विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 31 October 2022

राणी बायजाबाई शिंदे

 


राणी बायजाबाई शिंदे
आताच्या काळामध्ये ग्वाल्हेरच्या शिंदे (सिंधिया) घराण्याची राणी असं म्हटलं की डोळ्यासमोर राजमाता विजयाराजे सिंदिया यांचं नाव आणि प्रतिमा येते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी भारतीय राजकारणात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे त्यांचं नाव आपल्याला माहिती असतं. 'राजमाता' या त्यांच्या ओळखीमुळे त्यांची ग्वाल्हेरची राणी ही प्रतिमा आपल्या डोळ्यात येते.

पण आपण इथं ग्वाल्हेरच्या एका वेगळ्या राणीची माहिती घेणार आहोत. ती राणी म्हणजे बायजाबाई शिंदे.

या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील होत्या. कागलच्या या मुलीने केवळ शिंदे घराण्याची सून म्हणून नाव कमावलं नाही तर अत्यंत दोलायमान राजकीय स्थितीत ग्वाल्हेर संस्थानचा कारभार पाहिला. बायजाबाई शिंदे यांच्या कर्तृत्वाचं वर्णन अनेक देशी-विदेशी इतिहास अभ्यासकांनी केलं आहे.

घाटगे घराण्याचा ग्वाल्हेरशी संबंध कसा आला?
कागल येथिल देशमुखी घाटगे घराण्याकडे होती. या घराण्यातील एक शूर पुरुष सखाराम म्हणजेच सर्जेराव घाटगे हे परशुराम पटवर्धन यांच्याकडे सरदार होते. पटवर्धन यांच्यासोबत त्यांचे पुण्यात येणे-जाणे होऊ लागले.
सर्जेराव घाटग्यांचे गुण पाहून त्यांनी पुण्यातच राहावे अशी विनंती नाना फडणवीसांनी केली आणि घाटगे पुणे दरबारातच रुजू झाले.
पुढे सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर दुसरे बाजीराव पेशवेपदी आले तेव्हाच्या काळामध्ये महादजी शिंदे यांचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्याशी सर्जेराव घाटग्यांचा संपर्क आला.

सर्जेराव घाटगे यांच्या मुलीशी दौलतराव शिंदे यांनी विवाह करावा असा प्रस्ताव दुसऱ्या बाजीरावांनी मांडला. ही कन्या म्हणजेच बायजाबाई शिंदे होय. त्यानंतर शिंदे यांच्या दिवाणपदावर सर्जेराव घाटगे यांची नेमणूक झाली आणि मार्च 1798 मध्ये बायजाबाई घाटगे आणि दौलतराव शिंदे यांचा विवाह झाला.

शिंद्यांच्या दरबारातील वाढत्या वजनामुळे अप्रिय झालेल्या सर्जेराव घाटग्यांची आनंदराव नावाच्या एका सरदारांनी आणि मानाजी फाकडे यांच्या मुलाने 1810 साली हत्या केली.

दत्तात्रय बळवंत पारसनिस यांनी महाराणी बायजाबाई शिंदे या नावाने 1902 साली एक चरित्र प्रसिद्ध केलं आहे. या पुस्तकात या सर्व घडामोडींचे वर्णन केलं आहे. पारसनिसांचं पुस्तक मुंबईच्या बाबाजी सखाराम आणि कंपनीने प्रकाशित केलं होतं.

दक्षिणेची सौंदर्यलतिका
बायजाबाई शिंदे दिसायला अत्यंत सुंदर आणि सुस्वरुप होत्या असं वर्णन अनेक इतिहासलेखकांनी केलं आहे. इंग्रज लेखकांनी तिला ब्युटी ऑफ डेक्कन (दक्षिणेची सौंदर्यलतिका) असं म्हटलं आहे.

द. बा. पारसनीस यांनी लिहिलेलं बायजाबाई यांचं चरित्र

बायजाबाई शिंदे ग्वाल्हेरला गेल्यावर त्यांचा सर्व कारभारात वावर असे. शिकारीमध्येही त्या सहभागी होत. भाला फेकणे, बंदुकीने शिकार करणे, घोडेस्वारी अशा सर्व कलांमध्ये त्या निपुण होत्या.

दौलतराव शिंदे यांचा 1827 साली मृत्यू झाला. तत्पुर्वी आपला राज्यकारभार बायजाबाई शिंदे यांनीच सांभाळावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे बायजाबाई शिंदे यांच्याकडे ग्वाल्हेरच्या सर्व कारभाराची सूत्रं आली.

राज्यकारभार आणि हिंदुराव घाटगे
1810 साली सर्जेराव घाटगे यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा राजा हिंदुराव (मूळ नाव जयसिंगराव) ग्वाल्हेरला येऊन राहिला. हे हिंदुराव दौलतराव शिंदे यांच्याबरोबर काम करू लागले. हिंदुराव घाटगे यांचं ग्वाल्हेरच्या दरबारात मोठं प्रस्थ तयार झालं.

दौलतराव शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर बायजाबाईंनी शिंदे घराण्यातील मुकुटराव नावाच्या पुत्रास दत्तक घेऊन राजगादीवर बसवलं आणि त्यांचं नाव जनकोजी असं ठेवण्यात आलं.

त्यानंतर बायजाबाई यांनी आपला भाऊ हिंदुराव, बापूजी रघुनाथ, यशवंतराव दाभाडे, यशवंतरावभाऊ बक्षी, लालाभाऊ, फकीरजी गाढवे, माधवरावपंत ब्रह्माजी, लक्ष्मणराव विठ्ठल, रामराव फाळके, मणिराम शेट, दाजीबा पोतनीस, आत्माराम वाकडे या सरदारांच्या मदतीने आणि काही इंग्रज सैन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्यकारभार पाहायला सुरुवात केली.

बायजाबाई यांच्या राज्यकारभाराचं कौतुक अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे. 1 जुलै 1832 साली इंडिया गॅझेटमध्ये त्यांच्या वर्णनाबद्दल म्हटलं आहे, "The Regent Baee conducts the affairs of this state with great regularity, much better, I understand, than what was done in the time of late Maharaja" रिजंटबाई म्हणजेच बायजाबाई अत्यंत नियमितपणे कारभार चालवत असून दिवंगत राजे दौलतरावांपेक्षाही तो चांगला आहे, असं त्यात छापण्यात आलं होतं.

तर मिल्स हिस्ट्रीमध्ये बायजाबाई शिंदे या तेजस्वी, सत्वशील आणि कडक स्वभावाच्या होत्या असं म्हटलं आहे. मुंबई गॅझेटच्या पत्रकारांनी "बायजाबाई शिंदे यांचा कारभार पाहाता त्यांनी उत्तराधिकारी व्हावं हा दौलतरावांचा विचार किती बरोबर होता हे समजतं. त्या शांतता राखण्याच्या बाजूच्या होत्या", अशा आशयाचं वर्णन 1833 साली प्रसिद्ध केलं आहे. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीही बायजाबाईंना ज्ञानकोशात विशेष स्थान देऊन त्यांचं वर्णन लिहिलं आहे.

फोटो स्रोत,D. B. PARASNIS
बायजाबाई शिंदे आणि ग्वाल्हेरचा किल्ला
हिंदुराव घाटगे आणि बायजाबाई शिंदे
With thanks:
Mahesh Patil-Benadikar

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...