पोस्तसांभार :डॉ विवेक दलवे पाटील
येसाजी कंक यांचा जन्म १६२६ साली पुणे जिल्ह्यातील राजघर या गावी झाला. १६३५ पासून ते छत्रपती शिवरायांच्या सहवासात आहेत. येसाजी कंक हे महाराजांचे जिवलग बालमित्र होते. पुढे १६३५ ते १६४० या काळात येसाजींनी शिवरायांसोबत युद्धकलेचे प्रशिक्षण पूर्ण केले. १६४३ साली हिंदवी स्वराज्याची सूत्रे छत्रपती शिवरायांनी हातात घेतली. तेव्हा येसाजी कंक हे महाराजांसोबत होते. १६४५ साली रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना देखील येसाजीराव छत्रपती शिवरायांसोबत उपस्थित होते.
१६४७ साली रांझ्याच्या पाटलाने एका निरागस स्त्री वर हात टाकला. या मुळे महाराज क्रोधित झाले. तेव्हा त्या पाटलाला श्रीमंत येसाजी कंक यांनी कैद करून शिवरायांसमोर उभे केले. व त्या क्षणाला महाराजांनी त्याचा चौरंगा काढला.
१६५० साली येसाजी कंक यांची स्वराज्यनिष्ठा पाहून त्यांना हिंदवी स्वराज्याचे १ ले पायदळ प्रमुख पद बहाल केले. येसाजी कंक पायदलाचे १ ले सरनौबत झाले.
१६५९ साली प्रतापगडच्या युद्धात शिवरायांनी येसाजीरावांना आणि त्यांचे धाकटे बंधू कोंडाजी कंक यांना अंगरक्षक म्हणून सोबत घेतले होते. तेव्हा अफझलखान वधानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी येसाजी कंक यांनी सरसेनापती नेतोजी पालकर यांच्यासोबत मोठा पराक्रम गाजवला. या लढाईत संपूर्ण पायदळ हे येसाजी कंक यांच्या नेतृत्वाखाली लढले. येसाजी कंक यांनी पायदळाच्या ५ तुकड्या पाडल्या. एका तुकडीचे नेतृत्व स्वतः सरनौबत येसाजी कंक यांनी घेतले. दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व हे कान्होजी-सर्जेराव-श्यामजी या जेधे पिता-पुत्रांकडे दिले. ३ ऱ्या तुकडीचे नेतृत्व हे हैबतराव-प्रतापराव या शिळीमकर बंधूंकडे सुपूर्द केले. व ४ थ्या तुकडीचे नेतृत्व हे रायाजी-कोयाजी-बाजी या बांदल बंधूकडे दिले होते. आणि ५ वी तुकडी ही पासलकर देशमुख यांच्याहाती दिली. प्रत्येकाने चोख कामगिरी बजावली.
१६६१ साली उंबरखिंडीत महाराजांसोबत कार्तलाबखानाविरुद्ध पराक्रम गाजवला. खिंडीत रायबागण या स्त्री सेनानीचा दारूण पराभव केला. जेव्हा पुढची एक स्त्री आहे.. हे कळताच त्यांनी तिला अभय दिले.
१६६२ साली नामदारखान याचा छत्रपती शिवरायांनी मिऱ्याच्या डोंगरावर म्हणजे तळकोकणातील मिरगडावर दारूण पराभव केला. तेव्हा येसाजी कंक हे राजांसोबत होते. येसाजी कंक यांच्या धाकाने नामदार खानाची फौज मिरगडावरून उड्या टाकून जीव देऊ लागली.
१६६३ साली लाल महालात छापा टाकताना शिवरायांनी येसाजी कंक यांना बरोबर घेतले होते. येसाजी कंक यांनी लाल महालात शत्रूंची खूप लांडगेतोड केली.
१६६४ साली सुरत लुटीत येसाजी कंक शिवरायांसोबत सुरतेत गेले होते. तिथे येसाजी कंक यांनी घरंदाज सावकारांचे वाडेच्या वाडे जप्त करून टाकले. मोठी लूट मिळवली.
१६६६ साली महाराज आग्रा भेटीला जाणार होते. तेव्हा त्यांनी अंगरक्षक म्हणून येसाजी कंक यांना सोबत आग्र्याला नेले. पुढे आग्र्याहून सर्वांची सुटका झाली.
१६६८ पासून प्रत्येक मोहिमेत येसाजी हे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या सोबत असायचे.
१६७२ साली साल्हेर किल्ल्याच्या लढाईत येसाजी कंक हे प्रतापराव व सूर्याजी काकडे यांच्या खांद्याला खांदा लावून लढले. व साल्हेरवर भगवा फडकवला.
१६७४ साली छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यात ते उपस्थित होते.
१६७५ साली येसाजी कंक यांनी गोव्यातील फोंडा किल्ला स्वराज्यात आणला. पोर्तुगीज यांचा दारूण पराभव केला. म्हणून छत्रपती शिवरायांनी त्यांना फोंड्याचे किल्लेदार देखील बनवले.
१६७६ साली दक्षिण दिग्विजय मोहिमेला जाताना महाराजांनी येसाजीराव कंक यांना सुद्धा बरोबर घेतले होते. तेव्हा गोवळकोंडा येथे महाराजांच्या इच्छेखातर येसाजी कंक यांनी कुतुबशाहाच्या मदमस्त.. पिसाळलेल्या.. बेधुंद हत्तीचा पराभव करून त्याला यमसदनी पाठवले. महाराष्ट्राच्या हत्तीने गोवळकोंड्यातील हत्तीला रणांगणात लोळवले.
१६८० साली छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर त्यांनी त्यांचा पाठिंबा शंभुराजे यांना दिला. येसाजीराव व नेताजीराव यांनी मिळून रायगडाचा वेढा फोडून काढला. फितुर सावंत सरदार याला येसाजी कंक यांनी जेरबंद केले.
१६८१ साली छत्रपती शंभूराजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यात येसाजी बाबा कंक उपस्थित होते. तेव्हा त्यांचा खूप मान सन्मान झाला. तेव्हा येसाजी कंक यांचे वाढते वय व त्यांच्यावर आधीच छत्रपती शिवरायांनी दिलेली फोंडा किल्ल्याची जबाबदारी पाहून शंभूराजे यांनी सरदार पिलाजीराव गोळे यांना स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत पद दिले. जवळ जवळ सलग ३० वर्षे श्रीमंत येसाजी कंक यांनी पायदळाच्या सरनोबत पदावर काम केले होते.
१६८३ साली जवळ जवळ २ महिने किल्लेदार येसाजी कंक यांनी फोंडा किल्ला पोर्तुगीज यांच्याविरुध्द लढवत ठेवला. व शेवटी अजिंक्यच राखला..! फोंड्यावर पोर्तुगिजांचा धक्कादायक पराभव येसाजी कंक यांनी केला. व फोंड्याचे रक्षण केले. या लढाईत त्यांचे पुत्र गडकरी कृष्णाजी कंक मारले गेले. स्वतःचा एकुलता एक पुत्र गमावला तरी त्याचं दुःख करत न बसता येसाजी बाबा शेवटपर्यंत पोर्तुगीजांशी लढतच राहिले.
१६८५ साली गोवा प्रांत हिंदवी स्वराज्यात आणण्यास येसाजी कंक यांनी शंभुराजे यांना फार मोठी मदत केली. येसाजी कंक यांच्या मदतीने शंभुराजे यांनी गोवा, म्हापसा, वालपोय, पणजी एका मागून एक गड जिंकून घेतले. आणि पोर्तुगीजांची भयानक कत्तल केली. गोवा प्रांत हिंदवी स्वराज्यात आणला. त्यानंतर काही दिवसांनी शंभूराजे येसाजी कंक यांच्या भुतोंडे येथील घरी गेले. त्यांचं सांत्वन केले. व त्यांना गोव्याचे सुभेदार बनवले. तर त्यांचे नातू चाहुजी कंक यांना फोंड्याची किल्लेदारी दिली.
१६८७ साली येसाजी कंक यांचे वय ६१ वर्षे इतके झाले. त्यांची दगदग होऊ नये म्हणून शंभुराजे यांनी त्यांची गोव्याची सुभेदारी काढून त्यांची रायगडाच्या तटसरनौबत पदी निवड केली.
१६८९ साली धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचे तुळापूर येथे बलिदान झाले. तेव्हा राजाराम राजे यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तेव्हा देखील श्रीमंत येसाजीराव कंक रायगडी उपस्थित होते.
मात्र हा काळ फार बिकट होता. झुल्फिकारखान याने रायगडाला भक्कम वेढा घातला. जवळ जवळ ७-८ महिने तटसरनौबत येसाजी बाबा कंक यांनी राजधानी रायगड लढवत ठेवला.
१६९० साली झुल्फिकार खान याने राजाराम राजे यांच्याबद्दल खोटी अफवा गडावर पसरवली. व त्या राजकारणात येसूबाई फसल्या. त्यांनी झुल्फिकारखान यास रायगडाचा ताबा दिला. व शंभुपुत्र शाहूराजेे,जानकीबाई, सकवारबाई यांना घेऊन औरंग्याच्या कैदेत गेल्या.
यानंतर कुठेच येसाजीराव कंक यांचा उल्लेख सापडत नाही. पण १६९० नंतर २६ वर्षे सरनौबत येसाजी कंक हे जीवंत होते. १६९० ला त्यांचे वय ६४ वर्षे इतके झाले होते.
अशी आख्यायिका आहे.. की येसूबाई यांनी १६९० साली येसाजीराव कंक यांना अंगरक्षक म्हणून औरंग्याच्या छावणीत सोबत नेले असावे.. व छावणीतच १७१६ साली निधन झाले. कदाचित म्हणून कुठे उल्लेख आला नाही. मात्र या बाबत कोणतेही पुरावे नाहीत.(तरीही दाट शक्यता)
काहींच्या मते येसाजी बाबा कंक हे १६९० साली रायगड पडल्यावर भुतोंडे या गावी गेले असावेत…पण स्वराज्याचे निष्ठावंत सहकारी येसाजी कंक हे वाईट काळात स्वराज्यासाठी न लढता त्यांच्या गावी मुक्कामी का जातील..?(कमी शक्यता)
मी येसाजी कंक यांचे थेट वंशज सिद्धार्थ राजे कंक यांना या बद्दल विचारले त्यांनी देखील हेच सांगितले की १६९० नंतर येसाजीराव कंक हे कुठे गेले हे फार मोठे रहस्य आहे.. व १६९० नंतर इतिहासात कोणतेच पुरावे सापडत नाहीत. त्यामुळे नंतर २६ वर्षांच्या काळात येसाजी कंक यांच्या बाबतीत काय घडले.. असा तर्क लावणे उचित ठरणार नाही.
कदाचित संताजी धनाजी यांच्या सोबत पराक्रम सुद्धा गाजवला असेल..!
आणि अशा प्रकारे १७१६ साली वयाच्या ९० व्या वर्षी पायदळ प्रमुख सरनौबत श्रीमंत येसाजीराव कंक यांचे वयोमानाने भुतोंडे या गावी निधन झाले.
No comments:
Post a Comment