विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 8 August 2022

इचलकरंजी, सं स्था न. भाग ८

 



इचलकरंजी, सं स्था न.

भाग ८
ना रा य ण रा व व्यं क टे श आणि अ नू बा ई..घोरपडे

स.१७६२ त थोरले माधवरावांच्या बाजूस दादासाहेबां विरूध्द अनूबाई होत्या व त्यांचें पथक घेऊन विसाजी नारायण हा दादासाहेबांशीं झालेल्या लढायांत कामगिरीवर हजर होता. नंतर दादासाहेबांनीं मिरज घेतली तेव्हां सामान व पायदळ वगैरे कुमक इचलकरंजीहून पेशव्यांस होत होती. स. १७६३ त मोंगलानें पुणें जाळिलें व पेशव्यांनीं बेदर शहर जाळिलें व अवरंगाबाद व भागानगर या शहरांपासून खंडणी घेतली. त्यावेळीं नारायण तात्या पेशव्यांबरोबर होते. यावेळीं दोन तीन निरनिराळया प्रसंगीं श्रींमंतांनीं तात्यांस स्वतंत्र कामगिरीवर पाठविलें होतें व त्यानीं थोडीबहुत खंडणीहि वसूल करून आणिली होती.

इकडे मोंगल व मराठे यांचें युध्द सुरू असतां कर्नाटकांत हैदरअल्ली फार प्रबळ होऊन त्यानें धारवाडचा सुभा बहुतेक काबीज केला. धारवाडचा सुभा हातचा गेल्यामुळें इचलकरंजीकरांचें फार नुकसान झालें. यापूर्वी याच वर्षी मर्दनगड किल्ला व त्याखालचा मुलूख पोर्तुगीज लोकांनीं त्यांज पासून हिसकावून घेतला होता. ती नुकसानी झाली होतीच. याप्रमाणें हैदरीचें प्राबल्य फार वाढल्यामुळें पेशव्यांनीं १७६४ त त्याच्यावर स्वारी केली. त्यावेळीं इचलकरंजीचें पथक नरगुंदास होतें तें या लष्करास येऊन मिळालें होतें.

पुढें १७६४ त धारवाडचा सुभा मोकळा होतांच त्याची मामलत इचलकरंजीकरांस पेशव्यांनीं दिली; कारण त्यांच्या कडे ती पूर्वी बहुत वर्षे होती. व त्यांच्याहि पैसा त्या मामलतींत पुष्कळ गुंतला होता; यावेळीं तात्या इचलकरंजीहून निघून स्वा-या करीत भटकत होते.श्रीमंतांनीं त्यांस धारवाडास बोलावून नेलें व उपदेश केला. परंतु त्यापासून कांहीं निष्पन्न झालें नाहीं.

अनूबाई इचलकरंजीस दुखणेकरी पडून होत्या. ती संधि साधून तात्यांनी परत आल्यावर बराच दंगा केला. प्रथम ते आज-यांस आले. तेथें स्वार व पायदळ मिळून पांच सातशें नवे लोक त्यांनीं चाकरीस ठेविले आणि राणोजी घोरपडे सेनापति यास कांहीं उपद्रव केला. तात्यांचे आजे नारो महादेव यानीं दत्तक कांहीं घेतलेले नरसिंगराव यांचे पुत्र सदाशिव घोरपडे हे रघुनाथराव दादासाहेब यांजवळ होते. त्यांच्या द्वारें दादासाहेबांशीं तात्यांनीं संधान बांधिलें होते. मातोश्रीच्या निसबतीचे जितके लोक आहेत त्यांचें पारिपत्य करावें, सर्व दौलत आपल्या स्वाधीन करून घ्यावी, गोविंद हरि व त्रिंबक हरि पटवर्धन यांशीं कज्या करावा हे त्यांचें बेत होते. तात्यांनीं इचलकरंजीच्या ठाण्यांत प्यादे होते त्यांस वश करून घेतलें व किल्ल्या हिसकांवून घेतल्या. सर्व दौलतींत त्यांचा अंमल बसला. परंतु अनुबाईंची प्रकृती बरी झाली व पेशवेहि कर्नाटकांतून परत
आले. तेव्हां त्यांचे सर्व बेत विरघळून जाऊन त्यांस पुन्हां पूर्वीप्रमाणेंच प्रतिबंधांत रहाणें भाग पडलें

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....