प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग ९
गौतमीपुत्र श्रीयज्ञ सातकर्णी
पुळूमावी नंतर राज्यावर आलेल्या राजांत यज्ञश्री हा सर्वात बलशाली व प्रख्यात राजा होता. त्याने साधारण इ.स. १७१ ते १९९ पर्यंत राज्य केले. कान्हेरी आणि नाशिक येथे मिळाल्या त्याच्या लेखावरून व नाण्यांच्या प्राप्तीस्थानावरून कळते की सातवाहनांची कोसळत चाललेली सत्ता त्याने टिकवली व दक्षिणापथावर आपली पकड मजबूत केल्याचे दिसते. गुजरात आणि सुराष्ट्राचा जो भाग रूद्रदामनाने जिंकला होता, तो पुन्हा याने जिंकून घेतला. सोबतच त्याने मध्यप्रदेश आणि गुजरात मधील क्षत्रपांचे उच्चाटन केले. मात्र ही स्थिती अल्पकाळच टिकली.
पुराणातील माहिती प्रमाणे यज्ञश्रीने एकोणीस वर्षे राज्य केले मात्र, कृष्णा जिल्ह्यातील चिन या गावी सापडलेला लेख हा त्याच्या कारकिर्दीच्या सत्तविसव्या वर्षी कोरलेला आहे त्यावरून यज्ञश्रीने जवळपास तीस वर्षे राज्य केले.
गौतमीपुत्र हे त्याचे खास उपपद होते असे दिसते. त्याच्या नाण्यांवर हे उपपद स्पष्ट कोरलेले दिसते. त्यानेही वासिष्ठीपूत्रा प्रमाणे द्वैभाषिक लेख असलेली स्वतः च्या मुखवट्याची चांदीची नाणी प्रचारात आणली. त्याच्या नाण्यांवरील छापा वरून तो एक धर्मनिष्ठ नृपती असल्याचे जाणवते. मस्तकावरील पांचशिखा, मानेवरून खांद्यावर रुळणारी मुख्य शिखा, कानातील कुंडले, कपाळावरील भस्माचे पट्टे, भेदक नजर ही त्याच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ठे होत. त्याच्या काळात समुद्रावरील व्यापारावर त्याचे वर्चस्व असावे असे त्याच्या आंध्र येथे सापडलेल्या नाण्यावरून समजते ज्यावर शिडाच्या बोटीचा छाप आहे.
यज्ञश्री नंतर माढरीपुत्र शकसेन हा राजा झाला मात्र त्याचे नाव पुराणांमध्ये येत नाही. पुरणांनुसार नंतर विजय, चंडश्री, आणि पुलोम या राज्यांनी राज्य केले मात्र सातवाहनांच्या उतरतीला लागलेल्या राज्याला सावरण्याचे कर्तृत्व त्यांच्या कडे नव्हते.
यज्ञश्री नंतरच सातवाहन साम्राज्याची शकले पडण्यास सुरुवात झाली. माळवा, गुजरात, काठेवाड हा प्रदेश अमीर व क्षत्रपांनी जिंकून घेतला. महाराष्ट्रात महाक्षत्रप ईश्वरदत्त याची सत्ता आल्याची दिसते. इ.स. २३० मध्ये सातवाहनांची सत्ता झुगारून देऊन त्याने स्वतःचे स्वातंत्र्य घोषित केले. यानंतर महाराष्ट्राचा आणि सातवाहनांचा संबंध संपला.
नंतर काही काळासाठी आंध्रा मध्ये सातवाहन कसेबसे टिकून राहिले. त्यांचा शेवटचा नृपती पुळूमावी याचा लेख बेल्लारी जिल्ह्यातील अडोणी येथे सापडलेला आहे. त्यात या परिसराला ' सातवाहननिहरा ' असे म्हणले आहे. म्हणजे मूळचे महाराष्ट्रातील सातवाहन आता आंध्रा चे रहिवासी झाले.
- प्राजक्ता देगांवकर
संदर्भ
१) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) मुसलमानपूर्व महाराष्ट्र महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास - वा. कृ. भावे
No comments:
Post a Comment