जयाप्पा शिंदे :
राणोजी शिंद्यांच्या मृत्यूनंतर जयप्पानी ग्वाल्हेरची गादी सांभाळली. २५ जुलै १७५५ ला जोधपुरच्या महाराजा विजयसिंह राठौर यांच्या वारसदारांशी (बिजसिंह राठौर ) लढताना वयाच्या ३५ व्या वर्षी जयाप्पांना नागौर (राजस्थान) येथे घातपात करून मारण्यात आले. जयाप्पा शिंद्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जनकोजी शिंदे यांनी शिंदेशाहीची सूत्रे आपल्या हाती
घेतली. जयाप्पा शिंदेंनी १७४५ ते १७५५ अशी दहा वर्षे आपली कारकीर्द केली. दत्ताजी शिंदे हे राणोजी शिंद्यांचे द्वितीय पुत्र. जयाप्पाच्या मृत्यूनंतर शिंदेशाहीची सूत्रे जनकोजीस मिळाली. परंतु तो लहान होता म्हणून दत्ताजीच कारभार पाही. ...या चुलत्यापुतण्यांनी अनेक पराक्रम केले व उत्तर हिंदुस्थानांतील पुष्कळ प्रांतहि मराठी साम्राज्यांत समाविष्ट केले. कुकडीच्या लढाईत ज्या अकरा शूर अप्तामीनी थेट निजामाच्या हत्तीवर चाल करुन त्याची डोलाची अंबारी खालीं पाडिली. त्यांपैकीं दत्ताजी हा एक होते. जयाप्पाचा ज्या बिजसिंगाच्या मोहिमेंत खून झाला, तींतहि दत्ताजी होते ; खून झाल्यावर दत्ताजीने तें दुःख एकीकडे ठेऊन बिजेसिंगाचा मोड केला. पुढें १७५६ मध्ये दत्ताजीनी सर्व मारवाडचें राज्य घेऊन त्याचा तिसरा हिस्सा मराठी साम्राज्यांत दाखल करुन पांच कोट रु खंडणी मिळविली. नंतर बुंदीच्या राणीस मदत करुन व तिचा मुलगा गादीवर बसवून, दत्ताजीनें ४० लाख रुपये मिळविले व सरकारचें बरेंच कर्ज फेडले. पुढील सालीं पेशव्यांनी अबदालीवर स्वारी करून गेले असतां व मल्हारराव होळकर, हिंगणे, राजेबहाद्दर वगैरे मंडळी त्याला मदत करण्यांत कुचराई करीत असतां, त्यानी दत्ताजीसच धाडण्याबद्दल लेखी दरख्वास्त केली. या दरम्यान १७५८ मध्ये दत्ताजीचा विवाह भागीरथीबाईशी झाला. लग्न उरकून हळद ओल्या अंगाने दत्ताजी उज्जैनला आले. तेथें मल्हाररावानें त्याचा भोळा स्वभाव पाहून त्यास दादासाहेबानें सांगितलेल्य नजीबखानाचें पारिपत्य करण्याच्या कामगिरीपासून परावृत्त केलें. याचवेळी मल्हाररावांनी "नजीब खळी राखावा, न राखल्यास पेशवे तुम्हां आम्हांस धोतरे बडविण्यास लावितील" असे उद्गार काढिले. जनकोजी लहान पण मुत्सद्दी असल्याने, त्याने हा सल्ला फेटाळला, पण भोळ्या दत्ताजीनें तो स्वीकारुन नजीबास राखलें, मात्र त्याच नजीबानें १० जानेवारी १७६० च्या दिवशी दत्ताजीचा विश्वासघातानें प्राण घेतला. बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणत मृत्यूस कवटाळणारया दत्ताजीचे नाव मराठ्यांच्या इतिहासात अजरामर आहे. जनकोजी शिंद्यांचे वय या वेळी १५ वर्षांचे होते, त्यांनी दत्ताजी शिंद्यांना परत फिरण्याचा मुत्सद्दी सल्ला दिला होता पण भावनेच्या आहारी जाऊन प्रतापराव गुजरांनी जी चूक शिवछत्रपतीच्या काळात केली होती तशीच चूक इथे केली.
No comments:
Post a Comment