विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 9 December 2022

गानिमिकावाच्या जनक मलिक अंबर भाग २

 

गानिमिकावाच्या जनक मलिक अंबर
लेखन :ओंकार ताम्हणकर ( चारुस्थली )



भाग २
मोगलांशी तह झाल्यावर मलिक अंबर ने स्वतःचे लक्ष प्रजेकडे दिले. सतत च्या युद्धामुळे प्रजेची ससेहोलपट झाली होती. महसूल गोळा होण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या. पर्यायाने राज्यात आर्थिक तंगी येऊ लागली होती. या अडचणींना तोंड देण्यासाठी मलिक अंबर ने जमिनीची मोजणी करून घेतली. जमिनीचे बागायतीजिरायती असे दोन भाग करून घेतले. जमिनीच्या उत्पन्नाचा २/५ भाग धान्यरूपाने कर म्हणून घेण्यास सुरुवात केली. मागील कित्येक वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढून प्रत्येक शेतावर सरकारचे नक्त देणे ठरविले आणि ते देणे पण कमीजास्त येणाऱ्या पिकांच्या मनाने कमीजास्त देण्याची सवलत ठरवली. लोकांना नवीन जमिनी लागवडी खाली आणण्यास प्रोत्साहन देऊन त्या जनिमीवर काही वर्षे सारामाफी दिली. मलिक अंबर ने केलेल्या या सुधारणांमुळे तत्कालीन निजामशाही रयत सुखी झाली होती.
यावेळी निजामशाही २ मोठ्या सरदारांमुळे टिकून राहिली होती.
१. मलिक अंबर २. मियां राजू.
यातील मिया राजू फारच खालच्या दर्जाचा असल्यामुळे त्याकडील सरदार मलिक अंबराला येऊन मिळाले आणि इ.स. १६०२ मध्ये मलिक अंबरने मिया राजू वर चाल करून त्याचा नांदेड येथे पराभव केला. आणि त्याला व मुतृझा निजामशहा ला दौलताबाद किल्ल्यावर कैदेत ठेवले.
यानंतर मलिक अंबर ने मोगलांनी जिंकलेले निजामशाहीचे प्रदेश पुन्हा जिंकण्यास सुरवात केली. पुढे मोगलांचेही बरेच प्रदेश अंबरने जिंकले.
इ.स. १६०९ साली मुघल बादशाह जहांगीर ने खानजहान लोदीला अंबरविरुद्ध पाठविले. अंबराचा विजय झाला.
इ.स. १६११ मध्ये पुन्हा मुघलांनी मलिक अंबर विरुद्ध स्वारी केली. त्यातही मलिक अंबर चा विजय झाला.
सततच्या या पराभवामुळे मुघल बादशाह जहांगीर फार चिडला आणि स्वतः दक्षिणेत यायला निघाला. त्यावेळी पराभूत खानजहान ने त्याला थांबविले आणि स्वतः परत दक्षिणेत आला. यावेळी मात्र त्याने मलिक अंबर विरुद्ध थेट न जाता अंबरच्या लखुजी जाधवराव सारख्या अंबरच्या सरदारांना आपल्या बाजूला करून घेतले आणि त्याच्यावर हल्ला केला. ही लढाई १६१२ रोजी सुरू झाली पुढे ५ वर्ष चालली. यात मात्र मलिक अंबराचा पराभव झाला.
इ.स. १६२४ मध्ये मुघल आणि आदिलशाही फौजांनी एकत्रितपणे निजामशाहीवर हल्ला केला. या युद्धास भातवडीची लढाई म्हणतात. निजामशाही कडून या युद्धाचे नेतृत्व मलिक अंबर याने केले होते. त्याच्याबरोबर शहाजीराजे, शरीफजीराजे, खेळोजी भोसले वगैरे मंडळी होती. या युद्धात मालिक अंबराचा विजय झाला.
"शके १५४६ रक्ताक्षी संवत्सरे कार्तिक मासी भातवडीस मोगलांचा सुभेदार लष्करखान व आदिलशाही मुल्ला महमद येसी दोन कटके मलिक अंबरे बुडविली."
युद्धानंतर लगेचच मलिक अंबर ने कमकुवत झालेल्या आदिलशाहीचा बराच प्रदेश उध्वस्त केला.
पुढे १० मे १६२६ रोजी वृद्धापकाळाने मलिक अंबराचा खुल्दाबाद येथे मृत्यू झाला.
  • मलिक अंबरने त्याच्या काळात जातीभेद केला नाही. त्याने अनेक मंदिरांना कायमची इनामे देऊ केली होती.
  • मलिक अंबरने निजामशाही रयतेची चांगल्या प्रकारे काळजी घेतली.
  • मलिक अंबरने सर्वप्रथम गनिमी काव्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला.
  • मलिक अंबरने जुन्नर शहराची भरभराट केली. आजही त्याचा वाडा जुन्नर शहरात आहे.
  • मलिक अंबरने खडकी हे शहर वसविले. ज्याला आपण आज औरंगाबाद म्हणतो.
संदर्भ :-
  • इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १
  • जेधे शकावली
  • शिवभारत
  • जहांगीरनामा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...