विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 23 September 2022

भोर संस्थान : श्रीमंत रघुनाथराव उर्फ बाबासाहेब पंतसचीव

 


भोर संस्थान : श्रीमंत रघुनाथराव उर्फ बाबासाहेब पंतसचीव
(राज्यारोहण १९२२)

यांचा जन्म १८७८ सालीं झाला. त्यांचा सन १९०५ पर्यंतचा काळ प्रथम पुणें हायस्कूल, नंतर म्याट्रिक झाल्यावर डेक्कन कॉलेजांत पाश्चात्य शिक्षण व कायदेशिक्षण संपादन करण्यांत गेला. नंतर त्यांना संस्थानच्या कामकाजाची माहिती होण्याकरितां त्यांचे वडील रावसाहेब यांनीं त्यांनां शिरवळ तालुक्याचें अ. कलेक्टर व अ. जज्जाचे अधिकार दिले. ते अधिकार उत्तम रीतीनें चालवून त्यांनीं संस्थानच्या कामाची व लोकस्थितीची पूर्ण माहिती करून घेतली. हिंदुस्थानांत ब-याच ठिकाणीं प्रवास करून त्यांनीं आपल्या ज्ञानांत भर घातली आहे. जगांत चाललेल्या घडामोडीचें सूक्ष्म निरीक्षण करून राज्यकारभाराचें धोरण त्यांनीं गादीवर येण्यापूर्वींच आंखून ठेविलें होतें. या प्रकारचें निश्चित धोरण असल्यानें राज्यारोहणसमारंभकाळींच (ता. १८ आगष्ट १९२२) प्रजेंत झालेला असंतोष नाहींसा करण्याकरतां व नोकरांनां संतुष्ट करण्याकरितां श्रीमंत बाबासाहेबांनीं घरपट्टी, म्हैसपट्टी, लग्नटक्का, पाटदाम हे कर व शेंदूर, तपकीर, वगैरे किरकोळ जिनसावरील लायसेन्स-फी माफ केली. संस्थानांतील सर्व प्राथमिक शाळांतून मराठी चवथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण मोफत केलें. आणि जमीनसा-यांत सूट, सर्व नोकर लोकांस बोनस वगैरे देणग्या दिल्या. शिवाय सुधागड तालुक्यांत पाली येथें दवाखाना आणि भोर येथें एक वेदशाळा सुरू केली. हे युवराज असतांनाच त्यांनीं भोर येथें श्रीरामक्रीडाभुवन (प्रथमपत्नीचें स्मारक म्हणून) कै. श्री. सौ. गंगूताई पंतसचीव वाचनालय अशा दोन संस्था स्थापन केल्या आहेत. त्यांनीं प्रातिनिधिक तत्त्वावर राज्याकारभार चालविण्याचें आपलें धोरण जाहीर करून भोरास लोकमतानुवर्ती म्युनिसिपालिटी स्थापन केली व सभाबंदीचा कायदा रद्द करून प्रजेला आपलीं गा-हाणीं मांडण्याचा मार्ग मोकळा करून दिला. नोकरांनां पगारवाढ करून पेन्शन, ग्र्याच्युटी, भत्ता, यांचें नियम केले आहेत.

श्रीमंत बाबासाहेब यांस सातारा जिल्ह्यांतील संस्थानिकांनीं आपले प्रतिनिधी म्हणून नरेंद्रमंडळाकरितां निवडून दिलें आहेत. त्याप्रमाणें ते दिल्लीस १९२४ सालीं गेले होते. जंगल व हिरडा याबद्दल रयतेची फार वर्षांची तक्रार असल्यामुळें फारेस्टचौकशीकमेटी व हिरडाचौकशी कमिटी अशा दोन कमिट्या त्यांनीं नेमिल्या आहेत.

श्रीमंत बाबासाहेब यांचें हल्लींचें द्वितीय कुटुंब सौ. लक्ष्मीबाईसाहेब या सुशिक्षित, सुशील प्रजावत्सल व स्त्रीशिक्षणाभिमानी आहेत. श्रीमंत बाबासाहेब यांनां हल्लीं प्रथम कुटुंबापासून एक व द्वितीयाकुटुंबापासून दोन असे ३ पुत्र आहेत; पहिल्या कुटुंबापासून झालेले युवराज श्री. भाऊसाहेब हे सन १९२४ सालच्या म्याट्रिक परीक्षेंत पास होऊन उच्च शिक्षणाकरितां डेक्कन कॉलेजांत शिकत आहेत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...