विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

इंग्रज,पौर्तुगीजांचा ख्रिस्ती धर्माचा प्रसार

 



इंग्रज,पौर्तुगीजांचा ख्रिस्ती धर्माचा प्रसार

लेखन ::श्री नागेश सावंत

इंग्रज , पौर्तुगीज हे व्यापारी म्हणून भारतात आले व राज्यकर्ते झाले. परंतु ख्रिस्ती धर्माचा प्रचार गुप्तपणे करणे हादेखील त्यांचा मुख्य उद्देश होता. एखाद्या प्रदेशाची सत्ता हाती येताच अन्यायकारक हुकुम काढून स्थानिकांचे धर्मपरिवर्तन घडवून आणले जात असे. इंग्रज धर्माच्या बाबतीत सर्वाना स्वातंत्र्य आहे असे वरवर भासवून स्थानिकांचा विश्वास संपादन करत असत. स्थानिकांना त्यांच्या गुप्त मनसुब्याची शंका येणार नाही याची काळजी घेत कारण याबाबत जर स्थानिकांना संशय आला तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे हे धार्मिक आक्रमण गुप्तपणे करणे हे इंग्रजांचे धोरण होते.
१५ डिसेंबर १६७३ च्या पत्रात मुंबईकर इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीस पत्र लिहितात “ ख्रिस्ती धर्मातील दहा आज्ञा व ख्रिस्ती धर्माच्या तत्वांचे देशी भाषेत ( स्थानिक भाषेत ) भाषांतर करून ते बेटावर फैलावून ( स्थानिक लोकांत पसरवून ) ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास उत्तेजन द्यावे . हि आपली आज्ञा आम्हास महत्वाची वाटते. आणि ती अंमलात आणण्याचा प्रसंग येईल त्याप्रमाणे आम्ही अंमलात आणू परंतु धर्माचे याबाबतीत सर्वाना स्वातंत्र्य देण्याची आमची प्रतिज्ञा असल्यामुळे येथे लोकवस्ती वाढत आहे. हे ध्यानात घेता याबातीत आमचे ताटस्थ्य थोडे देखील ढळल्याचे लोकांचे लक्षात आल्यास अनिष्ठ परिणाम होईल त्यामुळे हे आक्रमण गुप्तपणे करणे जरूर आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पौर्तुगीजाना शासन

छत्रपती शिवाजी महाराजांनी या परकीय आक्रमकांच्या मनातील सुप्त इच्छा जाणली होती. परकीय आक्रमणकर्ते हे फक्त व्यापारी किंवा राज्यकर्ते म्हणून आलेले नसून धर्मप्रसारासाठी आलेले आहेत हे त्यांनी ओळखले होते. गोव्याचा व्हाइसरॉयणे हुकुम काढला त्यानुसार रोमन कॅथलिक धर्माच्या व्यतिरिक्त अन्य धर्मीय लोकांनी रोमन कॅथलिक धर्म न स्वीकारल्यास गोव्यातून हद्दपारीची तसेच मृत्यूचा हुकुम काढला. शिवाजी महाराजांना हि बातमी समजताच त्यांनी क्रोधीत होऊन सैनिकी स्वारी केली व तेथील चार पाद्र्यांना कैद केले व हिंदू धर्म स्वीकारण्यास सांगितले. परंतु या पाद्र्यांनी यास नकार दिल्याने शिवाजी महाराजांनी या पद्र्यांचा शिरच्छेद केला त्यामुळे गोव्याचा व्हाइसरॉयास दहशत बसली व त्याने त्याचा हुकुम मागे घेतला. परंतु शिवाजी महाराजांनी सर्व मुलुखात जाळपोळ करून १५० होणांची लुट केली व त्यास दहशत बसवली.
३० नोहेंबर १६६७ च्या गोव्यातून पाठवलेल्या पत्रात पत्रात या विषयीची नोंद आपणास आढळून येते. “ गोव्याच्या व्हाइसरॉयने रोमन कॅथलिक धर्म वगळून इतर धर्माच्या माणसांना हद्दपारीचा हुकूम काढल्यामुळे अत्यंत क्रुद्ध होऊन शिवाजीने गोव्यानजीक बारदेशच्या हद्दीवर स्वारी केली. व तेथील चार पाद्री लोकांनी स्वधर्मीयांव्यतिरिक्त इतरांचा प्राणनाश करण्याचा सल्ला दिला होता. हे लक्षात ठेवून त्यांनी स्वतः शिवाजीचा मराठा ( हिंदू ) धर्म स्वीकारण्याचे नाकारल्यामुळे शिवाजीने त्यांचा शिरच्छेद केला, त्यामुळे घाबरून जाऊन व्हाइसरॉय ने आपला क्रूर व कडक हुकूम परत घेतला. शिवाजी ने आसपासच्या सर्व मुलखात जाळपोळ करून १५० लक्ष होनांची लूट केली “
श्री नागेश सावंत
संदर्भ :-
शिवकालीन पत्रसारसंग्रह २ पत्र क्रमांक १६०३
शिवकालीन पत्रसारसंग्रह १ पत्र क्रमांक ११८६

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...