अण्णाजीदत्तो – व्यक्तिवेध
लेखन ::श्री नागेश सावंत
अण्णाजीदत्तो
छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळातील विश्वासू मंत्री . स्वराज्याच्या
युद्ध मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग ते स्वराज्यातील शेतसारा वसुली , जमीन मोजणी
यामध्ये विशेष योगदान . अफझलखान वध , सुरतेची लुट , अशा स्वराज्यातील
मोहीमांमध्ये आण्णाजी दत्तो यांचा सहभाग दिसून येतो. आग्रा भेटीवेळी तसेच
दक्षिणदिग्विजयावेळी शिवाजी महाराजांनी आण्णाजी दत्तो यांच्यावर देखील
स्वराज्याची जबाबदारी दिली होती . शिवाजी महाराजांच्या सल्लगार मंडळीतील एक
विश्वासू व्यक्तिमत्व . छत्रपती शिवरायांच्या काळात अण्णाजीदत्तो
स्वराज्याचे विश्वासू सेवक असले तरी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात
मात्र अण्णाजीदत्तो हे संभाजी महाराजांशी वितुष्ट येऊन संभाजी महाराजांच्या
विरोधातील कटात सामील झाले ह्या आरोपाखाली हत्तीच्या पायी दिले गेले.
जेधे
शकावलीतील नोंदीनुसार भाद्रपदशुक्ल षष्टी शके १५८३ म्हणजे २९ ऑगस्ट १६६१
रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अण्णाजीपंतास वाकेनिसी दिली. जेधे
शकावलीतील नोंदीनुसार भाद्रपदशुक्ल द्वादशी शके १५८४ म्हणजे १६ ऑगस्ट १६६२
रोजी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अण्णाजीपंतास सूरनिसी दिली. सुरनीस या
फारसी शब्दाचा अर्थ “सुद सुद बार“ असा शेरा मारणारा . सनदा , हुकूमनामे ,
राजपत्र , महत्वाच्या निर्णयांची शासकीय कागदपत्रे तपासणे, त्यातील त्रुटि
शोधून त्यातील चुकीचा मजकूर दुरुस्त करणे . महाल , परगणे यांचे हिशोब
जमाखर्च तपासणारा कारकून . वित्त व लेखा अधिकारी . प्रसंगी युद्धात नेतृत्व
करणे.
शेतजमिनीची
व्यवस्था पाहण्याची जबाबदारी अण्णाजी दत्तो यांच्याकडे होती त्यामुळे
महसुलाच्या व्यवस्थेवरही लक्ष ठेवावे लागे. जमनीची मोजणी , सारा वसुली यात
त्यांचे योगदान आढळून येते. चिटणीस बखरीनुसार धारा निशित करण्याचा प्रयत्न
अण्णाजी दत्तो यांनी केला. “ अण्णाजीपंतांचा धारा “ हा शब्द प्रयोग
पेशवाईतहि रूढ होता. इ.स. १६७८ साली रोहीडेखोरे परगण्याच्या वतनदाराना
कौलनामा दिला त्यावरून याविषयीची माहिती मिळते. अण्णाजी दत्तो यांनी नियम
तयार केले त्यानुसार देशमुख ,देशपांडे , पाटील आणि गावातील चार प्रमुख
व्यक्ती यांनी गाव फिरावे . अव्वल , दुव्वल , सीम अशी जमिनीची प्रतवारी
करून पिकाचा अंदाज घ्यावा. खरीप आणि रब्बी पिकांची वर्गवारी करून सारा गोळा
करावा. अण्णाजी दत्तो स्वतः गावांमध्ये जात असत आणि डोंगरकाठाची जमीन ,
खाचर तळ्याची जमीन, काळी जमीनिची पाहणी करून शेतसाऱ्याचा दर ठरवीत.
शिवाजी
महाराज आग्राहून सुखरूप स्वराज्यात आले व त्यांनी तहानुसार मोगलांना
दिलेला स्वराज्याचा प्रदेश पुन्हा स्वराज्यात आणण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार त्यांनी मोरोपंत पेशवे व निळोपंत मजमदार व अणाजीपंत सुरनीस यांसी
आज्ञा केली की , “ तुम्ही राजकारण , यत्न करून किल्ले घ्यावे .”
पन्हाळा
किल्ला स्वराज्यात आणण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी अण्णाजीपंत व
कोंडाजी फर्जंद यांच्याकडे सोपविली. प्रणालपर्वत ग्रह्नाख्यानतील
नोंदीनुसार अण्णाजीपंत यांनी हेरांकरवी माहिती घेतली व कोंडाजी फर्जद
यांच्याशी विचारविनिमय करून योजना आखली. अण्णाजीपंत हे पिछाडीचे रक्षण
करण्यासाठी म्हणून ससैन्य जंगलात दबा धरून बसले. जेधे शाकावलीतील
नोंदीनुसार “ फाल्गुन वद्य १३ शके १५९४ पनाला गड आणाजीपंती भेद करून
कोंडाजी फर्जंद बरोबर लोक देवून घेतला.
सभासद
बखरीतील नोंदीनुसार “ स्वराज्याचा वाढता कारभार सांभाळण्यासाठी शिवाजी
महराजांनी चेउलपासून दाभोळ , राजापूर , कुडाळ, बांदे, फौंड, कोपलपर्यंत
कोकण अण्णाजीदत्तो यांच्या स्वाधीन केला. “
मुंबईकर
इंग्रज त्यांच्या १३ मे १६७५ च्या पत्रात लिहितात “ अण्णाजी हा तिकडील
व्हाईसरॉयच्या अधिकारावरचा अंमलदार असल्यामुळे व चतुर असल्यामुळे आपल्या
दर्जाप्रमाणे आपला मान ठेवला जावा असे त्याला वाटणे साहजिक आहे. तरी त्याचा
योग्य मान ठेवा. सदर पत्रावरून अण्णाजीदत्तो याचे स्वराज्यातील तत्कालीन
महत्व लक्षात येते.
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर
छत्र धरण्याचा मान अण्णाजीदत्तो यांना होता . इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी रायगडावर नजराणे घेऊन
उपस्थित झाला त्यावेळी त्याने अण्णाजीदत्तो यांच्यासाठी १२५ रुपये किमतीचे ७
तोळे वजनाचे २ सोन्याचे गोफ नजराणा म्हणून आणले होते.
शिवाजी
महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अण्णाजी दत्तो यांना शिवाजी महाराजांनी
फोंडा किल्ला हस्तगत करण्यास पाठविले परंतु अण्णाजी दत्तो कुडाळपर्यंत आला
परंतु मह्मद्खानाला याचा सुगावा लागल्याने अण्णाजी दत्तो यांना या मोहिमेत
अपयश आले.
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या अंतसमयी अण्णाजी दत्तो चौलला होते . महाराजांची दुख:द
बातमी कळताच ते रायगडावर येण्यास निघाले व सहाव्या दिवशी रायगडावर पोहचले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अण्णाजी दत्तो एक स्वराज्याचा विश्वासू
सेवक होता. परंतु शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावर छत्रपती राजाराम
महाराज यांना स्वराज्याचे भावी छत्रपती घोषित करण्यात आले व अण्णाजी दत्तो
छत्रपती राजाराम महाराजांच्या गटात सामील झाले. . जेधे शकावलीतील
नोंदीनुसार अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर “ वैशाख शुद्ध ३ तृतीयेस राजारामास
अनाजीपंत सुरनीस यांनी मंचकी बसविले.” छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या
मंत्र्यांमध्ये कोणाला राजा करावे याबद्दल मतभेद होते . त्यामुळे
स्वराज्यात दोन गट पडले गेले. इंग्रज त्यांच्या पत्रात लिहितात “
शिवाजीच्या प्रधानांमध्ये कोणाला राजा करावे याबद्दल मतभेद होता. अण्णाजी
पंडित मुख्य प्रधान धाकट्याच्या बाजूचा होता. तर मोरो पंडित जेष्ठ पुत्र
संभाजी यांचा पुरस्कृत करीत होता.”
संभाजी
महाराज यावेळी पन्हाळगडावर होते . संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी
अण्णाजीदत्तो व पंतप्रधान मोरोपंत पेशवे पन्हाळ्यास रवाना झाले. या कामी
स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांची मदत मिळवी या उद्देशाने त्यांनी
सेनापती हंबीरराव मोहिते यांना आपल्या बाजूस वळविण्याचा प्रयत्न केला
परंतु सेनापती हंबीरराव मोहिते यांनी संभाजी महाराजांना पाठिबा दिला. व
अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांना कैद केले व संभाजी महाराजांच्या
आज्ञानुसार हातापायात बेड्या टाकून जेरबंद करण्यात आले. इंग्रज अधिकारी
लिहितात “ अण्णाजी पंडिताचा शीरच्छेद झाला.” परंतु हि अफवा असल्याचे
त्यांच्या लक्षात आले व त्यानंतरच्या पत्रात ते लिहितात “ संभाजी रायरीला
आहे. धाकट्या भावाला त्याने दयेने वागवले. अण्णाजीचे डोके कापले नसून
त्याचे फक्त साखळ्या ( बेड्या ) घालून हाल चालविले आहेत. “
छत्रपती
संभाजी महाराज सिहासनावर विराजमान झाले त्यावेळी त्यांनी आण्णाजी दत्तो व
इतर मंत्री यांना कैदेतून मुक्त केले व त्यांच्या घरांवर बसविलेल्या चौक्या
देखील उठवण्यात आल्या. अण्णाजी दत्तो यांना छत्रपती संभाजी महाराजांनी
आपल्या अष्टप्रधान मंत्रिमंडळात पुन्हा समाविष्ट केले. त्यांना सुरनीस
पदाऐवजी मुजुमदार पद देण्यात आले.
- छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध कट-कारस्थाने
संभाजीराजांवर विषप्रयोग :-
छत्रपती संभाजी महाराज पन्हाळगडावर वास्तव्यास असताना त्यांच्यावर
विषप्रयोग करण्यात आला होता याची नोंद ३० ऑगस्ट १६८१ च्या इंग्रजांच्या
पत्रात येते . “ संभाजी महाराजांना मत्स्यातून विषप्रयोग करण्याचा डाव
अण्णाजी पंडित व केशव पंडित यांचा होता . परंतु एका नोकराने त्यांना या
विषप्रयोगाची माहिती दिली त्यामुळे सावध झालेल्या संभाजी महाराजांनी त्या
मांसाअन्नातील काही भाग एका कुत्र्यास व एका नोकरास खाण्यास दिला . अन्न
खाताच काही वेळाने ते दोघेही मरण पावले. ह्या कारस्थानात अण्णाजी पंडित व
केशव पंडित यांचा हात होता . त्यांना लोखंडी बेड्या अडकवल्या.
कमल
गोखले शिवपुत्र संभाजी यात लिहितात “ जूलैच्या मध्यात अण्णाजी दत्तो
डिचोलीला गेला. पौर्तुगीजनी याचा फायदा घेऊन नारायण शेणवी यास अण्णाजीकडे
पाठवले. त्याने डीचोलीच्या सुभेदाराच्या वागणुकीबद्दल तक्रार केली. ऑगस्ट
१६८१ पूर्वी संभाजी विरुद्ध झालेल्या कटात अण्णाजी सामील होता. पौर्तुगीज
कागदपत्रावरून याच सुमारास तो डीचोलीस गेला होता. विजरयीची दि. २१-०७-८१ व
दि. २३-०७-८१ ची अण्णाजीला लिहिलेली दोन पत्रे आहेत. त्यामुळे संभाजीच्या
आज्ञावरून अण्णाजी डिचोलीला काही कामासाठी गेला का विषप्रयोगाच्या कटात
आपला हात आहे हे संभाजीला कळू नये म्हणून तेथे गेला हे समजू शकत नाही.
डीचोलीहून एक महिन्याने तो पन्हाळा किंवा रायगडला परतला तेव्हा त्याला कटात
सामील असण्याबद्दल ठार मारण्यात आले.
अकबराशी संधान :-
अण्णाजी दत्तो , सोयराबाई , हिरोजी फर्जंद यांनी औरंगजेबाचा मुलगा अकबराशी
संधान बांधले व संभाजीराजांना गादीवरून काढण्याचा व राजाराम महाराजांना
गादीवर बसवण्याचा कट रचला. त्यांनी अकबरास पत्र पाठवून त्याच्या मदितीची
अपेक्षा केली . त्या बदल्यात अकबरास स्वराज्यातील हिस्सा देण्याचे मान्य
केले. परंतु अकबराचा मंत्री दुर्गादास याने अकबरास संभाजी महराजांकडे ते
पत्र सोपवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अकबराने संभाजी महाराजांस सदर घटना
कळवली. सदर कट उघडकीस आल्यावर संभाजी महाराजांनी कटात सामील लोकांस कैद
करून कडक शिक्षा केली व हत्तीच्या पायी दिले. याच दरम्यान सोयराबाई
यांनीदेखील आत्महत्या केल्याच्या नोंदी आढळून येतात. सदर कटाच्या प्रकरणाची
माहिती आपणास ७ सप्टेंबर १६८१ च्या इंग्रजांच्या पत्रात तसेच , निकोलाय
मनुची , रॉबर्ट ऑर्म व पंतप्रतिनिधीच्या बखरीत आढळते.
पंतप्रतिनिधीच्या
बखरीनुसार “ इतक्यात अनाजी दत्तो त्याच्या पक्षपाती लोकांनी त्या महमदाशी (
अकबराशी ) राजाराम याचे हिताविषयी संभाजीस घाताची मसलत केली. हे वर्तमान
संभाजीस महमदाने कळवले. याचे भेटीस संभाजी गेला. मग त्याने अनाजी दत्तो व
शिर्के कुळातील जे मुख्य पद सापडतील ते आणि प्रभू बालाजी आवजी पुत्रासहित
हत्तीचे पायी दिले. “
“
जेधे शकावलीनुसार “ भाद्रपद मासी संभाजी राजे यांनी कवी कलश्याच्या बोले
मागती आणाजी दत्तो सचिव यांजवर इतराजी करून मार दिल्हा. त्या माराने
राजश्री आनाजीपंत व बाळ प्रभू व सोमजी दत्तो व हिराजी फर्जंद परळीखाली कैद
करून मारिले.
२९-०९-१६८२
डच लिहितात अण्णाजी दत्तोने संभाजीचा धाकटा भाऊ राजाराम यास गादीवर बसवून
संभाजीला मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून राजांनी त्याला मारले.
मराठ्यांची धारातीर्थे प्रवीण भोसले :- अण्णाजी दत्तो यांची समाधी रायगड जिल्यातील ओंढा गावात होती परंतु शहराच्या आधुनुकीकरणात समाधी नष्ट झाली.
अण्णाजी दत्तो यांचा शिक्का :- श्री / शिवचरणी / निरंतर दत्तसुत अनाजीपंत / तत्पर /
श्री. नागेश सावंत.
संदर्भ :- सभासद बखर , चिटणीस बखर , जेधे शकावली , शिवकालीन पत्रसार संग्रह , प्रणालपर्वत ग्रह्नाख्यान, ऐतिहासिक बखरी खंड १
कमल गोखले : -शिवपुत्र संभाजी ,
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा : -सदाशिव शिवदे
छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती :- केदार फाळके
छायाचित्र साभार गुगल
No comments:
Post a Comment