विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 26 July 2022

राजस्थानातील मुसंडी

 




राजस्थानातील मुसंडी
मराठयांनी महाराष्ट्राबाहेर गाजवलेल्या पराक्रमाची यशोगाथा सांगणा-या ‘झंझावात’ या इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील राजस्थानातील मराठय़ांच्या कामगिरीवर लिहिलेल्या लेखाचा हा संपादित भाग -
राजस्थानातील कोटा आणि बुंदी ही दोन छोटी राज्ये हाडा राजपुतांच्या ताब्यात होती. नसर्गिकरीत्या या दोन्ही राज्यांना मोठे संरक्षण लाभलेले आहे. उत्तरेला चमेली म्हणजे चंबळ, पूर्वेला पार्वती नदी, मुकुंद-याची डोंगररांग ही दक्षिणेला, तर आरवली पर्वताच्या रांगा या पश्चिमेला असल्याने ही दोन्ही राज्ये तशी संरक्षित होती. मुकुंद-याची खिंड हा जाण्या-येण्याचा मोठा मार्ग होता.
मराठय़ांचा एकूण उत्कर्ष आणि ताकद पाहिल्यावर कोटय़ाच्या राजाने मराठी फौजेची मदत घेण्यास सुरुवात केली. राव किशोरसिंह हाडा याने १६८३ पासूनच ही मदत घेतली होती. मराठी फौजांना उत्तरेत जाण्यासाठी मिळालेली ही एक मोठी संधी होती. किशोरसिंहानंतर त्याचा मुलगा रामसिंह हा वजीर झुल्पिकारखान याच्या मदतीने गादीवर आला आणि द्रष्टवन कर्नाटक मोहिमांवर मुघलांतर्फे सामील झाला. मुघलांच्या कैदेत असलेल्या शाहूराजांशी याच वेळी त्याचा संबंध आला असावा.
रामसिंहाने त्याच्या वडिलांचे मराठय़ांसोबत चांगले वागण्याचे धोरण कायम ठेवले. त्याने काही मराठी ब्राह्मणांना जहागि-याही दिल्या. सनगोढ, मांगरोळ, अटोनी, इजारा येथे या जहागि-या होत्या. निळोजी प्रधान यांचा कोटय़ाला १६९७ मध्ये सत्कारही करण्यात आला. हा रामसिंह जजाऊच्या लढाईत १७७० मध्ये मारला गेला. त्याचा मुलगा राव भीमसिंह हा कोटय़ाच्या गादीवर आला. कोटय़ाच्या दक्षिण प्रांतात राजाविरुद्ध उठाव झाल्याने राजाने चंद्र पंडित आणि हिंदुराव यांना मदतीस बोलावून त्यांच्या करवी उठावाचा बंदोबस्त केला. या दोघांना मोठय़ा भेटी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
फरुखसियर १७१३ मध्ये दिल्लीचा बादशाह म्हणून गादीवर आल्यावर कोटय़ाच्या राजाने त्याचा सन्मान केला. पण बुंदीच्या राजाने मात्र काहीच केले नाही. कालांतराने भीमसिंहाने दाखवलेल्या हुशारीबद्दल त्याचा ‘महाराव’ असा किताब देऊन सत्कार करण्यात आला. १७१९ मध्ये त्याला बुंदी घेण्याची परवानगीही देण्यात आली. भीमसिंह १७२० मध्ये बु-हानपूरजवळ निजामाच्या विरुद्ध लढत असताना मृत्युमुखी पडला.
‘महाराव अर्जुनसिंह’ हा भीमसिंहाचा मुलगा कोटय़ाच्या गादीवर आला. दिल्लीत यावेळी उलथापालथ चालू असल्याने जयपूरच्या सवाई जयसिंहाने सर्व राजपुतांना एकत्र येण्याचे आवाहन केले. अनेक राजपूत राजे या योजनेच्या विरुद्ध होते. शिवाय जयसिंहाने दिल्लीला मुहम्मदशाहाच्या मदतीला आपली फौज पाठवली तरी त्या फौजेचे नेतृत्व करण्यास तो स्वत: गेला नव्हता. अर्जुनसिंहानेही तसेच केले होते. पण तो अचानक १७२३ मध्ये मृत्युमुखी पडला. यावेळी कोटय़ाचा १६७ मराठय़ांशी उत्तम संबंध होता.
मराठय़ांनी तोपर्यंत माळव्यात आपले पाय उत्तम रोवले होते. १७२६च्या पूर्वार्धात मराठी फौज मेवाड, कोटा आणि बुंदीत उतरली. मराठय़ांच्या हल्ल्यात त्यांना फार लूट हाती लागली नाही. सवाई जयसिंहाने आता इतर राजपुतांना मराठय़ांविरुद्ध एकत्र येण्यासाठी परत आवाहन केले. त्याने जोधपूरपासून सगळीकडे भराभर पत्रे पाठवली. त्यावेळी कोटय़ाचा महाराव दुर्जनसालाने जयसिंहाला संपूर्ण पाठिंबा दिला. जयसिंहाने आपला एक वकील साता-याला पाठवला. १७३० पर्यंत जयसिंहाने मराठय़ांशी सलोखा साधला.
१७३३ मध्ये नाहरगढाचा किल्लेदार नाहरसिंह याने कोटय़ाच्या राजाचे अधिपत्य अमान्य करून स्वत:ला सार्वभौम म्हणून घोषित केले. त्याने इस्लाम स्वीकारून स्वत:ला नाहरखान म्हणवले. दुर्जनसालाने शाहूराजांकडे दूत पाठवून नाहरखानाचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. शाहूराजांनी त्यांचे तीन सरदार नारो विठ्ठल, कृष्णाजी आणि उदाजी पवार यांना कोटय़ास जाण्यास सांगितले. त्याच वेळी पिलाजी जाधवराव पार्वती आणि अत्रू या नद्या उतरून आला. तेथे असूजी नावाचा एक मराठा जहांगीरदार होता.
दुर्जनसालाने पिलाजीस १.५० लाख रुपये देतो, असे सांगून नाहरखानावर पाठवले. पिलाजीने नाहरखानाचे मूळ उखडून काढले. नाहरगढ ताब्यात घेऊन पिलाजीने तो दुर्जनसालास दिला. त्याने पिलाजीस दीड लाख रुपये दिले. मराठयांशी महारावाचे संबंध चांगले राहिले. पुढे जयसिंह आणि अभयसिंहाच्या राजकारणाला कंटाळून दुर्जनसाल हा मुघल खानदौरानला मिळाला. त्यावेळी मराठय़ांनी मुघलांचा मोठा पराभव केला. मराठय़ांचे नंतर कोटय़ावर वर्चस्व राहिलेच.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...