्यांनी युद्धात केलेल्या पराक्रमावरून छत्रपतींनी त्यांना राजाज्ञा 'किताब दिला. पावसाळ्याच्या काळात पंतांचे चिरंजीव नारायणराव कोल्हापूरात आजारी पडले. त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून रत्नकरपंत गडावरून उतरून जात असता वडणगे जवळ घोड्याला अपघात होऊन पंत जखमी होतात. आणि तश्याच अवस्थेत पुत्राची भेट घेऊन पुन्हा गडावर रुजू होतात. ही गोष्ट छत्रपतींना कळताच ते पंतांची भेट घेतात.
गादीचा वाढता राज्यकारभार, गडावरील मर्यादित सोयी, प्रजेशी असलेले अंतर आणि सोबतच सरकारी अधिकाऱ्यांची होणारी गैरसोय पाहता राजधानी प्रजेच्या जवळ म्हणजेच गडावरून खाली शहरात आणणे निकडीचे झाले होते. आणि म्हणूनच १७८८-८९ साली राजधानी कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या आताच्या जुन्या राजवाड्यात आणण्यात आली. पुढे राजर्षी शाहूंच्या काळात राजदरबार नवीन राजवाड्यात आला.
पन्हाळ्यावरून कोल्हापूरात राजधानी स्थलांतरित झाल्याच्या घटनेचा उल्लेख करणारा संदर्भ मिळतो तो खालील प्रमाणे.
"रत्नाकरपंत राजाज्ञा यांचे चिरंजीव नारायणराव यांस वाखा होऊन करवीरी फार आजारी पडले. याजकरिता रत्नाकरपंत निरोप घेऊन समाचाराकरिता पन्हाळ्याहून करवीरास निघाले. मार्गी मनस्वी पर्जन्य लागला. त्यामुळे चिखल झाला होता. वडणगेनजीक घोडायचा पाय निसरून अप्पा पडले, आणि अंगाखाली पाय सापडून दुखावला. तरी तसेच करवीरी आले. हे वर्तमान समजताच समाचारासाठी स्वारी निघून करवीरी आली. काही दिवस उपाय केल्यावर पायाचे दुःख कमी झाले. याप्रमाणे पदरच्या कामगारास वगैरे वरचेवर करवीरी यावे लागते व गडावर सर्वांस राहण्याची अडचण यास्तव करवीरास राजधानी करून राहावे असा निश्चय करून महालच्या स्वाऱ्याही पन्हाळ्याहून आणविल्या"
वरील गोष्टी पाहता करवीर छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) हे सेवकांचे, प्रजेचे बारीक गोष्ट हेरून लोककल्याणासाठी लोकांजवळ येऊन राहिले.
संदर्भ ग्रंथ :-
करवीर रियास्त - भाग ४४
No comments:
Post a Comment