विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 10 July 2022

शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड_भाग २


 शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड_भाग २

पिलाजीच्या मृत्यूमुळें अभयसिंगास कांहीच फायदा झाला नाहीं. कारण पिलाजीचा दोस्त पाद्य्राचा (बडोद्याजवळील एक गांव) देसाई दिल्ला याच्या चिथावणीवरून सर्व देशभर कोळी व भील लोकांनीं बंड केलें. अभयसिंगाचें सैन्य त्यांचें बंड मोडण्यांत गुंतलें आहे असें पाहून पिलाजीचा भाऊ महादजी (हा जंबूसर बळकाऊन बसला होता) यानें बडोद्यावर स्वारी करून तें घेतलें (१७३२). येथपासून बडोदें ही गायकवाडांची राजधानी झाली. पिलाजीचा वडील मुलगा जो दमाजी त्यानेंहि याच सुमारास सोनगडाहून निघून गुजराथेंतील पश्चिमेकडचे बरेच मुख्य मुख्य जिल्हे पादाक्रांत केले. त्याच्या स्वा-या जोधपूरपावेतों जेव्हां जाऊं लागल्या तेव्हां आपल्या दुय्यम अधिका-याच्या स्वाधीन अहमदाबाद करून अभयसिंग हा जोधपूरच्या रक्षणार्थ तिकडे निघून गेला (१७३२).
पुढें दमाजीनें कंठाजी कदम वांडे यास गुजराथेंतून हांकून लावलें (१७३४); म्हणून कंठाजीनें पुढच्या सालीं मल्हारराव होळकरासह गुजराथेंत अकस्मात स्वारी करून बनास नदीपावेतों खंडण्या वसूल केल्या व ईदर, पालनपूर वगैरे कित्येक शहरें लुटलीं. या स्वारीनंतर लवकरच गुजराथच्या सुभेदारीचें काम अभयसिंगाकडून काढून नजीब उद्दौला मोमीनखान याच्याकडे देण्यांत आलें. पण अभयसिंगाच्या वतीनें गुजराथचा कारभार पहाणारा नायब सुभेदार हा अहमदाबाद सोडण्यास तयार नव्हता. तेव्हां मोमीनखानानें त्याला हांकून लावण्याकरितां दमाजीची मदत घेतली (१७३५). व ते दोघे पगडीभाई झाले. याप्रमाणें अहमदाबाद हस्तगत झाल्यावर तेथील सत्ता व वसूल या दोघांनीं वांटून घेतली (१७३७). बाजीराव उत्तरेस गेला आहे असें पाहून दमाजीनें माळव्यांत स्वारी केली (१७४२).

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...