विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

छत्रपती थोरले शाहू महाराजांचा खंड्या कुत्रा

 


छत्रपती थोरले शाहू महाराजांचा खंड्या कुत्रा

लेखन ::श्री नागेश सावंत

छत्रपती शाहू महाराजांना शिकारीची व प्राणी पाळण्याची आवड होती. त्यांच्याकडे खंड्या नावाचा एक कुत्रा होता. खंड्या कुत्र्याविषयीच्या काही कथा आपणास बखरीतून आढळतात.
खंड्या कुत्रा सरकारचा मी ही कुत्रा सरकारचा ( शेडगावकर भोसले बखर ) :- शाहू महाराज छत्रपती यांणी खंड्या कुत्रा बाळगला होता. त्याजवर स्वामींचा फार लोभ होता . त्या कुत्र्याचा स्वभाव गुण तो वाईट जीन्नसावर हुंगावयास गेला. त्यावेळी एका हुजऱ्याने ( नोकराने ) कुत्र्यास दगड मारला. तो दगड त्या खंड्या कुत्र्याचा पायास लागून तो ओरडत सरकार ( शाहू महराज ) याजपासी आला. मग त्यांनी सर्व मंडळीस विचारले कि यास कोणी मारले. तेव्हा एका हुजऱ्याने त्या दगड मारणाऱ्या हुजऱ्याचे नाव सांगितले. तेव्हा महाराज छत्रपती शाहुंस राग आला व त्यांनी त्या हुजऱ्याचा शोध घेऊन समोर आणण्याची आज्ञा केली. छत्रपतींची आज्ञा होताच हुजऱ्यास धरून शाहू महाराजांनसमोर आणण्यात आला. शाहू महाराजांनी कुत्र्यास त्यास दगड मारण्याचे कारण विचारले असता त्याने शाहू महाराजांना अर्ज केला कि खंड्या कुत्रा सरकारचा व मीही कुत्रा सरकारचा . कुत्री कुत्री आपसात भांडली त्याचे भांडण स्वामिनी कशास मनास आणावे. त्या हुजऱ्याचा हा हजरजबाबीपणा पाहून शाहू महाराज यांचा राग गेला व त्यांनी त्या हुजऱ्यास बक्षीस दिले.
जानराव निंबाळकर खर्डेकर हे मोगलाईतील सरदार एकदा शाहू महराजांच्या भेटीस आले असता . शाहू महराजांच्या सेवकाने शाहू महाराजांना भेटीस जाण्याकरता त्यांचे पागोटे दिले असता शाहू महाराजांनी ते माझ्या भेटीस येणार कि पागोट्याच्या असा प्रश्न करत त्यांच्या आवडत्या खंड्या कुत्र्यास आपले पागोटे घालून भेटीस गेले. छत्रपतींची साधी राहणीमान पाहून मोगली सरदार खजील झाला. ( छत्रपती थोरले शाहू महाराज :- चिटणीस बखर ) :-
जानराव निंबाळकर खर्डेकर भेटीस आले. यावरून महाराजांस हुजरे यांणी पागोटे जलदी करून आणून देवून “ जवळ आले , भेटीस पुढे जाणे , मोगलाईतील सरदार बहुत इतमाम व जवाहीर पोषाख ऐसे आले आहेत “ विनंती केली . तेव्हा “ आमचे भेटीस येणार का पागोट्यास ? “ बोलले आणि खंड्या म्हणून कुत्रा बहुत नामी शिकारीत होता. त्यास महाराजांनी पालखी व इतमास पांच हजार रुपये नेमणूक माणसे वैगरे चालविले होते. त्यास जवाहीर भरजरी झूल वैगरे घालविले. पोषाख मोठे व अलंकार कंठ्या चौकडे खिजमतगार यांस देखविली . आणि भेटी समयी आपण काही एक पोषाख पागोटे जवाहीर न घालिता विजार चालावी, अगर पैठणी, अगर, ताडपत्री ( शेला ) , असावी, ते घेऊन भेटी जाल्या. निंबाळकर बहुत खजील जाहाले. त्यांस सन्मान वस्त्रे मेजवानी करून निरोप दिल्हा.
वरीलप्रमाणे अश्याच आशयाची घटना सरदार इंदोजी कदम यांच्याबाबतीत देखील आढळून येते ( मराठी रियासत पुण्यश्लोक शाहू पेशवा बाळाजीराव) :- सरदार इंदोजी कदम आपल्या लावाजाम्यासह मौल्यवान दागदागिने स्वतः व नोकरांना घालून छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीस आले. शाहू महाराजांना सदर बातमी कळताच त्यांनी त्यांच्या आवडत्या खंड्या कुत्र्यास दागदागिने व पागोटे व शिरपेच घालून सजविले व दरबारात खंड्या कुत्र्यासह विराजमान झाले. परंतु शाहू महाराज स्वतः मात्र साधा पोषाख धारण केला. इंदोजी कदमांनी सदर प्रकार दरबारात बघितला त्यांना त्यांची चूक जाणवली आणि शाहू महाराजांची वाखाणणी करून रीतीप्रमाणे भेट घेऊन निघून गेला.
वरीलप्रमाणे अश्याच आशयाची घटना कोल्हापूरकर संभाजी महाराज यांच्याबाबतीत देखील आढळून येते ( गोविंद खंडेराव चिटणीसकृत श्री शाहू महाराजांची बखर ) दिनांक २७ फेब्रुवारी इ.स. १७३१ रोजी कोल्हापूरकर संभाजी व शाहू महाराज यांची भेट झाली. त्यावेळी संभाजी महराजांनी आपले अंगावरील भरगच्च पोषाख , जवाहीर, मोत्यांची कंठी, दंडपेट्या , पोचपाने , गाजीरा वैगरे मातबर जवाहीर घातले. तसेच घोड्यावर व हत्तीवर सरंजाम घालोन मोठ्या इतमामानी निघाले. छत्रपती शाहू महाराजास कळोन खंड्या कुत्र्याच्या अंगावर जवाहीर मनमानेसे घालून त्यास भरगच्ची पालखीत बसवून , त्यास पुढे जिलिबीचे चोपदार वैगरे देवून , प्रथम स्वारी पुढे करून , मागे खाशी स्वारी ( स्वतः शाहू महाराज ) पांढरी तुमान व जामा व चादरेचा साधा बिनजरी दुपेटा , डोईस एकेरी पांढरी टोपी आणि तुरा , घोड्यावर साधा सरंजाम , त्याजवर खासास्वारी बसोन , दरखदार , पदाधिकारी , अमीर उमराव , तमाम चालले...उभयता बंधूच्या भेटी जाहल्यानंतर खंड्या कुत्र्याच्या पालखीपुढे जिलिब शाहजणे नगारे निशाणे चालली
खंड्या कुत्र्याची स्वमिनिष्ठा व समाधी ( मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २ पेशवे शकावली ) :- महाराजांजवळ एक कुत्रा असें. तो सर्वकाळ महाराजांपाशी गादीजवळ असे. कोणे एकेदिवशी महाराज वाघावर शिकारीस गेले. बरोबर हा कुत्रा होता. महाराजांनी वाघावर बंदुकीची गोळी मारली. ती चुकून जाऊन वाघ महाराजांवर चालून आला, तेव्हां त्या कुत्र्यानें वाघ येतो असें पाहून एकदम वाघाचे मागले अंगास जाऊन त्याचें अंड धरिलें. इतक्यांत महाराजांजवळ बंदूक होती. दुसरी गोळी वाघावर मारिली. वाघ मारिला. त्या दिवशीं या कुत्र्यानें महाराजांचा प्राण वांचविला. तेव्हांपासून त्याजवर महाराजांची प्रीति होती. महाराजांचा अंतकाळ झाल्यावर मराठे चालीप्रमाणें प्रेत पालखीत घालून मोठे समारंभानें माहुलीस आणिलें. त्याजबरोबर कुत्राही आला. पुढें महाराजांचे दहन होऊन मंडळी माघारी येण्यास निघाली, त्यांत महाराजांची पालखी व महाराज मयत असें कुत्र्यानें पाहून त्या नदीचे काठी डोकें आपटून प्राण दिला. त्या कुत्र्याचेंही थडगें कृष्णेच्या कांठी महाराजांच्या थडग्यानजीक अद्याप कायम आहे. त्या थडग्यावर दगडाचा कुत्रा हुबेहूब कुत्र्याप्रमाणें करून बसविलेला अद्याप आहे.
काव्येतिहाससंग्रह मधील नोंदीनुसार खंड्या कुत्र्याने छत्रपती शाहू महाराजांना एकदा वाघापासून वाचविले होते. ( पेशवे दफ्तर खंड ४२ राजा प्रतापसिंहाची रोजनिशी ) :-.
छत्रपती शाहू महाराज शिकारीस गेले असता त्यांच्यावर एका वाघाने हल्ला केला परंतु खंड्या कुत्र्याने त्यांचे प्राण वाचवले त्यामुळे खंड्या कुत्र्यास पालखीचा मान दिला. छत्रपती राजा प्रतापसिंह व इंग्रज अधिकारी ग्रंट डफ यांच्यात झालेल्या भेटीत आपणास त्याविषयीचा उल्लेख आढळतो
(इंग्रज अधिकारी ग्रंट डफ याने विचारले ) शाहू महाराजाचा कुतरा त्याचे वर्तमान पुसिले कि कुतरे यास पालखी दिल्ही. त्यांणी वाघ मारला तो कोणत्या डोंगरात ? कोणत्या रानात ? तीथ वार संत शक काढून दाखवा. ( छत्रपती राजा प्रतापसिंह यांनी उत्तर दिले ) बखरीत असेल ते खरे असे उत्तर केले.
नवसास पावणारा खंड्या ( शेडगावकर भोसले बखर ) खंड्या कुत्रा नवसास पावतो अशी देखील एक दंतकथा अस्तित्वात होती
शके १६४६ क्रोधी नाम संवछरे फसली सन ११३४ राजे शक ५१ या साली महाराज छत्रपती याणी खंड्या कुतरा बाळगला होता , मयत जाहाला. त्याचे थडगे कृष्णातीरी सरकारांनी बांधिले. तो काही दिवस खंड्या कुतरा यास नवस केल्यास तो कुतरा नवसास पावत होता . ते समई संगम माहुली येथे एक भटजी याणी तेथे वाडा बांधावयास लागले, तेव्हा खंड्या कुतऱ्याचे थडगयाचा एक दगड चांगला म्हणोन भटजींनी तेथून नेवून आपले वाड्याचे इमारतीस लाविला. तो भटजी यांनी तीन वेळा बांधीत परंतु इमारत सिद्धीस गेली नाही. इमारत ढासळून पडे . तेव्हा भटजी याचे स्वप्नात खंड्या कुत्रा जावून त्यास सांगितले कि , माझ्या थडग्याचा एक दगड तुम्ही नेला आहे, तो दगड परत आणून , पूर्वी जसे थडगे होते त्याप्रमाणे बांधावे. आसा दृष्टांत दिल्यावर मग भटजी यांणी पूर्वीप्रमाणे थडगे बांधले तेव्हा वाडा सिद्धीस गेला. नंतर ज्याचे कुतरे नवसास पावत होते त्या कुतऱ्याचे थडगे संगम माहुली येथे आहे.
श्री. नागेश सावंत
संदर्भ :- छत्रपती थोरले शाहू महाराज :- चिटणीस बखर
शेडगावकर भोसले बखर
मराठी रियासत पुण्यश्लोक शाहू पेशवा बाळाजीराव
पेशवे दफ्तर खंड ४२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २ पेशवे शकावली
छायाचित्र साभार विकिपीडिया

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...