विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

महाराणी येसूबाई

 


महाराणी येसूबाई

लेखन ::श्री नागेश सावंत

छत्रपती शिवाजी महाराजांनी २९ एप्रिल १६६१ स्वराज्याचे शत्रू शृंगारपुरचे राजे सूर्यराव सुर्वे यांच्यावर हल्ला केला व त्यांचा प्रदेश जिंकून घेतला त्यावेळी सूर्यराव सुर्वे पळून गेला . सुर्व्यांच्या सेवेत असणारे पिलाजी शिर्के शिवाजी महाराजांच्या सेवेत आले. जेधे शकावलीनुसार “ वैशाख शुध ११ शके १५८३ सोमवारी शृंगारपुर राजांनी घेतले तेथील राजे सूर्याराऊ पळोन गेले. शिवाजी महाराजांनी सूर्व्यांचे कारभारी पिलाजी शिर्के यांची कन्या जीऊबाई हिचा विवाह संभाजी महाराजांशी ठरवला. तसेच आपली मुलगी राजकुवरबाई हिचा विवाह पिलाजी शिर्के यांचे पुत्र गणोजीराजे यांच्याशी ठरवला. सभासद बखरीनुसार “पुढे सुर्वे राज्य करीत होते त्याजवर चालून गेले. शृंगारपुर घेतले. सुर्वे पळोन देशांतारास गेले. त्यांचे कारभारी शिर्के होते त्यांशी भेद करून राज्य हस्तगत केले. त्यांसी महाल मुलुख देवून त्यांची कन्या राजीयाने आपले पुत्रास केली.” शिवचरित्र साहित्य खंड ३ ८ नोहेंबर १७१८ यात छत्रपती शाहू महाराजांनी शिर्क्यांना दिलेल्या वतनपत्रात या संबधी उल्लेख आढळतो “ राजश्री स्वामिनी सोयरिक केली आपली लेकी राजकुवरबाई गणोजीरायास दिली पिलाजीरायांची लेकी जीऊबाई राजश्री राजे यांस केली “
  • येसूबाई यांचा विवाह
येसूबाई यांचा जन्म कधी झाला याविषयी नोंद नाही. येसूबाई यांचे माहेरचे नाव जीऊबाई संभाजी महाराजांशी विवाह झाला त्यावेळी त्यांचे नाव येसूबाई ठेवण्यात आले. शेडगावकर भोसले बखरीनुसार हा विवाह १६७० मध्ये झाला “ शके १५९१ सोम्य नाम संवत्सरे फसली सन १०७९ यासाली संभाजी राजे याची स्त्री याचे नाव माहेरचे जीऊबाई व राजे यांनी नाव ठेवले कि येसूबाई साहेब हि पिलाजी राजे शिर्के मळेकर यांची कन्या या उभयत्यांचे लग्न रायगड येथे जाहले. लग्न समारंभ मोठा केला. दानधर्म अपार केला.” इतिहासकारांच्या मते संभाजी महाराजांशी विवाह १६६५ च्या दरम्यान झाला असावा.
  • येसूबाई आणि संभाजी महाराज
संभाजीराजे शिवाजी महाराजांसोबत औरंगजेबाच्या भेटीस आग्र्यास गेले असता औरंगजेबाने त्यांना कैद केले . शिवाजी महाराजांनी चातुर्याने आपली सुटका करून घेतली त्यावेळी संभाजीराजांचा मृत्यू झाला अशी अफवा पसरवण्यात आली परंतु काही दिवसांनी संभाजी महाराज स्वराज्यात सुखरूप आले. येसूबाई त्यावेळी ७ ते ९ वर्ष्याच्या असाव्यात त्यांच्या मनाची अवस्था अश्यावेळी न केलेली बरी. महाराणी येसूबाईना बालपणापासून अश्या दुखीः प्रसंगास सामोरे जावे लागले. व शेवटपर्यंत त्यांना अश्या प्रसंगास सामोरे जावे लागले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर ६ जून १६७४ रोजी संपन्न झाला. त्यावेळी स्वराज्याचे भावी वारसदार युवराज शंभूराजे व युवराज्ञी येसूबाई झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेस निघाले त्यावेळी रायगडावर गृहकलह चालू होता. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना कर्नाटक मोहिमेत सोबत न घेता शृंगारपुरला पाठविले. येसूबाई देखील संभाजी महाराजांसोबत शृंगारपुरला दाखल झाल्या. संभाजीराजे १३ डिसेंबर १६७८ संभाजी महाराज रागवून व नाराज होऊन दिलेरखानास मिळाले. येसूबाई यावेळी शृंगारपुरात गरोदर होत्या त्यांना भवानी नावाची कन्या झाली. जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ ४ सेप्टेम्बर १६७८ बुधवारी रात्री २०/४४ शृंगारपुरी भवानीबाई लेक संभाजी राजे यासी झाली.”
  • महाराणी येसूबाई
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यात पन्हाळगडी परत आले. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची भेट झाली . शिवाजी महाराज रायगडी परतले रौद्र संवत्सर शके १६०२ , चैत्र शुद्ध पोर्णिमा , शनिवार ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवरायांचे निधन झाले. स्वराज्यात वारसा हक्कावरून संघर्ष झाला. माघ शुद्ध सप्तमी , शके १६०२ रविवार १६ जानेवारी १६८१ शिवपुत्र शंभूराजे यांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर विधीपूर्वक संपन्न झाला छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. महाराणी येसूबाई ह्या स्वराज्याच्या महाराणी झाल्या. सोयराबाई , अण्णाजी दत्तो ,हिरोजी फर्जंद यांनी औरंगजेबाचा मुलगा अकबराशी संधान बांधले व संभाजीराजांना गादीवरून काढण्याचा व राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा कट रचला परंतु कटाची माहिती मिळताच संभाजीराजांनी कटात सामील लोकांस कैद करून कडक शिक्षा केली.
महाराणी येसूबाई यांना बाळाजी आवजी यांना संभाजीराजांनी शिक्षा केल्याचे समजले. बाळाजी आवजी हे स्वराज्याचे विश्वासू तसेच निरपराध होते. महाराणी येसूबाईनी संभाजीराजाना समजावले व त्यांची चूक लक्षात आणून दिली. “ बाळाजी प्रभू मारिले हे उचित न केले , बहुत दिवसांचे आणि इतबारी व पोख्त . थोरले महाराज कृपाळू ( त्यांचे ) सर्व अंतरंग त्यांजपाशी होते. चिटणीस राज्याचे व आपले प्राण ऐसे म्हणत आले. वंशपरंपरेने चिटणीसी देवून पत्र शपथपूर्वक त्यास दिले. ते माहित असोन त्यांनी अपराध हि काही केला नाही , असे असता लहानाचे सांगण्यावरून हे गोष्ट कशी केली?”
संभाजी महाराजांना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी बाळाजी आवजी यांच्या पुत्रांची जबादारी येसूबाई यांना दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे शीक्के जिजाऊसाहेबांकडे ठेवत असत त्याचा आदर्श घेत संभाजी महराजांनी येसूबाई यांच्याकडे शिक्के करून दिले. येसूबाई पत्रावर शिक्के करणे हे काम खंडो बल्लाळ यांच्याकडून करवत असत “ त्याजवरून येसूबाईसाहेब यांनी मुले दोन खंडो बल्लाळ व निळो बल्लाळ यांचे रक्षण केले. शिक्के शिवाजी महाराज जिजाबाईसाहेब यांजकडे ठेऊन करवीत होते. त्याप्रमाणे संभाजी महाराज यांनी शिक्के पेटीत घालून , देवापाशी ठेऊन , पेटीची किल्ली वाड्यात असावी, शिक्के करणे ते परवानगीची याद जाली म्हणजे नेवून समजवावी नंतर शिक्के तिथेच आणोन करावे असे येसूबाईसाहेब यांजपासून करवू लागले. असे चालत होते. याजवर त्या कागदावर शिक्के करविणे व आपले कागदपत्र लिहीविणे चिट्ठीचपाटी लिहीवणे ते येसूबाई खंडो बल्लाळ यांजकडून करवू लागली.
वैशाख वद्य ७ शके १६०४ दुंदुबी संवत्सर गुरुवार १८ मे १६८२ यादिवशी येसूबाई यांना पुत्रप्राप्ती झाली. मुलाचे नाव शिवाजीराजे ठेवले.
  • येसूबाईचे माहेर शिर्के व संभाजी महाराज वाद व छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या .
छत्रपती शिवाजी महाराजांनी येसूबाई यांचे वडील पिलाजीराजे यांना राजकुवर बाई यांना पुत्र झाल्यावर देशमुखीचे वतन देण्याचे मान्य केले होते. शिवचरित्र साहित्य खंड ३ लेखांक ४३८ यात छत्रपती शाहू महाराजांनी शिर्क्यांना दिलेल्या वतनपत्रात या संबधी उल्लेख आढळतो. संभाजीराजे छत्रपती झाले त्यावेळी येसूबाई यांचे वडील पिलाजीराजे आपल्या सैन्यासह संभाजीराजांच्या मदतीस आले. त्यामुळे येसूबाई यांचे भाऊ गणोजीराजे या वतनासाठी आग्रही होते परंतु संभाजी महराजांनी स्वराज्यात वतन देण्याची पद्धत बंद असल्याने त्यांना वतन दिले नाही. त्यामुळे गणोजी शिर्के नाराज होते. जेधे शकावालीनुसार “ कवी कलश व शिर्के यांच्यात भांडण झाले अश्यावेळी संभाजीराजे कवी कलशाच्या मदतीस गेले यात शिर्क्यांचा पराभव झाला.” गणोजी शिर्के मोगलांच्या आश्रयास गेले. संभाजी महाराज संगमेश्वर येथे आले असता फितुरीमुळे संभाजी महाराज पकडले गेले. मुकरबखानाकडून संभाजी महाराजाना पकडले गेल्याची तसेच संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येची बातमी रायगडावर गेली .
  • येसूबाई यांचा सल्ला
स्वराज्यावर दुःखाचे संकट कोसळले होते. रायगडाला मुगलांचा वेढा पडला. परंतु अश्या परीस्थीथित येसूबाई या डगमगल्या नाहीत . येसूबाई यांनी स्वपुत्र प्रेम दुर्लक्ष करत स्वराज्याच्या हिताचा निर्णय घेत राजराम महाराज यांना छत्रपती घोषित केले. सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे असल्याने राजाराम महाराजांना त्यांच्या पत्नीसह तसेच काही विश्वासू सैन्य घेऊन रायगडावरून जिंजीला जाण्याची योजना तयार केली. येसूबाईच्या या निर्णयामुळे मोगलांचे सैन्य दुभागले जाणार होते . तसेच स्वराज्याचा लढा रायगड शत्रूच्या हातात गेल्यास संपला असता त्यास येसुबाईनी नवसंजीवनी दिली. राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडून जिंजीस निघाले परंतु मोगली वेढ्यापुढे येसूबाईना शरणागती पत्करावी लागली . १९ ऑक्टोंबर १६८९ रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. महाराणी येसूबाई आपला पुत्र शिवाजी व इतर लोकांसह कैद झाल्या .
करवीर रियासत स.मा.गर्गे लिहितात “ रायगडावरील येसूबाईचे वर्तन अतिशय धीरोदात्त व शिवाजी महाराजांच्या सुनेला साजेसे असे होते.”
  • मोगलांच्या कैदेत महाराणी येसूबाई
जेधे शकावलीनुसार महाराणी येसूबाई यांचा पुत्र शिवाजी याचे नाव औरंगजेबाने शाहू ठेवले. व त्यास मोगलांची सप्तहजारी मनसबदारी देण्यात आली. मासिरे आलमगिरीतील नोंदीनुसार “ औरंगजेबाने त्याच्या निवासस्थानाच्या जवळच सर्वांच्या राहण्यासाठी तंबू उभारले तसेच सर्वाना खर्चासाठी वार्षिक वेतन दिले.’’ औरंगजेबाच्या छावणी जिथे जात असे त्या सोबत येसूबाई व इतर लोकांचा खडतर प्रवास होत असे. हालअपेष्ठा व मोगली वातावरणात येसूबाई ह्या खंबीर राहिल्या त्यांनी शाहू महाराजांचे संगोपन केलेच परंतु त्यांच्यातील धर्मनिष्ठा देखील जागृत ठेवली. औरंगजेबाने शाहू महाराजांना मुसलमान करण्याचे ठरविले परंतु शाहू महाराजांनी यांनी या गोष्टीस विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने शाहू महाराजांच्या बदली प्रतापराव गुजर यांच्या दोन मुलांना मुसलमान केले.
औरंगजेबाची छावणी अहमदनगर येथे असताना दुष्काळ पडला येसूबाईना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज भासू लागली. २४ एप्रिल १७०५ रोजी येसूबाईनी चिंचवडकर मोरया गोसाव्यांच्या मठाधीकाऱ्याना पत्र लिहिले व कर्जाची मागणी केली. हिंदवी स्वराज्याच्या महाराणीवर अशी दुःखाची व हालअपेष्टा यांची परीस्थीती ओढवली.
२० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यू नंतर मोगलांनी स्वराज्यात दुफळी माजवण्यासाठी शाहू महाराजांना मुक्त केले परंतु येसूबाई व इतर लोकांना ओलीस ठेवले . महाराणी येसूबाई यांना दिल्लीस नेण्यात आले. आपला पुत्र आपणास सोडवेल ह्या आशेवर येसूबाई मोगली कैदेत जीवन व्यतीत करीत होत्या.
  • येसुबाईंची मोगल कैदेतून सुटका
शाहू महाराजाना आपल्या आईविषयी काळजी लागून राहिली होती त्याविषयी त्यांचे प्रयत्न चालू होते. दिल्लीच्या सय्यदकडे या विषयी बोलणी करण्याकरता आपला वकील यादवराव प्रभू पारसनीस पाठवला. २४ फेब्रुवारी १७१८ च्या पत्रात ते वकिलास लिहितात “ रा. शंकराजी पंताच्या व तुमच्या लिहिल्यावरून चौथाई व सरदेशमुखीचा परवाना व स्वराज्याची सनद यैसे तीनही मतलब तो विल्हे लागले. राहिले मातुश्री येसूबाईसाहेब व चिरंजीव मदनसिंग यांचे आगमन हुजरुन जाले आणि स्वामीची व त्यांची भेट जाली , म्हणजे नबाबाच्या वचनाप्रमाणे रा. शंकराजी पंत दरम्यान पडिले आणि तुम्ही कष्ट मेहनत केली त्याची सार्थकता होऊन अवश्य मतलब सिद्धीस पावेल. तर मातोश्रीचेविशी व चिरंजीवाचेविशी प्रतिक्षणी स्मरण देवून त्यांचे अवलंबे आगमन होय ते गोष्टी करणे. “
१७१९ मध्ये शाहू महाराजानी चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा आणण्यासाठी मराठा सैन्य दिलीस पाठवले. शंकराजी मल्हार, बाळाजी विश्वनाथ यांनी केलेले अकबराच्या मुलाचे एक खोटे नाटक व दिल्लीतील राजकीय व लष्करी संघर्ष यामुळे येसूबाई यांची सुटका झाली. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना बादशहाकडून कोणत्या सनदा घ्यावयाच्या आहेत याविषयीची यादी दिली त्यातील एक मुख्य कलम “ मातोश्री ( येसूबाई ) व मदनसिंग देखील कदीम व दुर्गाबाई जानकीबाई व सेवक लोक मागोन घेणे “
जून १७१९ रोजी महाराणी येसूबाई २९ वर्ष मोगली कैदेतून सुटका होऊन स्वराज्यात परत आल्या.
  • येसूबाई यांचा शिक्का
छत्रपती संभाजी महराजांनी येसूबाई यांना शिक्का करून दिला “ श्री सखी राज्ञी जयति “
महाराणी येसूबाई मोगली कैदेत असताना त्यांना फारसी भाषेतील शिक्का करून देण्यात आला रुपयाच्या आकाराचा दुवलयी तीन ओळींचा शिक्का. एसुबाई , वालीद इ साहू , सना अहद त्यातील मजकूर “ राजा साहुची आई एसूबाई तिचीही जुलूस सन १ मध्ये केलेली मुद्रा.”
  • येसूबाई यांची धार्मिक वृत्ती
चाफळ येथे येणाऱ्या यात्रेकरूना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सन १६८६ रोजी चाफळ येथील रामजन्मोत्सवाच्या यात्रेस अभयपत्र महाराणी येसूबाई यांनी दिले .
महाराणी येसूबाई मोगली कैदेतून सुटून आल्या त्यावर्षीच १७१९ रोजी त्यांनी कराडचे रघुनाथ भट यांना तीर्थयात्रा करून आल्याबद्दल वर्षासन करू दिले.
  • येसूबाई यांचा प्रशासनातील सहभाग
मोगली कैदेतून सुटून आल्यानंतर येसूबाई यांचा स्वराज्याच्या प्रशासनात सहभाग घेत असत नारो शंकर गांडेकर व महादजी शंकर गांडेकर यांच्यातील वादात त्यांनी निर्णय देत हा तंटा सामोपचाराने मिटवला.
छत्रपती शाहू महाराज व कोल्हापूर छत्रपती संभाजीराजे यांच्यातील वारणेचा तह झाला. याबाबत येसूबाई यांनी सल्ला दिला असावा व हि मध्यस्थी घडवून आणली . स. मा गर्गे करवीर रीयासतीमध्ये लिहितात “ येसूबाईनी तहासंबंधी मध्यस्थी सुरु केली . दरम्यान त्या निधन पावल्या.
  • येसूबाई यांचा कैलासवास
महराणी येसूबाई यांचा १७२७ च्या दरम्यान झाला असावा . येसूबाईचा कैलासवास झाल्याचे कळताच कोल्हापूर छत्रपती संभाजीराजे यांनी सांत्वनपर पत्र पाठवले “ मातोश्री येसूबाईसाहेब यांसी वेथा होऊन कैलासवास झाला म्हणोन लिहिले. त्यावरून ममताविषयी चित्तास परमखेद प्राप्त झाला. हा अयत्नी मार्ग ऐसाच आहे.” ( सदर पत्रावर तारीख नसल्याने येसूबाईच्या निधनाचा निशित काळ कळत नाही )
महाराणी येसूबाई यांची समाधी संगम माहुली येथे छत्रपती शाहू महाराजांनी बांधली
श्री. नागेश सावंत
संदर्भ :- चिटणीस बखर , सभासद बखर, शेडगावकर भोसले बखर, जेधे शकावली, शिवचरित्र साहित्य खंड ३ ,
करवीर रियासत :- स.मा.गर्गे
छत्रपती थोरले शाहू महाराज सातारा :- आसाराम सैदाणे
महाराज्ञी येसूबाई :- सदाशिव शिवदे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...